प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ३ रें
असुरराष्ट्रसंस्थापनेच्या नंतरच्या इतिहासार्थ वेदावलोकन.

दासविषयक स्वतंत्र मजकूर. - दीर्घतम्यानें आपल्या शत्रूंस दास म्हटलें आहे. सुदासाच्या व इतर कांहीच्या शत्रूंस केवळ दासें म्हटलें नाही, तर आर्य आणि दास असें दोन्ही प्रकारचें शत्रू वर्णिले आहेत.

म्हणजे अर्थात तेथें दास शब्द शत्रुवाचक नाही. दासांनां कृष्णयोनि म्हटलें आहे.

दासाला वर्ण म्हटलें आहे; दस्यूंस तसें म्हणणारा उल्लेख नाहीं.

दासविषयक उल्लेखांत अहिनाशाचे उल्लेख आहेत तसे दस्युविषयक उल्लेखांत नाहीत. दासाच्या अव्रतत्वाविषयीं बोभाटा फारसा आढळत नाही. दासाचें विशिष्ट स्वरुप वर्णिलें आहे, तें तीन डोकीं व सहा डोळे असें आहे, व तो मोठ्यांनें शब्द करणारा आहे.

दस्यु म्हणून ज्यांचा उल्लेख नाही पण दास म्हणून ज्यांचा उल्लेख आहे असे वर्चि, नमुचि, वृषशिप्र, सृबिंद, अनर्शनि, अहीशुव हे होत.

दासाचे शत्रु पुरुकुत्स, कुत्स, व आर्जुनेय म्हणून वर्णिले आहेत. दासांशी संबद्ध क्रियापद ''दास्'' असेच आहे व तें नाशार्थक आहे.

दासांचे सैन्य स्त्रिया म्हणून उल्लेखिलें आहे. कांही विशिष्ट संपत्तीच्या अस्तित्वामुळें दास आर्य होऊं शके असें वर्णन आहे.

या तुलनेपासून काय निर्णय निघतात तें पाहूं. हे निर्णय काढण्यापूर्वी कांही सहायक गोष्टींचा निर्देश केला पाहिजें.