प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.    

सामाजिक
समाजांतील कांही विशेष (ॠग्वेद)

समाजांतील कांही विशेष (ॠग्वेद) / सामाजिक किरकोळ (ऋग्वेद)
स्तेननामें (ऋग्वेद) / सामाजिक क्रियापदें (अथर्व) / सामाजिक स्थितीबोधक विशेषणें ( ऋग्वेद )

अभ्रातर- (भातृहीन) भ्रातृहीन मुली वाईट असतात, बहुतकरून त्या वेश्याच होतात असा ॠग्वेदांत उल्लेख आहे. निरुक्तांत तर भ्रातृहीन कन्येशीं विवाह करूं नये अशी स्पष्ट आज्ञा आहे, कारण अशा मुलीचा पुत्र तिच्या बापाचा असतो (तिच्या बापाचा म्हणजे तिच्या बापाला त्या मुलाला घेण्याचा हक्क असतो.)
अमाजुर- ह्या शब्दाचा अर्थ “वृद्ध कुमारिका” असा आहे. अथवा ज्या कुमारिका बापाच्या येथेंच राहतात त्या (पितृषद्) प्रसिद्ध उदाहरण ‘घोषा’ इचें देतां येईल.
इभ्य- ज्याप्रमाणें अग्नि वनाला दग्ध करितो त्या प्रमाणें राजा आपल्या इभ्यांनां भक्षण करितो अशा संबंधांत ॠग्वेदांत ह्या शब्दाचा अनेकवचनी उपयोग केला आहे; आणि दोन ठिकाणीं छांदोग्य उपनिषदांतहि आला आहे. एका ठिकाणीं समासाचा पहिला शब्द आणि दुस-यांत विशेषनाम अथवा विशेषण. रॉथ, ल्युड्विग आणि झिमर यांनीं ॠग्वेदांत तो शब्द ‘आश्रित’ अशा अर्थी घेतला आहे; परंतु छांदोग्य उपनिषदांत तो ‘श्रीमंत’. ह्या अर्थी योजिला आहे असें रॉथ म्हणतो. पिशेल आणि गेल्डनेर सर्व उता-यांत एकच अर्थ आहे असें म्हणतात. छांदोग्य उपनिषदामध्यें हा शब्द विशेषनाम आहे असें बोथलिंग म्हणतो उ. इभ्यग्राम म्हणजे इभ्य ह्यांचे गांव.
ॠण- ‘कर्ज’ वैदिककालीन भारतीय लोकांची सर्वसाधारण कशी स्थिति होती हें ॠग्वेद व त्यानंतरच्या ग्रंथांतील उल्लेखांवरून उघड दिसतें. जुगाराच्या वेळी कर्ज काढीत असत असा उल्लेख अनेक वेळ केलेला आहे.  कर्जमुक्त होणें ह्याला शब्दसमुच्चय ‘ॠणम् नथामसि’ असा आहे परत न देण्याच्या उद्देशानें कर्ज काढीत असत असाहि उल्लेख आहे. कर्ज परत न देण्याचा परिणाम फार भयंकर होत असे; कदाचित् जुगा-याला दास देखील व्हावें लागे. सावकारलोक ॠणकोंनां, चोर वगैरे अपराध्यांप्रमाणें, त्यांनां किंवा त्यांच्या मित्रांनीं कर्ज परत द्यावें म्हणून खांबाला (द्रुपद) बांधीत असत. व्याजाची रक्कम काय होत असे हें समजणें अशक्य आहे. ॠग्वेद व अथर्ववेद ह्यांतील एका उता-यांत आठवा (शफा) आणि सोळावा (कला) हिस्सा देत असत असा उल्लेख आहे, परंतु ते व्याज देत असत किंवा मुदलाचा भाग देत असत हें नक्की कळत नाहीं. असा तर्क करण्यास हरकत नाहीं कीं व्याज माल किंवा धान्य रूपानें देत असत. सायण कला व शफा या शब्दाचें शरीरावयव असे अर्थ करितात. व्याज हें वंशपरंपरा द्यावें लागत असे किंवा काय हें कांही समजत नाहीं. कौशिक सूत्रांत असे आहे कीं, अथर्ववेदांतील तीन सूक्तांत सावकाराच्या मरणानंतर कर्ज दिले आहे असें लिहिले आहे. ॠणकोच्या नातेवाइकांनीं कर्ज द्यावे अशाबद्दल स्पष्ट आधार नाहीं. (वरील अर्थ सायणांनीं भाष्यांत दिला नाहीं.) झिमर म्हणतो कर्जाची फेड साक्षीदारांच्या समोर होत असे कारण भांडणाच्या वेळीं त्यांनां बोलावण्यास ठीक पडे. हें अनुमानल फक्त अथर्ववेदांतील एका संदिग्ध सूक्तावर आश्रयभूत असल्यामुळें खात्रीलायक नाहीं.
कर्पद (वेणी) कपर्दिन् (वेणी)- हे शब्द वैदिककालीन वेणी घालण्याच्या चालीचे सूचक आहेत. कुमारीचे केस चार वेण्यांत गुंडाळलेले (चतुस-कपर्दा) आणि सिनी, वाली देवीचे केंस चांगली वेणी असलेले, (सु-कपर्दा) असत. पुरुषांचेहि असेच वेणी घातलेले केस असत, कारण, रुद्र आणि पूषन् ह्यांचे असे केंस होते, आणि उजव्या बाजूला वेणी असणें (दक्षिणतस्कपर्द) ही वसिष्ठ ह्यांची खूण होती. ह्याची उलट बाजू म्हणजे केंस मोकळें ठेवणें होय.
