प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.

शरीरावयव

 अंगुलिनामें / प्राण्यवयव / बाहुनामें / शरीरसंबंधी [ ऋग्वेद ]

अजिन -- मृग आणि अज ह्या दोन्ही प्राण्यांच्या कातडयाला हा शब्द लावितात कातडयाचा उपयोग कपडयाकडे होत असें हें शतपथ ब्राह्मणांत जें ''चर्माच्छादित'' ( अजिनवासिन् ) असें विशेषण आहें. त्यावरून, आणि वाजसनेयि संहितेंत चामडें सांधणे व कमाविणें हें धंदे करणा-यांचा जो उल्लेख आहे त्यावरून सिद्ध होतें. मरूत् हे देखील मृगचर्म वापरीत असत असें दिसतें, आणि ऋग्वेदकालीन मुनी देखील अजिनें उपयोगांत आणीत असत.
चर्मन् -- चर्मन् ह्याचा अर्थ चामडें असा असून ह्या अर्थानें याचा ऋग्वेद व तदुत्तर ग्रंथांत उल्लेख आला आहें. गोचर्माचा उपयोग धनुष्याची दोरी गोफण व लगाम करण्याकडे होत असें. विशेषत: या चर्माचा उपयोग दगडांनी ज्या फलकांवर सोमवल्ली कुटली जात असें त्या फलकांवर टाकण्याकरितां होत असें. कदाचित् पिशव्या करण्याकडेहि या चर्माचा उपयोग होत असावा. चर्मण्य हा शब्द ऐतरेयब्राह्मणांत 'कमावलेल्या कातडयाचा जिन्नस' या अर्थानें आलेला आहें. या कलेची सविस्तर हकीकत उपलब्ध नाहीं. पण शतपथब्राह्मणांत खुंटयांनी  [ शंकुभि: ] चामडें ताणण्याचा उल्लेख केला आहें. त्याचप्रमाणें ऋग्वेदामध्यें कातडें ओलें करण्याचा उल्लेख सांपडतो. चामडें कमावण्याची कला ऋग्वेदकालांत सुद्धां लोकांना ठाऊक होती. कारण त्या ग्रंथांत चर्माणि       ( कमावलेली कांतडी ) हा शब्द आलेला आहें.
जरायु -- 'सापाची कात' या अर्थी हा शब्द अथर्ववेदांत एकदां आला आहें. ऋग्वेदांत याचा अर्थ सामान्यत: 'गर्भाच्या बाहेरील वेष्टण' असा आहें. गर्भाच्या अंतर्वेष्टणास उल्व (उल्ब) असें म्हणतात. सजीव प्राण्यांचे वर्ग कधीं कधीं त्यांच्या उत्पत्तीवरून करतात. छांदोग्योपनिषदांमध्यें त्यांचे अंडज, जीवज व उद्भिज्ज असें वर्ग केलेले आहेत. ऐतरेय आरण्यकामध्यें हें वर्गीकरण चार प्रकारचें आहें. तें असें अंडज, जारज किंवा जरायुज ( हा शब्द अथर्ववेदामध्यें आला आहें व बोथलिंकाने हा येथें उगीच घुसडला आहे), उद्भिज्ज व स्वेदज [ म्हणजे कीटकवर्ग ]. जरायु शब्दाचा वैदिक अर्थ वैद्यशास्त्रसंमत आहें. प्राण्यांचे वर्गहि जरायुज, अंडज, स्वेदज व उद्भिज्ज असेच केले आहेत.  
दंष्ट्रा -- याचा अर्थ दांतापैकी एक सुळका असा असून ऋग्वेदांपासूनच्या सर्व ग्रंथांत हा शब्द वारंवार आला आहें.
