प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ३ रें
असुरराष्ट्रसंस्थापनेच्या नंतरच्या इतिहासार्थ वेदावलोकन.
सिंहावलोकन.- वेदविद्या या विभागांत वेदांवर विवेचन पुष्कळ केलेलें आहे. त्यांत वेदकालाचा इतिहास लिहावयाचा म्हणजे समाजाच्या अनेक अंगांच्या स्थित्यंतरांचा आणि विकासांचा इतिहास लिहावयास पाहिजे आणि त्या अंगांच्या अनेक विकासांचा अन्योन्याश्रय दाखविला पाहिजे म्हणून सांगितलें. इतिहासविषयांपैकीं ज्या कांही गोष्टींचा बराच इतिहास त्यांत येऊन गेला आहे अशा गोष्टी म्हटल्या म्हणजे (१) यज्ञसंस्था (२) वैदिक वाड्·मय (३) ब्राह्मणजाति (४) देवता. ह्या होत. या सर्वांचा अन्योन्याश्रयहि दाखविला आहे. या अंगांचा इतिहास तरी संपूर्ण दिला आहे असें नाहीं तर त्या अंगांचा अन्योन्याश्रय समजून वेद स्पष्ट होण्यास मदत व्हावी इतकाच दिला आहे. पद्धतवार इतिहास देण्यास पूर्व तयारी म्हणून त्या भागाचें महत्व आहे. ज्या अंगांचा इतिहास वेदविद्या या भागांत फारसा आला नाहीं अशीं अंगे म्हटली म्हणजे (१) राजकीय खळबळी (२) कुलें, जाति गोत्रें, संप्रदाय (३) गृहस्थधर्म (४) आर्यन् लोकांचा व वैदिक संस्कृतीचा प्रसार (५) भाषा (६) व्यापक विचार आणि तत्वज्ञान हीं होत.
मागे जें ऐतिहासिक विवेचन आलें आहे त्याचें स्थूल स्वरुप म्हटलें म्हणजें मंत्ररचनेच्या नंतरच्या कालांत यज्ञसंस्था कशी वाढत गेली आणि त्याबरोबर ब्राह्मणजाति आणि वेदांची संहितीकरणें ही कशीं बनलीं यांचे स्पष्टीकरण हें होय. या विवेचनाचें फलदर्शक सिंहावलोकन केलें असतां पुढील विवेचन समजण्यास सोपें जाईल म्हणून तें येथें करीत आहों.
आज आपणांस वेद ज्या स्थितींत दिसतात ती स्थिति (म्हणजे वेदांचे तृतीय संहितीकरण) कुरुयुध्दाच्या सुमारास उत्पन्न झाली असावी.
ॠृचांचें संहितीकरण करुन ॠग्वेद तयार करण्याची क्रिया सोमयागविकासाशीं संबद्ध आहे. जेव्हा लहानसहान याग नाहींसे होऊन मोठे याग करण्याची वेळ आली तेव्हां मोठे याग करण्यासाठीं हौत्रमंत्र गोळा करण्याची क्रिया जोरानें सुरु झाली. तेव्हां ॠग्वेद तयार होऊं लागला.
यज्ञामध्यें आजचें यज्ञस्वरुप उत्पन्न होण्यापूर्वी अध्वर्यु, होता व ब्रह्मा यांच्या क्रियांचे वैशिष्टय स्थापन झालें नव्हतें. ॠग्मंत्र तयार होऊं लागले त्याच वेळेस कांही अंशी यज्ञक्रिया, सामुच्चयिकं झाली होती पण ॠत्विजांचे विशिष्ठीकरण फारसें झालें नव्हतें. हें विशिष्टीकरण फार हळू हळू झालें. मंत्र्यांचें परीक्षण केलें असतां असें दिसून येईल की अध्वर्यू हौत्रमंत्र म्हणत आहेत व होते हवनाची क्रिया करीत आहेत.
ॠग्वेदामध्ये जो सोमयाग दिसत आहे तो आजच्याप्रमाणें किंवा चा-ही वेदांच्या अन्योन्याश्रयानें होणारा आणि ब्राह्मणग्रंथावरुन व्यक्त होणा-या सोमयागाप्रमाणें पशुयुक्त दिसत नाही. तर दैनिक सोमपूर्वक अग्निहोत्राच्या स्वरुपाचा दिसतो.
या वाढलेल्या सोमसंस्थांचे विकासस्थान सतलज नदीच्या पूर्वंकडील भाग दिसतो.
ब्राह्मण जाति ही भिन्न कर्मांचे ॠत्विज या रुपानें प्रथम अस्तित्वांत आलेली दिसतें आणि हे ॠत्विजांचे संघ पुढें भिन्न जातिस्वरुप पावलेले दिसतात. म्हणजे एक ब्राह्मणजाति विभागली गेली असें झालें नाहीं. प्रथम ॠत्विजांचे वर्ग विभागले गेले आणि त्या विभागांपैकी बरेच विभाग जातिरुप पावले.
दैवतेतिहासामध्यें देवतांचे जें स्वरुप ॠग्मंत्रांच्या साहाय्यानें वर्णन केलें आहे तें यज्ञविकासकालाचें नाहीं. तर ज्या कालांत ॠत्विजांचे विशिष्टीकरण पूर्ण झालें नव्हतें व यज्ञसंस्था ही देखील फारशी गुंतागुंतीची नव्हती अशा कालांतील आहे.
ॠत्विजांचे संथ बनत चालले ते बनतांना अनेक संप्रदाय अगोदर बनत होते. त्या संप्रदायांपैकी कांही संप्रदाय मृत झाले आणिं कांही टिकलें. जे टिकले त्यांनी यज्ञसंस्थेस आपल्या इच्छेप्रमाणें स्वरुप दिलें.