कितव- ॠग्वेद आणि त्यानंतरच्या ग्रंथांत हा शब्द ‘जुगारी’ अशा अर्थी बराच वेळ आला आहे. बाप मुलाला जुगाराबद्दल धमकावीत आहे असें दाखविले आहे (२.२९,५) कर्जमुक्त होण्याकरितां जुगारी आपल्याला आणि आपल्या मुलाबाळांनां विकून दास्य पत्करीत असे (१०.३४) निरनिराळया जुवेबाजांकरितां युजर्वेदसंहितेंतील शास्त्रीय नांवे आदिनव-दर्श, कल्पिन, अधि-कल्पिन् आणि सभास्थाणु इत्यादी आली आहेत. बिनधोक ह्या सगळयांचा अर्थ सांगतां यावयाचा नाहीं, तरी शेवटच्या शब्दाचा मनुष्याचें त्याच्या (जुगाराच्या) जागेवर (सभा-स्थाणु) भक्तीमुळें औपरोधिक नांव ‘जुगाराच्या जागेचा खांब’ असा असावा. पहिल्या नांवाचा श्बदशः अर्थ ‘दुर्भाग्य पहणारा’, आणि आपल्या प्रतिपक्ष्याची चूक झटकन्  लक्ष्यांत येत असेल म्हणून अथवा आपल्या प्रतिपक्ष्याचा पराभव पाहण्याची उत्सुकता म्हणून हें नांव निघालें असावें.
खृगल- (अथवा अर्थवेदाच्या पैप्पलादग्रंथांत खुगिल असा पाठ आहे) ॠग्वेदांत एकदां आणि अथर्ववेदांत एकदां हा संदिग्ध शब्द आला आहे. पहिल्यांत ‘कुबडी’ असा अर्थ पाहिजे; आणि दुस-यांत सायण म्हणतो कीं, याचा अर्थ तनुत्राण असा आहे, परंतु हा अर्थ अगदींच अनिश्चित आहे.
जार- पूर्वीच्या ग्रंथांत जार (प्रेम करणारा) ह्या शब्दाला वाईट अर्थ नव्हता. व तो शब्द कोणाहि प्रेमी माणसाला लावीत असत पण हें शक्य आहे कीं, पुरुषमेधामध्यें असलेला जार हा व्यभिचारप्रेमी गणला असला पाहिजे. जार शब्दाचा हाच अर्थ बृहदारण्यकोपनिषदांत स्वीकारलेला आहे व इंद्राला गौतमस्त्री अहल्या हिचा जार म्हटलेले आहे.
दक्षिणतस्कपर्द- हे विशेषण वसिष्ठ लोकानां ॠग्वेदामध्यें लावलेले असून उजवीकडे केसांची वेणी घालण्याच्या चालीचा उल्लेख केलेला आहे.
१०दिधिषु- ॠग्वेदामध्यें ह्याचा अर्थ विवाहप्रार्थना करणारा, असा आहे. हा शब्द एखाद्या नातेवाइकास बहुत करून दिरास लावलेला आहे व ह्या दिरानें और्ध्वदेहिक संस्काराचे वेळीं नव-याप्रमाणें वागावयाचें असतें व जर त्या स्त्रीला मृत नव-यापासून अगोदर मूल झालें नसेल तर ज्यू लोकांत पूर्वी असलेल्या चालीप्रमाणें त्या दिरानें त्या आपल्या भावजयीशीं विवाह करून संतति उत्पन्न करावयाची असते. हिलेब्रँट व लानमन असें म्हणतात कीं, दिधिषु ह्याचा मूळचा अर्थ प्रेमयाचना करणारा असा होता व तो पुढें ज्या राजाची महिषी पुरुषमेधाचे वेळीं बलि दिलेल्या मासाचे जवळ निजलेली आहे व ज्यानें पुन्हां तिचा स्वीकार केला आहे त्या राजाला हा लावलेला आहे. पण हा अर्थ मुळींच संभवनीय नाहीं. हा शब्द आपल्या आईशीं विवाह करूं इच्छिणा-या व ही आई बहुतेक सूर्या असावी जो पूषन त्यालाहि लागू आहे.
११दीर्घायुत्व- ‘दीर्घायुत्व’ ही नेहमीची प्रार्थना वेदिक आर्य लोक करी असत.संहिता व ब्राह्मणग्रंथ ह्यांमध्यें चिरंजीवित्व हें कधीहि निंद्य मानलेले नाहीं व अथर्ववेदांमध्यें आयुष्य वाढविण्याकरितां मंत्र सांगितलेले आहेत.
१२दूत- निरोप घेऊन जाणारा किंवा परराष्ट्राकडे निरोप घेऊन जाणारा कामगार अशा अर्थानें ॠग्वेदामध्यें अनेक वेळां व मागाहून झालेल्या ग्रंथांत अलंकारिक प्रयोगांत हा शब्द आलेला आहे. मागाहून झालेल्या काळांत जी कामगिरी दूत करीत असे तीच कामगिरी पूर्वीच्या काळांत सूत करीत असे.
१३नामधेय- नांव अशा अर्थानें ॠग्वेदामध्यें व वारंवार मागाहून झालेल्या वाङ्मयांत हा शब्द आलेला आहे.