दन्त्, दंत -- ऋग्वेद व तदुत्तर ग्रंथांत याचा दांत या अर्थी वारंवार उपयोग आलेला आहें. दंतधावन हा विशेषत: यज्ञाची दीक्षा घेण्याच्या वेळचा विधि होता. याप्रमाणें दांत घासल्यानंतर स्नान करणें, श्मश्रु करणें व नखें काढणें ह्या गोष्टी होत. अथर्वसंहितेतील एका सुक्तांत मुलाच्या पहिल्या दोन दांतांच्या प्रगट होण्याबद्दल स्तुति आहें. तथापि या सुक्ताचा निश्चित अर्थ काय हें सांगणेहि कठिण आहें. ऐतरेय ब्राह्मणांत मुलाचें पहिलें दांत पडत असल्याबद्दलचा उल्लेख आहें. ऋग्वेदांत ह्या दंत शब्दाचा अर्थ हत्तीचा सुळा असा आलेला आहें. पूर्वी दंतविद्या प्रचारांत होती की नाहीं ह्याबद्दल वानवाच आहें. ऐतरेय अरण्यकांत हिरण्यदन ( सोन्याचे दांत असलेला ) असा एक शब्द एका माणसाचें नांव म्हणून आलेला आहे व तो सार्थ असावा. कारण सोन्याचें दांत मढावणें ही गोष्ट रोममध्यें 'बारा शिलालिखित' कायदे झाले तेव्हां ठाऊक होती हें निश्चित आहें.
धमनि -- 'वेत'. ऋग्वेदांत एके ठिकाणी व निरूक्तांतील एका उता-यांत त्याचा अर्थ नळी असा आलेला आहें. अथर्ववेदांमध्यें याचा अर्थ शुद्ध रक्तवाहिनी असा, किंवा पक्काशयांतला मार्ग असा आहें. हा शब्द हिरा ह्या शब्दाबरोबर कांही ठिकाणी आलेलां आहें.
नख -- ऋग्वेद व अथर्ववेद यांत त्याचा अर्थ माणसाच्या हातांपायांची नखें किंवा वाघासारख्या क्रूर पशूचा जबडा असा आहें. वैदिक काळीं आर्यलोक आपलीं नखें नेहमीं काढींत असत. विशेषत: दन्तधावन व नखनिकृंतन हीं कृत्यें पवित्र प्रसंगी होत असत असें तैत्तिरीय संहिता वगैरे ग्रंथांतून आढळतें.
परूस् -- ह्याचा पहिला ऋग्वेदांतील अर्थ अवयव किंवा शरीराचा भाग असा असून पुढील ग्रंथांत लक्षणेनें यज्ञाचें किंवा कालाचें भाग हयांनां हा शब्द लावलेला आहें.
पर्ण -- ऋग्वेदांमध्यें व उत्तरकालीन ग्रंथांत पक्ष्याचें पंख असा ह्याचा अर्थ आहें. ऋग्वेदांत दहाव्या मंडळांत एका ठिकाणी ह्याचा अर्थ बाणाची पिसें असा आहे, व पुढें झाडांची पानें असा होऊं लागला.
१०पर्शु -- ऋग्वेदांमध्यें एके ठिकाणी हा शब्द आलेला असून निरूक्तामध्यें ह्याचा अर्थ हौदाच्या (कूप) बाजू असा दिलेला आहें. पण बरगडी हा ऋग्वेदांतील अर्थ सुद्धां बरा जुळतो. या नांवांचे एक राष्ट्रहि होते.
११प्राण -- हा बराच व्यापक पण अनिश्चित अर्थाचा शब्द ऋग्वेदांत व तदनंतरच्या ग्रंथांतून वारंवार उपयोगांत आणलेला आहे. आरण्यकांतून व उपनिषदांतून जगाच्या ऐक्याचें सर्वसाधारण चिन्ह या अर्थानें हा शब्द उपयोगांत आणला आहें. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान या पांच प्राणवायूपैकी एक या संकुचित अर्थानें प्राण उपयोगात आणलेलां आहें.