प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.       

सार्वजनिक कामें

कूपनामें (ॠग्वेद) /जलाशय (ऋग्वेद) / मार्ग (ऋग्वेद)

अवत- उत्स म्हणजे स्वाभाविक झरा याच्या उलट कृत्रिम म्हणजे खणून तयार केलेली विहीर या अर्थानें अवत शब्द ॠग्वेदांत अनेक ठिकाणीं आढळतो. उत्स हा शब्दहि  कांही ठिकाणीं कृत्रिम विहिरीकरितां वापरलेला आहे. अशा विहिरी झांकून ठेवीत असत आणि त्यांतील पाणी कधींहि आटत नसे, असें वर्णन आहे. त्या विहिरींतून पाणी दगडाच्या चाकाला दोर, पोहोरा लावून काढीत असत. पाणी वर काढल्यावर ते लांकडाच्या भांडयांत ओतीत असत. कधीं कधीं त्या विहिरींतील पाणी रुंद पाटाच्या योगानें शेतांस उपयोगांत आणीत असत.
कूप- ॠग्वेद आणि त्यानंतरचे वाङ्मयांत खांच किंवा कृत्रिम खळगा ह्या अर्थी हा शब्द आला आहे. कांहीं ठिकाणीं हे खड्डे अतीशय खोल असावेत, कारण एका कथेंत त्रित हा एका खळग्यांत पडला असून दुस-याच्या मदतीशिवाय बाहेर निघूं शकला नाहीं असा उल्लेख आला आहे.
प्रपा- याचा अर्थ वाळवंटांतील ‘झरा’ असा आहे. व याचा उल्लेख ॠग्वेदाच्या एका वचनांत आलेला आहे. अथर्ववेदांत याचा नुसता ‘पिणें’ किंवा पेय असाच अर्थ होतो.
वर्त्र- अथर्ववेद व तैत्तिरीयब्राह्मण ह्यामध्यें ह्याचा अर्थ एखाद्या तळ्याचा बांध असा आहे. पूर्वीचे लेख, भाष्यकार व हस्तलिखित प्रती ह्यांत वर्त्र हा शब्द आलेला आहे.