१४नामन्-ॠग्वेदापासून पुढें झालेल्या ग्रंथांत हा शब्द नेहमींचा आहे. गृहसूत्रांमध्यें मुलांची नांवे कशीं असावीत ह्याबद्दल विस्तृत नियम दिलेले आहेत. पण गुप्त व सामान्य नांव ह्यांमध्ये जो फरक दाखविला आहे तो अधिक महत्त्वाचा आहे तरी पण गुप्त नांवाबद्दल जे नियम दिलेले आहेत ते सुसंगत दिसत नाहींत. गुप्त नांव ॠग्वेदांत आलेले आहे व त्याचा ब्राह्मण ग्रंथांतहि उल्लेख आलेला आहे. इंद्रांचे गुप्त नांव अर्जुन होतें असें शतपथ ब्राह्मणांत म्हटलें आहे. ही एक गोष्ट लक्ष्यांत ठेवण्यासारखी आहे कीं, नक्षत्र संबंधी गुप्त नांव देण्याबद्दलच्या नियमाचें स्पष्टीकरण ब्राह्मण ग्रंथांत एखाद्या नमूद केलेल्या गुरूच्या नांवाने केलेलें नाहीं. शतपथ ब्राह्मणांत यश मिळविण्याकरतां दुसरें नांव स्वीकारण्याचा उल्लेख अनेक वेळां आलेला आहे. त्याचप्रमाणें निराळेपणा व्यक्त करण्याकरितां दुसरें नांव धारण करण्याच्या पद्धतीचाहि उल्लेख आलेला आहे प्रत्यक्ष व्यवहारांत ब्राह्मण ग्रंथांत दोन नांवे धोरण करण्याची चाल दिसून येते व हें दुसरें नांव पितृप्राप्त किंवा मातृप्राप्त असे. उदाहरणार्थ कक्षीवत् , औशिज किंवा बृहदुक्थ वाम्नेय (ह्या ठिकांणीं नातें जरी प्रत्यक्ष आईबापापासून आलें नसलें तरी दूरचें खास आहे)कूशाम्ब स्वायव लातव्य किंवा देवतरस् श्यावसायन काश्यप (ह्या ठिकाणीं पितृप्राप्त नांव व गोत्राचें नांव हीं दोन्हीं सापडतात) ही दोन नांवे फारशीं प्रचारांतलीं नाहींत.   दुस-या दोन ठिकाणीं नांवावरून राहण्याच्या ठिकाणांचा बोध होतो; जसें,कौशांबेय आणि गांग्य. वारंवार नुसत्या पैतृक नामांचाच उल्लेख आहे. असें भार्गव, मौद्गल्य इ. किंवा दोन पैतृक नामांचाहि उपयोग केला आहे. साधें नांव पैतृक नामाकरितां उपयोगांत आणलें आहे, जसें त्रसदस्यु. कित्येक ठिकाणीं नव-याच्या नांवावरून बायकोचे नांव बनविले आहे. जसें उशीनराणी, पुरुकुत्सानी, मुद्गलानी इत्यादि.
१५निष्टय- ॠग्वेदामध्यें व उत्तरकालीन ग्रंथ ह्यांमध्यें बाहेरचा गृहस्थ किंवा परकीय माणूस असा ह्याचा अर्थ आहे. म्हणूनच स्वातीनक्षत्रसमूहाला तैत्तिरीय ब्राह्मणग्रंथांत निष्टया असें नांव दिलें आहे. कारण तो नक्षत्रसमूह क्रांतिवृत्तापासून फार दूर आहे.
१६पस्त्यसद्- ‘घरी बसून राहणारा’. ॠग्वेदामध्यें एके ठिकाणीं हा शब्द आलेला असून त्याचा अर्थ सवंगडी असा आहे.
१७पिशुन- ‘विश्वास घातकी’. हा शब्द ॠग्वेद व मागाहून झालेले ग्रंथ ह्यांमध्यें आलेला आहे.
१८पृक्षयामन्- याचा अनेकवचनी उपयोग एक वेळ ॠग्वेदांत आढळतो. याचा अर्थ ‘घोडयावरून जलद प्रवास करणारा’ असा असावा असें रॉथ सुचवितो. पिशेलच्या मताप्रमाणें हें पज्रांचे नांव आहे. आणि त्याचा अर्थ ‘उत्कृष्ट यज्ञ करणें’ असा आहे.
१९प्रतिवेश- ‘शेजारी’ हा शब्द लाक्षणिक अर्थानें उपयोगांत आणलेला ॠग्वेद व तदनंतरचे ग्रंथ यांत आढळतो.
२०प्रवास- दूरदेशी, परदेशी, बाहेर राहणें. हा शब्द ॠग्वेदात आढळतो. परदेशांतून परत आलेल्या मनुष्यानें करावयाचे संस्कार आश्वलायन सूत्रांत दिले आहेत.
२१ब्रह्मचर्य- धार्मिक विद्यार्थ्याची किंवा ब्रह्मचारी आयुष्याची स्थिति. हा विशिष्ट अर्थ प्रथम ॠग्वेदाच्या १० व्या मंडलांत सांपडतो. ही विद्यार्थिदशा हळू हळू वाढली व पुढें पुढें तर ब्रह्मचर्याची रुढि पडून तें फार कडकपणें पाळण्यांत येऊं लागले. पुढें तर वैदिक समाजांत तें पाळणें अवश्यक आहे असें चक्क समजूं लागले व त्याप्रमाणें वैदिक वाङ्मयांत वाद येऊं लागले. अथर्ववेदांत ब्रह्मचर्यावर एक ॠचा हे. तींत धार्मिक विद्यार्थिदशेचे सर्व विशिष्ट गुण वर्णिले आहेत. तरुणाची नवीन जीवनक्रमाशीं गुरू ओळख करून देतो (उपनी), विद्यार्थी मग मृगाजिन परिधान करितो व जटा वाढवितो.  