परंतु पुष्कळ वेळां प्राण व व्यान, प्राण व अपान किंवा प्राण व उदान ह्या दोन वायूंचा उल्लेख येतो. कांही ठिकाणी तीन वायू-प्राण, व्यान, अपान, प्राण, व्यान, उदान किंवा प्राण, उदान, समान यांचा उल्लेख आहें. कांहीं ठिकाणीं प्राण, अपान, व्यान व समान, अथवा प्राण, अपान, उदान व व्यान, असा वायुचतुष्टयाचा उल्लेख आहें. शिवाय प्राण हा शब्द ज्ञानेंद्रियें या अर्थी योजिलेला आहें. शतपथ ब्राह्मणांत हीं ज्ञानेंद्रियें सहा आहेत असें म्हटले आहे. बहुधा डोळें, कान, नाकपुडया, ही तीं असावीत. परंतु पुष्कळ ठिकाणी शिराच्या भागांत सात ज्ञानेंद्रिये आहेत असें म्हटलें असून तोंडाचा त्यांत समावेश केला आहें केव्हां केव्हां ती नऊ आहेतं असें म्हटलें असून खालच्या भागांतील दोन इंद्रियांनी हा हिशोब पुरा केला आहें शतपथ व जैमिनीय ब्राह्मणांत ही दहा आहेत असें म्हटलें आहें. काठक उपनिषदांत ही अकरा मानली असून काठक संहितेंत ही संख्या बारा आहेत, व यांत दोन स्तनांचा समावेश केला आहें. सातानंतर कोणत्या अवयवांचा समावेश करावयाचा याचा कांहीं नियम नाहीं. मैत्रायणी संहितेंत दहावा अवयव नाभी आहें. जेव्हां अकरांचा निर्देश करतात तेव्हां ब्रह्मरंध्राचा समावेश करतात. बृहदारण्यक उपनिषदाप्रामणें सातवें रसेंद्रिय व आठवें वागिंद्रिय हीं होत. परंतु सामान्यत: हीं दोन्हीं मिळून एकच इंद्रिय धरतात; व मग आठ व नऊ हीं स्तनद्वय किंवा मलोत्सर्जक इंद्रियें म्हणून मानतात. प्राणाचा कधी कधी सामान्यपणें नुसता श्वासवायु असा अर्थ होतो, व कित्येक वेळां तो अपानाच्या विरूद्ध म्हणून उद्दिष्ट असतो. परंतु या शब्दाचा ( अपान ) स्पष्ट अर्थ उच्छ्वास म्हणजे बाहेर सोडलेला वायु हा आहे. तो 'आंत घेतलेला वायु' असा अर्थ जों सेंटपटिर्सबर्गच्या कोशांत दिला आहे तसा मात्र नाहीं. हा अर्थ पीटर्सबर्गकोशांत घेण्याचें कारण अपान शब्दाचा अप म्हणजें दूर यावरून, उच्छ्वास असा अर्थ कोशकारास वाटला असेल. एतद्देशीय भाष्यकारांनी पहिलाच अर्थ घेतला आहे, आणि दुस-या पुराव्यावरून सुद्धां हाच अर्थ सिद्ध होत असल्यानें बोथलिंक यानें सुद्धां हा अर्थच कबूल केला आहे. प्राणवायूंचें क्षेत्र डोक्यापासून हृदयापर्यंत आहें. तो बुद्धि, हृदय, इंद्रियें व मन यांना धारण करणारा म्हणजे त्यांस प्रेरक असें वर्णन आहें. बाहेरील वायु आंत घेणें, अन्न आंत नेण वगैरे कामें प्राणवायूंची आहेत. वेदांत ज्ञानद्रियें असा जो प्राणाचा  अर्थ केला आहे तो त्या ज्ञानेंद्रियास प्रेरक अशा साहचर्यानेंच असावा. पीटर्सबर्गकोशांत जो 'वायु आंत नेणे असा अर्थ दिला आहे तोच वैद्यशास्त्रसंमत आहे, पण तो प्राण नसून तें एक प्राणवायूंचें कार्य आहे. हें लक्षांत ठेवलें पाहिजें. प्राणवायु व इंद्रियें यांचे साहचर्य किंवा प्रेर्यप्रेरकत्वसंबंध असल्यानें एकमेकांचे शब्द अभिन्न अर्थानें वापरलें असावें. प्राणादि पाच वायू कार्यभेदानें व शरीरातील स्थानभदानें निरनिराळे मानले आहेत.
१२शफ -- शफ म्हणजें खूर. याचा अर्थ एक अष्टमांश भाग असा होतो, कारण गाईचें खूर विभागलेले असतात. उदाहरणार्थ चतुष्पाद प्राण्याचा पाय ( पद ) म्हणजे एक चतुर्थांश भाग असा अर्थ आहे. त्याचप्रामाणें शफ याचा अर्थ आहे. हा अर्थ ऋग्वेदापासून प्रचारांत आहे, व ऋग्वेदांतहि तो वारंवार आला आहे.
