प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि
धातु.
हिरण्यनामें [ॠग्वेद]
अमृत | दत्र | लोह |
१अयस् | पेशन | सुरुक्म |
कनक | पेशस् | सुहिरण्य |
कांचन | भर्मन् | हरित |
कृशन | मरुत | ३हिरण्य |
२चन्द्र | रुक्म | हेमन् |
जातरुप | ||
[तै.सं.] | ||
सुहिरण्य | हिरण्य | हेमन् |
[अथर्ववेद ] | ||
वर्चस्य | हरित | हिरण्य |
सवर्ण | ||
[संहितेतर ] | ||
जातरुप | ||
[इतर धातु व धातुसंबंधी ॠग्वेद ] | ||
अक्र | आयस् | सप्तधातु |
अयस् | गिरिक्षित् | सुधातु |
असिसास् | रजस् | |
[तै.सं. ] | ||
अयस् | ५रजस् | श्याम |
त्रपु | ६लोह | सीस |
४रजत | ||
[अथर्ववेद ] | ||
अयस् | रजत | लोहित |
७त्रपु | लोहन्(लोह) | सीस |
यातुचातन | ||
[मै.सं.] | ||
लोहितायस् | ||
[संहितेतर ] | ||
कार्षायस् | कृष्णायस् | लोहितायस् |
१अयस्.- हा शब्द ॠग्वेदाप्रमाणें एकटाच उपयोगांत आणला तर तो कोणत्या धातूचा बोधक आहे हें निश्चितपणें सांगतां येत नाही. या शब्दावरुन लोखंडापेक्षा ब्राँझ धातूचाच बोध होतो असें जें झिमरचें मत आहे तें बरोबर आहे असें वाटतें. अग्नीलां 'अयोदंष्ट्र' 'अयस्चे दांत असलेला' असें त्याच्या ज्वालांच्या रंगावरुन आणि मित्र व वरुण यांच्या गाडीला 'अयण,' 'अयस्चे खांब असणरी,' असें अस्तमानच्या वेळच्या रंगावरुन म्हटलें आहे, त्यावरुन झिमरच्या मताला पुष्टि मिळते. शिवाय वाजसनेयी संहितेंत सहा धातूंच्या यादींत याचीहि गणना आहे. हिरण्य (सोनें), अयस् , श्याम, लोह, सीस (शिसें), त्रपु (कथील). येथें श्याम (काळे) व लोह (तांबडे) म्हणजे अनुक्रमें लोखंड व तांबें असा अर्थ दिसतो. म्हणून अयस् म्हणजे ब्राँझ असावें. अथर्ववेद आणि मैत्रायणी संहिता वगैरे ग्रंथांत अयस्चे दोन प्रकार येतात. एक श्याम (लोखंड) आणि दुसरा लोहित (तांबें अथवा ब्राँझ). शतपथ ब्राह्मणांत अयस् आणि लोहायस् यांत फरक आहे असें दाखविलें आहे. हे भिन्न धातू एगलिंगच्या मतें लोखंड आणि तांबें व श्रोडरच्या मतें तांबे आणि ब्राँझ हे असावेत. अथर्ववेदांतील एका उता-यावरुन लोखंड हाच अर्थ असावा असें वाटतें. बहुतकरुन ॠग्वेदकालीं बाणाचें टोंक अयस्चें असे असा उल्लेख येतो. येथें अयस्चा लोखंड असा अर्थ असेल. तथापि तांबे आणि त्यापेक्षांहि ब्राँझ हा अर्थ अधिक सयुक्तिक दिसतो. लोखंडाला श्याम अयस् किंवा नुसतें श्याम असें म्हणतात व तांब्याला लोहायस अथवा लोहितायस् असें म्हणतात. धातूचा रस करणें यासंबंधी उल्लेख वारंवार आढळतो. जर धातू चांगली आटविली (बहुष्मातं) तर सोन्याप्रमाणें दिसते म्हणून ती ब्राँझ असावी असा शतपथ ब्राह्मणावरुन अर्थ निघतो. वाजसनेयी संहितेंत अयस्ची भट्टी आणि अयस्चे प्याले यांचाहि उल्लेख आहे. ॠ. १.१६३,९ या ठिकाणीं अयस्चा अर्थ सायणांनी लोखंड असा स्पष्ट केला आहे व दुसरा होणेंहि शक्य नाही. ६.३,५. येथें 'अयसोन धारा' याचा 'परश्वादेर्धारा' असा अर्थ सायण करतात यावरुन अयस् म्हणजे निवळ लोखंडच असावें असें दिसत नाही. कारण परशु वगैरे शस्त्रें पोदालाची किंवा ब्राँझचीं करीत असले पाहिजेत. श्याम, अयस् व लोहित अयस् असे दोन भेद आहेत. कुदळ वगैरे श्याम रंगाच्या अयस्ची करीत व लोहित अयस् हें ताम्र, असें सायण भाष्यांत म्हटलें आहे. यावरुन लोहित म्हणजेच ब्राँझ धातु असावा. शतपथब्राह्मणांत लोहायस् हें अयस्पासून वेगळें आहे असें म्हटलें आहे. लोहायस् म्हणजे तांबें किंवा ब्राँझ असूं शकेल. ॠग्वेदांत 'अयोमुख हषु' असा उल्लेख आहे. म्हणजे बाणाच्या टोंकाला लोखंड लावीत असत असें दिसतें. अथर्ववेदांत श्याम हें विशेषण आहे. यावरुन श्याम हें लोखंड असा अर्थ स्पष्ट होत नाही. अयस् म्हणजे खाणींतील धातु. अयस्ताप म्हणजे लोखंडांची भट्टी लावणारे लोहार.