समिधा गोळा करणें, भिक्षा मागणें व तप करणें अशी त्याची दिनचर्या असते. ह्या सर्व विशिष्ट गोष्टी वाङ्मयांत आढळून येतात. विद्यार्थी आपल्या गुरुगृहीं राहतो (आचार्य कुलवासी अंतेवासिक). तो भिक्षा मागतो, यज्ञाप्रीत्यर्थ लांकडें गोळा करतो व घर सांभाळतो. त्याची विद्यार्थिदशा बरीच वाढविता येईल. साधारणतः ती १२ वर्षेपर्यंत असे. परंतु ३२ वर्षे सुद्धां असें असा उल्लेख आहे. कोणत्या वर्षी ही विद्यार्थिदशा सुरू होते हें निश्चित नाहीं. श्वेतकेतु यानें १२ व्या वर्षी अभ्यासाला सुरुवात केली, व १२ वर्षे अध्ययन केलें. गृहसूत्रांत नुसत्या तीन आर्य जातींनांच या विद्यार्थिदशेंतून जावें लागत असें असें गृहीत धरलें आहे. परंतु ही गोष्ट उपाध्यायांच्या शाब्दिक नियमापलीकडे गेली असेल असें वाटत नाहीं. सांप्रत ज्याप्रमाणें ब्रह्मदेशांतील सर्व प्रकारची मुलें आपला कांहीं काल मठांतून विद्यार्थिदशेंत घालवितात, त्याप्रमाणेंच वैश्य आणि क्षत्रिय यांचीं मुलें नियमित कालापैकी कांही काल विद्यार्थीदशेंत घालवीत असावीत यांत शंका नाहीं. क्षत्रिय विद्यार्थिदशेत दिवस घालवीत असावीत असत याला पुढें दिल्याप्रमाणें आधार आहे. अथर्ववेदांत राजा ब्रह्मचर्याने राज्यरक्षण करीत आहे असा उल्लेख येतो (येथे ब्रह्मचर्याचे बरेच अर्थ होतात). काठक संहितेंत  ब्राह्मणेतर असतांहि ज्यानें अध्ययन केले आहे, पण त्यांत प्रसिद्धि मिळविली नाहीं अशा एकाच्या हितार्थ कांही विधि करण्याचा विचार आलेला आहे, तेथें ही गोष्ट अगदीं स्पष्ट होते. तसेच जनक वेद आणि उपनिषदें पढला होता अशा प्रकारचा उल्लेख वारंवार येतो. परंतु, सामान्यतः क्षत्रिय हे युद्धकलाच शिकत असत.
२२मुषीवान्- ॠग्वेदांतल्या एका उता-यांत ‘हरण करणारा’ या अर्थी हा शब्द आलेला आहे.
२३यक्ष- ॠग्वेदांत आणि अथर्ववेदांत त्याचा अर्थ लुडविगच्या मताप्रमाणें मेजवानी, किंवा देशी टीकाकारांच्या मताप्रमाणें पवित्र चाल. परंतु खरोखर याचा कार्य अर्थ आहे याबद्दल पुष्कळच संशय आहे.
२४रहसू- गुप्तरीतीनें गर्भ धारण करणारी. ॠग्वेदांत लग्न न झालेल्या मातेला हा शब्द लाविलेला आहे.
२५वहतु- ॠग्वेद व उत्तरकालीन ग्रंथ ह्यांमध्ये हा शब्द आलेला असून त्याचा अर्थ मोठया समारंभानें नव-या मुलीस तिच्या बापाच्या घरापासून नव-याच्या घराकडे नेणें असा आहे.
२६व्राजपति- ॠग्वेदामधल्या एका लेखांत हा शब्द आलेला आहे व त्यांत असें म्हटलें आहे कीं, ज्याप्रमाणें व्राजपतीबरोबर कुलपति जातात त्याप्रमाणें इंद्राबरोबर (तो बाहेर गेला असतानां) त्याचे सखे जातात. झिमरचें असें मत आहे कीं, ह्यावरून ग्रामणीच्या हाताखालीं लढाईत असलेले कुटुंबातले मुख्य पुरुष असा बोध होतो पण व्हिटने म्हणतो कीं व्राजपति म्हणजे ग्रामणीच नव्हे तर कुंटुंबांतले मुख्य पुरुष म्हणजे पुढारी ह्यांनीं परिवेष्टित असा सरदार असा त्याचा अर्थ हे व तो अर्थ बरोबर दिसतो. अथर्ववेदामध्यें एके ठिकाणी नुसता व्राज शब्द आलेला आहे, व तो ‘सैन्यामध्यें’ अशा अर्थी क्रियाविशेषण म्हणून आलेला आहे.
२७व्रात- ॠग्वेदामध्यें व उत्तरकालीन ग्रंथांत सैन्य ह्या अर्थानें हा शब्द अनेकदा आलेला आहे. एके ठिकाणीं ॠग्वेदांत मरुतांच्या सैन्याचा शर्ध, व्रात व गण ह्या तीन निरनिराळया शब्दांनीं निर्देश आलेला आहे. ह्यावरून झिमरनें असें अनुमान काढले आहे कीं, वैदिक काळचें सैन्य, विश्, ग्राम व कुटुंब ह्याप्रमाणें लढत असे. पण हें अनुमान निराधार आहे कारण सैन्याचे निरनिराळें विभाग होते हें दर्शविण्याचा लेखकाचा उद्देश नाहीं. रॉथ म्हणतो त्याप्रमाणें ह्याचा अर्थ संघ असा असणें शक्य नाहीं.
२८संज्ञान- ‘एकमत’ ‘एकसूर’. हा शब्द ॠग्वेदापासून पुढील ग्रंथांत महत्त्वाची गोष्ट म्हणून आलेला आहे. ही गोष्ट घडवून आणण्याकरितां अथर्ववेदांत पुष्कळ मंत्र दिलेले आहेत. वैदिक कालच्या लहान गावांत आर्थिक स्वावलंबनाचा अभाव व गांवचा लहान आकार ह्यामुळे शांतता नांदणें अशक्य होतें.
