प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ३ रें
असुरराष्ट्रसंस्थापनेच्या नंतरच्या इतिहासार्थ वेदावलोकन.
ॠग्वेदमंत्र व दाशराश युद्ध यांचा संबंध. आर्यन् आणि नॉनआर्यन् यांमध्यें हें युद्ध नव्हतें.- ॠग्वेदांत ज्या लढाया दिसत आहेत त्यांपैकी बहुतेक दाशराज्ञ युद्ध या युध्दांतर्गत किंवा त्यांशी संबद्ध दिसतात. हें युद्ध आर्य आणि अनार्य यांत खास नव्हतें.
यदुतुर्वश यांचे व पैजवनांचे आचारधर्म सारखे दिसतात. खुद् ॠग्मंत्रांत आलेली राष्ट्रें पाहिली असतां आपणांस बहुतेक पंजाबांतीलच राष्ट्रे दिसतात. आणि धर्मभिन्नत्वाचे प्रकार फारच थोडे दिसतात. जे कांही दिसतात ते येणेंप्रमाणें:
(१) यजनशील व अयजनशील.
(२) वक्त्यानें निंदा केलेले उपासनासंप्रदाय (शिश्नदेवां सारखे).
(३) मगंद
(४) अग्न्युपासकांचेच आचारभिन्नत्वामुळें नवग्व दशग्वां सारखे किंवा निरनिराळया गोत्रांसारखे संप्रदाय.
यापलीकडे आपणांस धर्मभिन्नत्वाचा प्रकार दिसत नाही; आणि दाशराज्ञयुद्ध हें तर केवळ यजनशील व अयजनशील यांच्या मधले मुळीच नाही.
ॠग्वेदसंहितेमध्यें जी सुक्तें घातली आहेत त्या सूक्तांच्या पौर्वापर्यकालासंबंधानें आतां थोडासा विचार करुं. आणि दाशराज्ञ युध्दाशीं ॠग्वेद वाङमयाचा संबंध कितपत पाफ्रेंचतो हें पाहूं.
यांत आपणांस जी एक गोष्ट पहावयाची ती ही कीं, ॠग्वेदांतील बहुतेक भाग एका विशिष्ट कालाचें वाङमय आहे, कीं अनेक कालांचे वाङमय आहे.
असें दिसतें की, ॠग्वेद संहितेतील बहुतेक व्यक्तिविषयक ऐतिहासिक उल्लेख एकच काल दर्शवितात, तथापि सर्वच सूक्तें ऐतिहासिक उल्लेखांनी भरलीं नाहींत. कित्येक सूक्तें केवळ स्तावक आणि याचक आहेत. कित्येक देववर्णनात्मक असून त्यांचे पराक्रम गात आहेत. जे मनुष्यांचे उल्लेख मंत्रांत सांपडतात ते दाशराज्ञ युध्दाशीं बहुतेक जोडून घेतां येतात.