२चंद्र.- ॠग्वेदांत चंद्र याचा सोने सुवर्ण असा अर्थ आहे. अथर्ववेदांतील (१२.२,५३) चंद्र याचा अर्थ ग्रिफिथ चकचकीत असा घेतो. तैत्तिरीय संहितेवरील भाष्यांत चंद्राचा कोठें हिरण्य व कोठे (आकाशांतील) आल्हादकारक असा अर्थ केला आहे. वाजसनेयी संहितेवरील भाष्यकार 'चंद्रं सुवर्णमस्यास्तीति चंद्री' 'ज्याच्या जवळ सोनें आहे तो' असा करतात.
३हिरण्य.- ॠग्वेद व मागाहूनच्या ग्रंथांत याचा अर्थ सोनें असा आहे. वैदिक कालच्या लोकांनीं सोन्याला अतिशय महत्व दिलें होतें ही धातु. नदीच्या पात्रांत सांपडत असे. सिंधू नदीला सुवर्णयुक्ता व सुवर्णजलयुक्ता अशीं नांवें ॠग्वेदांत दिलेली आहेत. पृथ्वीपासून सोनें काढण्याची त-हा व सोने शुद्ध करण्याची त-हा लोकांस माहीत होती हें ॠग्वेद व तैत्तिरीय संहितेवरुन दिसतें. वैदिक गायकांनां सोनें ही स्पृहणीय वस्तु वाटे. व गाई आणि अश्व यांच्याबरोबर सोन्याच्या राशि (हिरण्यानि) उदार धनिक देत असत असा उल्लेख आहे. सोन्याचा उपयोग गळयांतील व छातीवरील दागिने, बिगबाळया व भांडी करण्याकडे होत असे असा तैत्तिरीय संहितेत उल्लेख आहे. सोन्याचा नेहमीं देवाशीं संबंध दाखविलेला आहे. हिरण्य याचा अनेकवचनीं सोन्याचे दागिने असा अर्थ होतो. सोन्याच्या वजनाचा ज्या अर्थी उल्लेख आहे त्या अर्थी त्या कालीं लोकांनां सोन्याचीं नाणीं ठाऊक होतीं हें स्पष्ट होतें. अष्टाप्रुट् या वजनाचा तैत्तिरीय संहितेंत उल्लेख आला आहे व शतमान म्हणजे शंभर कृष्णल या सोन्याच्या वजनाचाहि त्याच ग्रंथांत उल्लेख आहे. अनेक ठिकाणीं हिरण्य व हिरण्यानि याचा अर्थ सोन्याची नाणीं असा होऊं शकतो. सोन्याला हरित (पिवळया रंगाचे) व कधी कधीं रजत (पांढ-या वर्णावर) अशीं विशेषणें लावलीं आहेत. रजत् यावरुन रुप्याचाहि कदाचित् बोध होत असावा. अशुद्ध धातूपासून रस गाळून हें सोनें लोक काढीत असत. हिंदुस्थानाला सुवर्णभूमि हें नांव यथार्थ होतें असें
१मेगॅस्थेनीस म्हणतो. ॠ. ६.६१,७ 'हिरण्यवर्तनि: सरस्वति' याचा 'जिचा सुवर्णासारखा रथ आहे अशी सरस्वति' असा सायण अर्थ करतात. १.११७,५ याठिकाणीं सोनें पृथ्वींतून काढीत असत असा स्पष्ट उल्लेख नाही. 'पुरलेलें सोनें वर काढल्याप्रमाणें' इतकाच शब्दार्थ होतो. 'मातीत गाडला गेलेला दागिना वर काढतात त्याप्रमाणें' ही उपमा सामान्य आहे. अथर्ववेदांत पृथ्वीला हिरण्यवक्षा असें विशेषण आहे. पृथ्वीच्या पोटांत सोनें आहे म्हणून तिला हें विशेषण लावलें असावें असें वाटतें. लोखंडापासून सोनें काढतात असें शतपथ ब्राह्मणांत म्हटलें आहे.