२९समन- ॠग्वेदामध्यें हा शब्द आलेला असून ह्याचा अर्थ अस्पष्ट आहे. रॉथ ह्याच्या मतें ह्या शब्दाचा  अर्थ लढाई किंवा उत्सव असा आहे. पिशेलच्या मतें हा एक लोकप्रिय उत्सव होता व उत्सवास बायका या उपभोगार्थ (ॠ. ४.५८,८;६.७५,५) कवीं कीर्तिलाभार्थ (२.१६,७); धनुर्धारी शरसंधान कौशल्याबद्दल पारितोषकें मिळविण्याकरितां  (६.७५,३)व घोडे शर्यतीमध्यें धांवण्याकरितां जात असत. हा उत्सव सकाळपर्यंत किंवा रात्रभर प्रज्वलित असणा-या अग्नीचा लोळ उत्सव करणा-या लोकांनां घालवून देईपर्यंत टिकत (१०.६९,१) असे. तरुण स्त्रिया व पोक्त बायकाहि ह्या उत्सवास नवरा मिळविण्याकरितां (७.२,५) येत व वारांगना ह्या प्रसंगी नृत्य वगैरे मौजेच प्रकार करून पैसे मिळण्याकरितां ह्या उत्सवास येत (वरील अर्थ सायणांनां मुळीच मान्य नाहीं. )वरील स्थलापैकीं कांही ठिकाणीं ‘समनवेयोषा’ अशी पदें आहेत यावरून समन याचा उत्सव असा अर्थ करून त्याचा पाश्चात्य पंडितांनीं स्त्रियांशीं संबंध जोडला आहे. सायणांनीं समन याचा ब-याच स्थळीं संग्राम असा अर्थ केला असून ‘समनेवयोषा’ याचा पतीशीं प्रेमाने  वागणा-या स्त्रीप्रमाणें असा केला आहे.
३०साधारणी - ॠग्वेदामध्यें एके ठिकाणीं महाभारतांतल्या अनेक नवरे असलेल्या द्रौपदीप्रमाणें एखादी स्त्री अशा अर्थानें नव्हें तर मॅक्स मुल्लर म्हणतो त्याप्रमाणें एकादी वेश्या अशा अर्थानें हा शब्द आलेला आहे.
३१सुजात- हें विशेषण ॠग्वेदामध्यें कांही थोडया ठिकाणीं माणसांनां लाविलेले आहे. ह्याचा अर्थ सामान्य लोकाचे उलट सरदार लोक असा करणें म्हणजे ह्या शब्दाची ओढाताण करणें होय.
३२सुभगा- संबोधनार्थी, सुभग ह्या रूपांत ॠग्वेदापासून पुढीलग्रंथात स्त्रियांनीं बहुमानार्थी हें पद लावलेले आहे.
३३सेतु- ॠग्वेद व तदुत्तरग्रंथ ह्यामध्यें जलमय प्रदेश ओलांडून जाण्याकरतां केलेला मार्ग किंवा पूल असा ह्याचा अर्थ आहे. ह्या अर्थावरूनच पुढें प्रचारांत आलेल्या मर्यादा ह्या अर्थाचें स्पष्टीकरण होतें. वैदिक वाङ्मयांत ह्या शब्दाचा बहुतकरून लाक्षणिक अर्थ आलेला आहे.
३४दैधिषव्य- तैत्तिरीय संहितेमध्यें एका मंत्रांत हा शब्द आलेला आहे. ह्याचा उघढ अर्थ (दिधिषू पासून झालेला हा शब्द आहे) थोरल्या बहिणीचे लग्न होण्याचे अगोदर लग्न झालेल्या धाकटया बहिणीचा मुलगा असा आहे. सेंट पीटर्सबर्ग कोशांत दिलेला अर्थ म्हणजे दोनदां लग्न झालेल्या स्त्रीचा मुलगा हा चुकीचा दिसतो.
३५परिमोष- तैत्तिरीय संहितेमध्यें ह्याचा अर्थ चोरी, असा आहे व शतपथ ब्राह्मणांत परि-मोषिन् ह्याचा अर्थ चोर असा आहे.
३६परिवेष्टृ- तैत्तिरीय संहिता, अथर्ववेद व तदुत्तर ग्रंथ ह्यांमध्यें ह्याचा अर्थ परिचारक, विशेषतः अन्न वाढणारा नोकर. ह्या शब्दाचें स्त्रीलिंगी रूप परिवेष्ट्री असें असून त्याचा अर्थ परिचारिका किंवा दासी असा आहे.
३७प्रफर्वी- यचा अर्थ ‘स्वैरिणी’ स्त्री असा आहे. ॠग्वेद, अथर्ववेद आणि यजुर्वेदसंहिता यांमधून हा शब्द आला आहे. सायणमताने ‘पुष्ट शरीर असलेली स्त्री’ असा अर्थ आहे.
३८मलिम्लु- याचा अर्थ यजुर्वेद संहितेंत ‘चोर’ असा असावा आणि विशेषतः महीधराप्रमाणें तर याचा अर्थ “दरवडेखोर” “घरफोडया” असा आहे.
