प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ३ रें
असुरराष्ट्रसंस्थापनेच्या नंतरच्या इतिहासार्थ वेदावलोकन.

मंत्रांतर्गत पूर्वापरता. - ॠग्वेदांत संहितेचे घटक येणें प्रमाणें:

(१)    दाशराज्ञ युध्दाशी संबंध असलेल्या व्यक्तीचा व त्या व्यक्तीशी संबंध असलेल्या इतर व्यक्तींचा उल्लेख करणारी सुक्तें.
हि सूक्तें सर्व गोत्रमंडळांत आहेत; आणि पहिल्या व दहाव्या मंडळांत देखील आहेत. ही गोत्रमंडळे दाशराज्ञ युध्दाबरोबर प्रवेश झालेल्या लोकांचे व त्या काळच्या पुरोहितांचे जुनें वाङमय होय. ते पुरोहित भारतीयांचे किंवा पंजाबांतील जुन्या राष्ट्रांचे असावेत.

(२)    आठवें आणि नववें या मंडळांत सामवेदांत येणा-या बहुतेक ॠचा आहेत. ज्या वेळेस औद्रात्राचा समावेश यज्ञांत झाला त्या वेळेस होत्यांनी आपल्याबरोबर सामकांस घेतलें. त्यामुळें हे वाङमय दोन वेदांत शिरलें.

म्हणजे गोत्रवाङमय सोमयागप्रयोजनप्रसंगी गोत्रांबाहेरील सर्व सामान्य ॠचांशी संयुक्त होऊन संहितास्वरुप पावलें. ते संयुक्त होण्याचें कारण तें सर्वसामान्य वाङमय असून उद्रात्यांनी त्यास महत्व दिलें हे असावें.

पहिल्या व दहाव्या मंडळांतील बहुतेक ॠचा अर्वाचीन आहेत; पण त्यांत प्राचीन कथाभाग कांही अंशी आला आहे. पहिल्या भागांतहि कांही सूक्तें दाशराज्ञ युध्दाची आठवण देणारीं आहेत. आणि दहावें मंडळ अथर्व्यांशीं समेट ज्या काळांत झाला आणि अथर्वण विद्येचा समावेश ज्या काळांत ॠग्वेद्यांनीं करुन घेतला त्या काळाचें आहे.

म्हणजे ॠग्वेदांतील गोत्रमंडळांचा प्रतिपाद्य विषय दाशराज्ञ युद्ध होय, असें म्हणण्यास हरकत नाहीं. ॠग्वेदांत दाशराज्ञ युध्दाचे धागे कसे काय पसरले आहेत हें समजण्यासाठी ॠग्वेदोक्त व्यक्तीचा दाशराज्ञ युध्दाशीं संबंध देतों.