४रजत.- तैत्तिरीय संहितेंत हिरण्याबरोबर रुपें या अर्थी हा शब्द आलेला आहे. चांदीचे दागिने (रुक्म) भांडी (पात्र) व नाणीं (निष्क) यांचाहि उल्लेख येतो. अथर्ववेदांत व इतरत्र याचा रुपें या अर्थी नामाप्रमाणें उपयोग केलेला आहे.
५रजस्.- यजर्वेद संहितेत रजताप्रमाणें रुपें या अर्थी हा शब्द आला आहे. हा शब्द ॠग्वेदांतहि याच अर्थानें आला आहे असें झिमरचें मत आहे परंतु तें संशयित आहे.
६लोह.- याचा मूळचा अर्थ तांबडा. पुढें तांबे हा अर्थ दाखविण्याकरितां याचा उपयोग आलेला आहे. कदाचित् ब्राँझ ही धातूहि अभिप्रेत असेल. श्यामशब्दापासून निराळा अशा अर्थानें हा शब्द वाजसनेयी व तैत्तिरीय संहितेंत आला आहे. ब्राह्मण ग्रंथांतहि हा शब्द अनेकदां आला आहे.
७त्रपु.- अथर्ववेद व तदनंतरच्या ग्रंथांत याचा अर्थ कथिल असा आहे. याचा विशेषधर्म म्हणजे याचा रस करतां येतो. रॉथच्यामतें हा शब्द त्रपू 'लाजणें' या धातूपासून निघालेला आहे. वर जो त्याचा विशिष्ट धर्म सांगितला त्याचा उल्लेख अथर्ववेदांत आहे.
८लोहित.- विशेषण म्हणून हा शब्द अनेकदां आलेला असून त्याचा अर्थ तांबडा असा आहे व अथर्ववेदांत नपुंसकलिंगी हा शब्द आलेला असून त्याचा तांबें असा अर्थ आहे. विशेषनाम या अर्थी आपस्तंब श्रौत सूत्रांत उल्लेख आलेला आहे.
९श्याम.- हा शब्द अयस् या शब्दाबरोबर आला म्हणजे अथर्ववेदांत त्याचा लोखंड असा अर्थ केला जातो. नुसत्या श्याम शब्दाचाहि अथर्ववेद व मागाहूनचे ग्रंथ यांत हाच अर्थ स्वीकारला आहे.
१०सीस.- 'शिसें' हा शब्द प्रथम अथर्ववेदांत आला असून त्याचा उपयोग ताईताकडे होतो असें म्हटलें आहे. पुढील ग्रंथांतहा शब्द नेहमीं येतो. कोष्टी या शिशाचा वजनासारखा उपयोग करतो असें वाजसनेयी संहितेंत (१९.८०) व इतरत्र उल्लेखिलेलें आहे.
११हरित.- अथर्ववेदांतील कांही उल्लेखांत याचा सोनें असा अर्थ केलेला आढळतो.
१२लोहितायस्.- लोह या शब्दाचा हा पर्याय असून तांबडी धातु, तांबें, या अर्थी मैत्रायणी व काठक संहितेंत हा शब्द येतो
१३जातरुप.- 'मूळचें सौंदर्य असलेला' असा याचा अर्थ असून हा शब्द सोनें या अर्थानें तैत्तिरीय ब्राह्मण व सूत्रग्रंथ यांतून आलेला आढळतो.
१४लोहायस.- शतपथ ब्राह्मणांत तांबडी धातू अशा अर्थानें हा शब्द आलेला आहे व तो अयस् व सोनें ह्यापासून निराळा असें म्हटलेंले आहे. जैमिनीय उपनिषद् ब्राह्मणांत कार्ष्णायस (लोखंड) याच्याशीं लोहायस शब्दाची तुलना आलेली आहे. व तै. ब्राह्मणांत कृष्णायस (लोखंड) ह्याच्याशीं तुनना केलेली आहे. तांबे असाहि अर्थ शक्य आहे.
१५सुवर्ण.- 'चांगल्या रंगाचा'. हे सोन्याचें विशेषण असे. पण पुढें सोनें अशा अर्थानें नामाप्रमाणें उपयोगांत येऊं लागले.
१६कृर्ष्णायस.- उपनिषदातील शब्द. त्याचा अर्थ ‘लोखंड’ असाच असावा.
१७कृष्णायस - (काळी धातु) याचा उल्लेख छांदोग्यउपनिषदांत लोखंड या अर्थानें आला आहे.