३९रत्निन्- देणगी घेणारे. राजसूय यज्ञाचे वेळीं ज्या लोकांच्या घरांत एक विशेष प्रकारचे कर्म केलें जात असे असे लोक. तैत्तिरीय संहितेंत व तैत्तिरीय ब्राह्मणांत अशा लोकांचे यादी दिलेली आहे. त्या यादींत राजन्य, महिषी (राजाची पहिली बायको), वावाता (राजाची लाडकी बायकोः, परिवृक्ति (राजानें तुच्छ लेखिलेली बायको), सेनानी (सेनाध्यक्ष), सूत (सारथी), ग्रामणी (ग्रामाध्यक्ष), क्षत्ता (कंचुकी), संगृहीतृ (रथी अथवा खजिनदार), भागदुड्(कर वसूल करणारे), अक्षवाप(द्युताची देखरेख करणारा), असा अनुक्रम आहे. शतपथ ब्राह्मणांत हा क्रम पुढीलप्रमाणे आहे. सेनानी, पुरोहीत, महिषी, सूत, ग्रामणी, क्षत्ता, संग्रहीतृ, भागदुह, अक्षवाप, गोविकर्ता आणि पालागाल (जासूद). त्याच ग्रंथांत जिच्या घरांत निर्ॠतीकरितां हविर्भाग समर्पण करावयाच्या दिवशीं जिला घरी राहण्याची मनाई केली म्हणून तुच्छ मानलें अशा व निपुत्रिक अशा राजपत्नीचा उल्लेख केलेला आहे. मैत्रायणी संहितेंत ही यादी पुढीलप्रमाणें आहे. ब्राह्मण, राजन् , महिषी, परिवृक्ति, सेनानी, संग्रहीतृ, क्षत्ता, सूत, वैश्य, ग्रामणी, भागदुह्, तक्ष, रथकार, अक्षवाप आणि गोविकर्ता. काठक संहितेंत गोविकर्ताच्या ऐवजी, गोविच् हा शब्द घातला आहे. आणि तक्ष व रथकाराला गाळलें आहे.मैत्रायणी संहितेंत आलेल्या यादींतील मंडळी देशाच्या राजव्यवस्थेतील नोकर आणि राजाचे घरचे नोकर यांची आहे. यांतील कांहीचा अर्थ (म्हणजे संग्रहितृ, भागदुह्, सूत, ग्रामणी, क्षत्ता, यांचा) संशयित आहे. हे खाजगी नोकर होते किंवा सार्वजनिक होते यांविषयी खात्री नाहीं. पंचविश ब्राह्मणांत आठ वीरांची राजाचे मित्र म्हणून यादी दिलेली आहे त्यांचीं नांवे येणेंप्रमाणेः भ्राता, पुत्र, पुरोहित, महिषी,सूत, ग्रामणी, क्षत्ता आणि संग्रहीतृ. इ.
४०रामा- थोडया उता-यांत पुरुषावर सत्ता असलेली स्त्री या अर्थी हा शब्द तैत्तिरीय संहितेंत आला आहे.
४१अतिथि- अथर्ववेदांतील एका ॠचेंत आदरातिथ्याचें महत्त्व ब-याच सविस्तर रीतीनें वर्णिले आहे. घरांतील यजमान जेवण्यापूर्वी अतिथीला अन्नपाणी वगैरे दिलें पाहिजे असा उल्लेख आहे. तैत्तिरीय उपनिषदांत ‘अतिथि देवोभव’ या वाक्यावरून आदरातिथ्यावर बराच जोर दिलेला दिसतो. ऐतरेय आरण्यकांत (१.१,१) चांगल्या वागणुकीचे लोकच आदरातिथ्याला योग्य होत असें म्हटलें आहे. सोमयज्ञांत सोमवल्ली विकत घेतल्यावर ती घरीं आणिली असतां तिच्या आदराबद्दल एक इष्टि करावयाची असते. कधीं कधीं अतिथीसाठीं गोवध होत असे.
४२जामिशंस- हा शब्द बहीण किंवा नातेवाईक यांच्या कडून आलेले अनिष्ट चिंतन अशा अर्थी अथर्ववेदांत आला आहे व त्यावरून असें सिद्ध होतें कीं त्यावेळीं गृहकलह बरेच होत असत. हीच गोष्ट भ्रातृव्य या शब्दावरूनहि सिद्ध होते.
४३तिरश्च- हा शब्द अथर्ववेदाच्या कांही प्रतींत व्रात्याच्या सिंहासनाच्या (आसंदीच्या) वर्णनांत त्याचे आडवे तुकडे याअर्थी आला आहे.
४४दोह- दूध काढणें या अर्थी हा शब्द अथर्ववेद व इतर संहिता ग्रंथांत आला आहे. सूत्रग्रंथांत सायंदोह व प्रातर्दोह असे शब्द आले आहेत. दोहन या शब्दाचाहि हाच अर्थ आहे.
४५परिष्कंद- (भोंवताली उडया मारणारा) अथर्वातील व्रात्यसूक्तांत हा शब्द आला असून त्याचा द्विवचनी अर्थ ‘रथाच्या दोन बाजूनें पळणारे दोन सेवक’ असा आहे.
४६पितृहन्- हा शब्द अथर्ववेदाच्या पैप्पलादशाखीय प्रतींत ‘बापाचा वध’ या अर्थानें आलेला आढळतो.
४७पुंश्चली- (पुरुषामागून धावणारी) हा शब्द अथर्ववेद, वाजसनेयि संहिता व मागाहूनचे ग्रंथ ह्यामध्यें चवचाल बायको ह्या अर्थानें आलेला आहे. वाजसनेयि संहितेमध्यें पुंश्चलू हेंहि रूप आलेलें आहे.
४८पुनर्भू- अथर्ववेदामध्यें हा शब्द आलेला असून त्याचा अर्थ दुस-यांदा लग्न लावणारी स्त्री असा आहे. अथर्ववेदांत एका व्रताचा उल्लेख आलेला आहे. ह्या व्रताच्या योगानें तिला परलोकीं दुस-या नव-याची (पहिल्या नव्हे) पुनर्भेट होण्याची खात्री असे.
४९प्राश्- याचा अथर्ववेदांत ‘वादविवाद करणारा’ किंवा ‘वादविवाद’ असा अर्थ असून प्रतिप्राश यचा अर्थ ‘वादविवादांतील प्रतिस्पर्धी’ असा आहे.
५०स्तेय- अथर्ववेद व उत्तरकालीन ग्रंथ ह्यांमध्यें ह्याचा अर्थ चोरी असा आहे.