कृष्ण यजुर्वेंद आणि अथर्व वेद यांची तुलना करुन या दोहोंस सामान्य वाड्·मय कोणतें याचें कोष्टक दिले आहे. तथापि त्या कोष्टकावरुन कोणतेहि निर्णय काढले नाहींत. ते काम भावी संशोधकांवर सोंपविलें आहे.
यज्ञ करण्याचा धंदा करणारे लोक म्हणजे ॠत्विज यांमधील अनेक स्पर्धा दुस-या विभागांत दाखविल्या आहेत. भरतांनी ज्या काळांत कुरुक्षेत्रापर्यंतचा प्रदेश काबीज केला त्या वेळच्या वसिष्ठविश्वामित्रांच्या भांडणाची कथा त्यांत आली नाहीं तर भरतांची स्थापना कुरुक्षेत्रांत झाल्यानंतर प्राचीन अल्प यज्ञांचे मोठे यज्ञ कसे बनत गेले आणि ते बनल्यानंतर त्यांत कसे पक्ष उत्पन्न झाले यांचेच विवेचन त्यांत आहे. प्रथम उत्तरकालीन स्थिति स्पष्टीकरणासाठीं घेतली आहे. म्हणजे शाखांप्रमाणें भिन्न झालेला ॠग्वेद, शाखांप्रमाणें भिन्न झालेले यजुर्वेद व सामवेद आणि या त्रयींवाल्यांमध्यें आपलें बस्तान कायमचें बसविण्यांत यश पावल्यानंतर आवृत्ति पावलेला अथर्व वेद अशा त-हेची परिस्थिति आणि तिचीं कारणें आणि ती परिस्थिति यज्ञसंस्थेच्या ज्या स्थितींत उत्पन्न झाली ती यज्ञसंस्थेची स्थिति वर्णन करुन पूर्वीच्या कालाकडे अवलोकन केलें आहे.ॠत्विजांचा व यज्ञसंस्थेचा मंत्रपूर्व इतिहास दिला गेला नाही. प्राचीन संप्रदायांचा इतिहास आला नाही. जें विवेचन केलें तें फार त्रोटक झालें आहे. सबंध धर्मेतिहास यांत आला नाही, ब्राह्मण जातीचा इतिहास संगतवार आला नाही. धर्मेतिहास, वाड्मयेतिहास आणि सामाजिक इतिहास संगतवार लिहिण्यासाठीं स्थूल कल्पना देऊन ठेवल्या आहेत आणि इतिहास लिहितांना ज्या गोष्टी सिद्धकराव्या लागतील किंवा ज्या गोष्टींची माहिती देण्यासाठीं विषयांतर करावें लागेल अशाहि गोष्टी त्यांत वर्णिल्या आहेत. वैदिक वाड्·मयाचा ऐतिहासिक उपयोग करण्यापूर्वी वैदिक धर्मांचे आणि वैदिक वाड्·मयाचें जें स्थूल ज्ञान लागतें तें देऊन मंत्रपूर्व आणि मंत्ररचनेच्या कालांचे ऐतिहासिक विवेचन समजण्यासाठीं जी मनोभूमिका तयार करावयाची ती वेदविद्या या भागांत उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रस्तुत विभागांत वैदिक ग्रंथांच्या साहाय्यानें जो इतिहास दिला आहे त्यास परिशिष्ट म्हणून तो ग्रंथ वारंवार पहावा लागेल.
ॠषीचीं गीतें आणि त्यांचे विषय जे देवस्तोत्रें त्यांकडून आतां अधिक ऐहिक विषयाकडे वळूं. आणि मनुष्य वर्गाच्या दुस-या हालचाली काय दिसतात त्या पाहूं.
ॠग्वेदाचें थोडेसें निरीक्षण झालें तरी त्यांतील मानवी घडामोडी कोणासहि दिसल्यावांचून रहाणार नाहीत. या हालचालीचें स्थान एकंदर जगद्विकासांत देणें हें ॠग्मूलक इतिहासार्थ प्रयत्नाचें पहिलें कार्य होय.
जगद्विकासांतर्गत मानवेतिहास म्हणजे पृथ्वीवरील मनुष्यकल्प प्राण्यापासून मनुष्याच्या हालचालीचा एकंदर इतिहास होय. मागच्या प्रकरणांत सांगितलें आहे कीं मनुष्यप्राणी मानवकल्प प्राण्यांपासून विकसित होऊन त्याचा चोहोंकडे विस्तार झाला असें भौतिकशास्त्रज्ञांचे मत आहे. त्याचा विकास कोठें झाला याविषयीं आज एकमत नाहीं. मनुष्यप्राण्याच्या मानवपूर्वस्थितीपासून एकंदर मनुष्येतिहासांतील ब-याच अर्वाचीन काळापर्यंत म्हणजे ज्या काळांत अत्यंत प्राचीन राष्ट्रें दृष्टीस पडतात, त्या काळापर्यंतचा इतिहास अजून तयार व्हावयाचाच आहे. या दिर्घ कालांत कोणत्या परंपरेनें इतिहासविकास झाला असावा या संबंधाची कल्पना मागें (१ला विभाग पृ. ७८) दिली आहे.
भारतेतिहासांत प्रास्तरकालीन व आयस पूर्वयुगांतील मनुष्याच्या अस्तित्वाबद्ल पुरावे सांपडले आहेत. ते पुढें योग्य स्थलीं दिले आहेत. हिंदुस्थानांत एकंदर किती मानववंशांचे अस्तित्व आहे, याबद्ल विवेचन पहिल्या विभागांत (पृष्ठ ८१ पहा) केलेंच आहे.