५१दिधिषुपति- काठक व कपिष्ठल संहिता, आपस्तंब, गौतम, वसिष्ठ धर्मसूत्रें ह्यांमध्यें ज्यानीं पाप केलेले आहे अशांच्या यादीमध्यें हें नांव आलेलें आहे. ह्याचा सांप्रदायिक अर्थ पुनर्विवाहित स्त्रीचा नवरा असा आहे. मनु ह्या शब्दाचा असा अर्थ करितो कीं, भाऊ वारल्यावर ज्याच्या मनांत वैवाहिक प्रेम उत्पन्न झालें असल्यामुळें आपल्या भावजयीशीं पुत्रोत्पादनार्थ लग्न लावणारा असा मनुष्य (अनुरज्यते कामतः म्ह. वैवाहिक प्रेम उत्पन्न झालें आहे असा). हा अर्थ शक्य आहे कारण दिधिषु म्हणजे प्रेमयाचना करणारा असा अर्थ आहे व विधवा स्त्रीला जर आपला वर पसंत करितां येत असेल तर तिला सुध्दां प्रेमयाचना करणारी असें म्हणतां येईल. पण दुस-या एका उल्लेखावूरन ह्या शब्दाचा असाहि एक अर्थ आहे कीं जिच्या धाकटया बहिणीनें अगोदर लग्न करून घेतलें आहे अशी थोरली बहीण. ह्या अर्थाला वसिष्ठ सूत्रांतील लेखावरून पुष्टी मिळते व शिवाय अग्रेदिधिषुःपति ह्यावरूनहि तोच अर्थ बरोबर आहे असें वाटतें कारण त्याचा अर्थ थोरल्या बहिणीच्या अगोदर लग्न लावणा-या  धाकटया बहिणीचा नवरा असा होतो. असा अर्थ घेतला तर दिधिषु म्हणजे प्रेमयाचना करणारी थोरली बहीण ठरते. कारण तिच्या आईबापांनीं जर तिचें लग्न अगोदर करून दिलें नाही तर विष्णुधर्मसूत्राप्रमाणें तिला आपल्या नव-याची निवड करता येते (कुर्यात्  स्वयंवरम्)
५२परिवित्त- ह्याचा अर्थ धाकटया भावाचें लग्न झालेलें असून ज्याचें लग्न झालें नाहीं असा थोरला भाऊ असा आहे. हा शब्द काठक संहितेंत, त्याचप्रमाणें अथर्ववेद ह्यामध्यें पापी पुरुषांच्या यादींत आलेला आहे. लुडविग्  म्हणतो कीं, ह्या वेदांत परिवेत्ता असा पाठ आहे पण असें मानण्याची बिलकुल आवश्यकता नाहीं. अगोदर लग्न करणा-या धाकटया भावाला परिविविदान असें नांव जुन्या ग्रंथांत दिलेलें आहे.
५७लक्षण, लक्ष्मन् - आपल्या मालकीची खूण म्हणून तापलेल्या लोखंडानें गुरावर मारलेली खूण असा ह्याचा अर्थ होतो. मैत्रायणी संहितेप्रमाणें ही खूण रेवती नक्षत्राचे वेळीं करावयाची असे, कारण तें नक्षत्र धनसंबंधी गणलें जात असे (रेवती धनयुक्ता)
५४आक्रमण-‘झाडावर चढण्याकरितां पाय-या’ ह्या विविक्षित अर्थी जैमिनीय उपनिषद्ब्राह्मणांत याचा उल्लेख आलेला आहे.
५५दास्य- बृहदारण्यकोपनिषदामध्यें गुलामगिरी ह्या अर्थानें हा शब्द आलेला आहे.
५६नवक- जैमिनीय ब्राह्मणग्रंथांत विभिंदुकीयांच्या सत्रामध्यें बायकोची इच्छा करणारा म्हणून ह्याचा उल्लेख आलेला आहे.
५७निगुस्थ- शांखायन श्रौत सूत्रामध्यें काशी, विदेह व कोशल येथील लोकांनां ही अज्ञात अशा अर्थाची पदवी लाविलेली आहे.
५८परिव्राजक- (शब्दशः अर्थ भ्रमण करणारा) निरुक्तामध्ये योगी असा ह्याचा अर्थ आहे.
५९पालागल- शतपथ ब्राह्मणांत दूत किंवा खोटी बातमी सांगणारा ह्या अर्थानें हा शब्द आलेला आहे.
६०भिक्षु- ‘भिक्षाचारी’ हा शब्द वैदिक ग्रंथांतून आढळत नाहीं.  ब्रह्मचा-याचें भिक्षा मागणें आणि मागाहून निघालेल्या आश्रमधर्माप्रमाणें भिक्षूंचे कर्तव्य यांत फार अंतर आहे. या आश्रमधर्माप्रमामें मनुष्य घरदार सोडून आपल्या आयुष्याच्या शेवटच्या भागांत भिक्षा मागून आयुष्य क्रमितो.
६१मातृहन्- मातृघाती, आईला ठार मारणारा. पाणिनीच्या टीकाकारांनीं दिलेल्या एका वैदिक उता-यांत हा शब्द आढळतो.
६२शिखा- शतपथ ब्राह्मणांत डोक्यावरील शेंडीची गांठ अशा अर्थानें हा शब्द आलेला आहे. केंसाची गांठ बांधून ठेवणें ही स्त्रिया व पुरुष यांची सूतकांत असल्याची खूण असे.
६३श्रमण- भ्रमण करणारा जोगी. हा शब्द उपनिषदांत प्रथम आलेला आहे. फिकच्या मतानें कोणालाहि श्रमण होतां येत असे. मेगस्थिनासच्या वेळीं त्यानें दिलेल्या पुराव्यावरून ही गोष्ट सिद्ध होते पण ही स्थिति खुद्द मध्यदेशाच्या पलीकडे हिंदुस्थानच्या पूर्वेस होती. वैदिक पुरावा एवढाच कीं, वैदिक वाङ्मयांत हें नांव आलेलें आहे व बृहदारण्यकोपनिषदांत व तैत्तिरीय आरण्यकांत तापस शब्द आलेला आहे. बृह. उप. ह्यांत श्रमण ह्याचा अर्थ परिव्राट् (संन्यासी)  तै. आरण्यक ह्यांत तापस असा अर्थ केला आहे.
६४तस्कर- हा शब्द ॠग्वेदांत व तदुत्तर वाङ्मयांत  चोर या अर्थानें वारंवार आला आहे. हा स्तेन शब्दाचाच पर्याय शब्द आहे व या शब्दाबरोबरच स्तेन शब्द येत असतो. वाजसनेयि संहितेंत तस्कर व स्तेन यांची मलिम्लु यांशीं तुलना केली आहे. स्तेन व तस्कर हे वाटमारे व मलिम्लु म्हणजे घरफोडया होय. ॠग्वेदांत तस्करांचे वर्णन ‘तनूत्यज- वनर्गू’ अरण्यांत राहून आपला जीव धोक्यांत घालणारा असें दिलें आहे. ॠग्वेदाच्या एका   उता-यांत (६.५५,६) तस्कर किंवा स्तेन यांच्यावर कुत्रें भुंकल्याचा उल्लेख आहे. यावरून हे घरफोडेहि होते असें दिसतें. चोर रात्रीं हिंडत असतो व ज्या मार्गांवर लोकांनां लुटावयास सांपडेल असें मार्ग त्याला पूर्ण माहीत असतात असा ॠग्वेदांत (८.२९,६) उल्लेख आहे. ॠग्वेदांत चोरीमध्यें दो-यांचा उपयोग केल्याचा उल्लेख आहे. (१०.४,६) परंतु या  दो-यांनीं चोरांस बांधावयाचें किंवा चोरांनीं पकडलेल्या लोकांस (चोरांनीं) बांधावयाचें हें समजत नाहीं (सायणमत चोरांनां दो-यांनीं बांधावयाचें असेंच आहे.) अथर्ववेदांत स्तेन व तस्कर हे गुरेंढोरेंहि चोरीत असत असें म्हटले आहे. (१९.५०,५) तायु हेंहि एक चोराचें दुसरें नांव आहे. हा वाटमा-या नसून घरगुती चोर असावा. कारण जरी त्याला गुरें  चोरणारा (ॠ. १.६५,१) असें म्हटलें आहे तरी त्याचा उल्लेख ‘वस्त्रमथि’ कपडे चोरणारा व ‘ॠणो व तायुः’ ‘ॠणको’ असा आहे. येथें पाश्चात्य पंडितांच्या मतें ॠण ही चोरी होण्याचें कारण ॠणकोला ॠण फेडण्याचें सामर्थ्य नसल्यामुळें उत्पन्न होणारी निराशा हें होय. कारण ॠण न फेडलें तर स्वातंत्र्य जाण्याची त्यास भीति असे. सायणांनीं येथें ॠणयाचा गति असा अर्थ होतो. असेंहि म्हटलें आहे. एके ठिकाणीं तायूनां उषःकालीं नाहीसे होणारे असें म्हटलें आहे. वाजसनेयि, संहितेंतील (१६.२०) शतरुद्रीय नामक कर्मात रुद्राला आव्याधिन् स्तेनानांपति, स्तायूनांपति, तस्कराणांपति, मुष्णतांपति अशीं विशेषणें दिली असून गृत्सपति (फसवे), व्रातपित(लुटारू), असेंहि म्हटलें आहे. ही चोरांची नामावली पाहिल्यावर जर ॠग्वेदामध्यें घरी किंवा वाटेनें चालतांनां रक्षण करण्याबद्दल ॠषींनीं प्रार्थना केल्या असल्या किंवा चोर व लुटारू यांच्या दुष्कृत्यापासून लोकांचे रक्षण करण्याबद्दल अथर्ववेदांत रात्रीला उद्देशून कांही सूक्तें असली तर त्यांत कांहीं नवल नाहीं. पिशेलनें असें एक मत सुचविलें आहे कीं, ॠग्वेदांत एके ठिकाणीं (७,५५)वसिष्ठाला घरफोडया म्हटले आहे. परंतु त्याला हें कबूल आहे कीं, वसिष्ठ हा आपल्या बापाचें (वरुणाचें) घर फोडीत होता व जें स्वतःचें कांही असेल तेंच घेण्याचा तो यत्न करीत होता. तरी पण या सूक्ताचा हा अर्थ निश्चित नाहीं. ॠग्वेदांतील एका (६.५४,१) ॠचेवरील भाष्यांत सायणांनीं पूर्वी जनावरांचा माग काढणारे (पंजाबांतील खोजी लोकांप्रमाणें) लोक असत असें म्हटलें आहे तें झिमरच्या मतें यथार्थ आहे. चोरांनां करावयाची शिक्षा ती ज्याचा माल चोरला असेल त्याच्या मर्जीप्रमाणें होत असे. त्यांनां खोडा घालीत असत असा उल्लेख आहे. पुढें (गौतमधर्मसूत्र ४३.४५, आप स्तंब धर्मसूत्र १.९,२५;४,५) याहून जास्त कडक म्हणजे देहांत शिक्षाहि केली जात असे. चोरीच्या गुन्ह्याची चवकशी कोणत्या प्रकारें होत असे हें समजण्यास ॠग्वेदांत आधार नाहीं. अथर्ववेदांत अग्नीचें दिव्य करण्याबद्दल (चोरीचे शिक्षेकरितां) उल्लेख नाहीं. छांदोग्य उपनिषदांत अग्निदिव्याचा उल्लेख आहे. परंतु चोरीच्या शिक्षेसाठीं नाहीं. चोरीचा माल सांपडला तर तो ज्याचा त्याला परत मिळत असे. पण जर तो माल चोरी करणा-याच्या तांब्यातून दुस-याकडे गेला तर त्याचें काय होत असे हें सांगतां येत नाहीं.