१३शरीर -- हा शब्द वैदिक वाङमयांत वारंवार आलेला आहे. वैदिक काळच्या आर्याचें लक्ष्य प्रथमपासून शाररि शास्त्राकडे होते असें दिसतें. उदाहरणार्थ अथर्ववेदांतील एका सूक्तांत शरीराच्या निरनिराळया भागांची नांवें बरींच शुद्ध व व्यवस्थित रीतींनें आलीं आहेंत. ह्या सूक्तांत टांचा (पार्ष्णी), मांस, छिद्रे, पायाचे चौडे (उच्लकौ), गुल्फ, अंगुलि, पादास्थि अस्थिवत् ( गुढघ्याची वाटी ) जंघा, जानूंचे संधी, नंतर जानूंच्या वर असलेला व ज्याला चार बाजू आहेत असा वाकणारा कबंध ( श्रोणी व ऊरू हे ह्या कबंधाचे आधारस्तंभ आहेत ), नंतर छातींतलें हाड ( उरस् ) ग्रीवा, स्तन, खवाटयाचीं हाडें, मानेंची हाडें, स्कंधौ, माकड हाड (पृष्टी:), अंस, बाहू, मस्तकांतील सात छिद्रे, ( सप्त खानि शीर्षणि ) कान, नासिका, डोळे, मुख, हनु, जिव्हा, मस्तिष्क (मेंदू), ललाट, तोंडाचें हाड, (ककातिका) कपाल व हनूची चित्या इत्यादि. हीं जीं अथर्ववेदामध्यें शरीरांच्या भागांच्या नांवाचीं यादी आलेली आहे ती यादी व चरकसुश्रुतामध्यें आलेली यादी यांमध्यें बरेंच साम्य आहे. ह्या दुस-या यादीमुळें होर्नलनें शरीराच्या कांही भागांना जीं नांवे दिलेली आहेत तीं निश्चित होतात. कफोदौ (ह्याचें निरनिराळया हस्तलिखित प्रतींत निरनिराळे पाठ आहेत) ह्याचा अर्थ व्हिटनेच्या मतें अक्षक असा आहे पण सेंटपीटर्सबर्गकोशांत कोपर असा दिलेला आहे. स्कंध ह्याचा नेंहमीचा अनेकवचनी अर्थ मानेची हाडें किंवा बरोबर शब्द हवा असेल तर ग्रैविक मणी असा आहे. हाच अर्थ उष्णिहा या अनेकवचनी शब्दानें सांगितला जातो. पृष्टीचा अर्थ बरगडी असा नव्हें, ( कारण त्याला पर्शु हा शब्द आहे ) तर कशेरूका बाहु म्हणजे कशेरूका किंवा मणक्यांचीं हाडें असा आहें. पृष्टवंश नलिकेच्या भागांत सतरा मणक्याची हाडें व चौतीस कशेरूका बाहू आहेत. मणक्यांच्या हाडांना कीकसा हें अनेकवचनी नांव आहे; व ह्या कीकसेमध्यें कधीं कधीं पाठीच्या कण्याचा वरचा भाग अंतर्भूत होतो तर कधी कधीं पृष्ठवंशाचा उरीभाग त्याचाहि समावेश होतो. अणूक ह्याचा अर्थ पृष्ठवंश किंवा अधिक बारकाईनें बोलावयाचें असेल तर कटिमणि किंवा पृष्ठवंशाचा उरोभाग असा होतो. शतपथ ब्राह्मणांत असें म्हटलें आहे की, कटिमणीमध्यें ( उदरांत ) वीस कशेरूका बाहू असतात व पृष्ठवंशाच्या उरोभागांत बत्तीस असतात, मिळून एकंदर मणक्याचीं सव्वीस हाडें आहेत. पण हल्लीं जी शारीरशास्त्राची माहिती उपलब्ध आहे ती वरून हीं संख्या जरी एकच असली तरी हाडांची वाटणी निराळया प्रकारची आहे. पृष्ठवंशाला करूकर हें नांवहि दिलेलें आहे, व हें नांव नेहमीं अनेकवचनी असतें, व त्याचा अर्थ कशेरूका ( बाहू ) असा आहे; त्याला प्रतिशब्द कुंताप हा आहे. ग्रीवा हा शब्द अनेकवचनी असला म्हणजे मानेची हाडें असा त्याचा अर्थ होतो. हीं मानेंची हाडें शतपथ ब्राह्मणांत सात दिलेलीं आहेत. पण नेहमीं ह्याचा साधा अर्थ श्वासनलिका किंवा जास्त बिनचूक अर्थ म्हणजे कातडयाखालचीं मृदु अस्थींचीं वेष्टणें हा होय. जत्रु हा शब्द अनेकवचनीं आला म्हणजें त्याचा अर्थ ग्रैविक मृदु अस्थि किंवा बरगडींतील मृदु अस्थि असा आहे. शतपथ ब्राह्मणांत यांची संख्या आठ आहे. भंसस् याचा अर्थ जघनास्थि असा घेणें बरें. कुल्ले किंवा गुदप्रदेश असा अर्थ जो व्हिटनें घेतोतो बरोबर नव्हें. हा शब्द अथर्ववेदांत तीनंदा आलेला आहे. शतपथ ब्राह्मणांत हाडांची संख्या ३६० दिलेली आहें. मस्तक व कबंध हयांतल्या हाडांची संख्या दुस-या एका ठिकाणीं खाली दिल्याप्रमाणें आहें. मस्तक तीन प्रकारचें आहें. व त्यांत त्वच्, अस्थि व मस्तिष्क ( मेंदू ) हे आहेतं. मानेंत पंधरा हाडें आहेत. चवदा करूकर व पंधरावें वीर्य हें मध्यवर्ती हाड आहें. वक्षस्थळांत सतरा हाडें आहेंत; सोळा जत्रु व सतरावें उरस् म्हणजें छातींतलें हाड. पृष्ठवंशाची कुक्षिसंबंधी हाडें एकवीस आहेत, वीस कुंताप एकवीसावें उदर हें होय. कदंबाच्या दोन बाजूंनां सत्तावीस हाडें आहेत, सव्वीस पर्शू व दोन बाजूंना एक. अणूकामध्यें तेहतीस हाडें आहेत, बत्तीस कशेरूका बाहू व तेहेतिसावें पृष्ठवंशाचा उरोभाग. यजु:संहितेमध्यें केवळ सांपळयाचींच नव्हें तर शरीराच्या भागांचीहि अनेक नांवे आलेली आहेत. ह्या भागांत लोमन, त्वच, मांस, अस्थि, मज्जन् यकृत, क्लोमन् ( फुफ्फुस ), मतस्नें     ( मूत्राशय ), पित्त, आंत्र ( आंतडी ) गुद:,ल्पीहा, नाभि, उदर, वनिष्ठु ( मलाशय ), योनि, प्लाशि,शेप ( शिश्र ), मुख, शिरस, जिव्हा, आसन् ( तोंड ), पायु, ( पश्चाद्भाग ), वाला, चक्षु, पक्ष्मउत ( भ्रुकटी ), नस् ( नाक ), व्यान ( वास ), नस्य ( नांकातला केस ) कान, भ्रू, आत्मन् ( शरीर किंवा कबंध ), उपस्थ ( मांडया किंवा जननेंद्रिय ), श्मश्रु ( दाढीचे केस ), डोक्याचें केस. दुसरी एक यादी आलेली आहे; तींत नांवे अशी आहेत:- शिरस्, मुख, केश, श्मश्रु, प्राण, चक्षु, श्रोत्र, जिव्हा, वाच्, मनस्, अंगुलि, अंग् अवयव, बाहु, हस्त, कर्ण, आत्मन्, उरस्, पृष्टी, उदर, अंस, ग्रीवा, श्रोणी, ऊरू, अरत्नि ( कोपर ), जानु, नाभि, पायु, भसत् ( गुदद्वार ), अंड, पसस्, जंघा, पद, लोमन्, त्वच, मांस, अस्थि, मज्जन. तिसरी एक यादी आलीं आहे तींत वनिष्टु, पुरीतत्, हृत्कोश, लोमन्, त्वच, लोहित-रक्त, मेदस्, मांस, स्नाव-स्नायु, शिर, अस्थिमज्जन्, रेतस्, पायु, पार्श्व्य, इ. शब्द आहेत. यजुर्वेद संहितांमध्यें घोडयाच्या शरीरांतील हाडांची नांवे आलेलीं आहेत. ऐतरेय आरण्यकामध्यें मनुष्याच्या शरीराचें १०१ भाग कल्पिलें आहेत. एक एक भागांत २५ अवयव आहेत व कदंबांत १०१ हा भाग आहेत. वरच्या दोन भागांत पांच चार संधि असलेंली बोंटें आहेंत. दोन कक्षसीं ( अर्थ संदिग्ध ), दोस् ( बाहु ), अक्ष व अंसफल आहेत. खालच्या दोन भागांत पांच चार संधि असलेली पायाचीं बोंटें, मांडीं, तंगडी इ. भाग आहेत असें सायण भाष्यावरून दिसतें. शांखायन आरण्यकामध्यें डोक्यांतील तींन हाडें, मानेंतील तीन पर्व, अक्ष, बोटांतलें तीन सांधे, व एकवीस अणूक अशी नांवें आलेलीं आहेतं. मैत्रायणी संहितेंत शरीराचें मुख्य भाग चार    ( प्राण, चक्षु, श्रोत्र व वाच् असे ) सांगितले आहेत. पण इतर बरेच फेरफार होऊन एकूण संख्या बारा झालीं आहें. तैत्तिरीय उपनिषदामध्यें एक यादी आलेलीं आहें. तींत चर्मन्, मांस, स्त्रावन्, अस्थि व मज्जन् अशीं नांवे आहेंत. ऐतरेय ब्राह्मणांत लोमन्, त्वच्, अस्थि, मज्जन् व ऐतरेय आरण्यकांत मज्जन्, स्नाव, व अस्थि अशी नांवे एकत्र आहेत. शरीरसंबंधी इतर नांवे कंकुष ( कदाचित् कानाचा भाग ), योनि, कक्ष ( कांख ), दंत, नख, प्रपद व हलीक्ष्ण ( पित्त ) अशीं आहेंत. अथर्ववेदांत जीं प्रत्यंगें ( लहान अवयव ) वर्णिली आहेत त्यांत व चरकानें वर्णन केलेल्या प्रत्यंगांत थोडें अंतर आहे. चरकांत यांची संख्या छपन्न आहें. अथर्ववेदांत पायांच्या चौडयाचा वाचक उच्लक असा शब्द आहे व त्यास चरकांत प्रपद असें म्हटलें आहे. तसेंच अस्थिवत् शब्दाच्या ऐवजी जानु शब्दच वैद्यकांत वापरला आहें. गुडघ्याच्या वाटीस जान्वस्थि असेच म्हटलें आहें. कबंध नांवाचा निराळा अवयव मानला नाहीं. बाकी सर्व अवयव त्या त्या नांवानेंच वैद्यशास्त्रकारांनीं वर्णिलें आहेत. कफोदौ हें नांव वैद्यशास्त्रांत नाहीं. यामुळे या शब्दाचा अर्थ काय हें सांगतां येत नाहीं. स्कंध शब्दाचा अर्थ ग्रैविक मणि असा जो आहे तो वैद्यशास्त्रसंमत नाहीं. याचा अर्थ बाहु व मान या मधला भाग म्हणजे खांदा हा होय. कशेरूका हा शब्दहि वैद्यकांत नाहीं. वैद्यकांत कशेरूकास पृष्टास्थि असेंच म्हणतात व हीं चरकाच्या मतानें पस्तीस आहेत. पृष्ठि कोठपासून कोठपर्यत धरावयाची ह्याबद्दल या दोन ग्रंथांत मतभेद असल्यामुळे हाडें कमी-जास्त होतात. तें काहीं असलें तरी मणक्यास कशेरूका हें निराळें नांव वेदांत आहे व वैद्यकांत नाहीं ह्याचें आश्चर्य वाटतें. प्रत्येक मणक्यास दोन बाजूंना जीं टोकें असतात त्यास कशेरूका बाहु असे म्हणतात; हेहिं मणक्याचें वर्णन वैद्यकापेक्षा जास्त सूक्ष्म व यथार्थ आहे. अणूक हा शब्द वैद्यकांत नाहीं, व कीकसा हाहि नाहीं. हाडांस उद्देशून वेदांत जें निरनिराळें शब्द आहेत, त्यापैकीं बरेच शब्द वैद्यकांत नाहींत. कुंतापन, करूकर हे शब्दहि वैद्यकांत नाहींत. ग्रीवेंत म्हणजें मानेंत नऊ हाडें आहेत असें सुश्रुंतांत लिहिलें आहे व चरकांत तीं दोन मानलीं आहेतं. वैद्यकांत ग्रीवा शब्दाचा अर्थ मान म्हणजें पाठीकडील भाग असा आहे, व पुढील भागांस कंठनाडी असा शब्द आहे. कंठनाडींत चार हाडें आहेत असें वर्णिलें आहे. या सर्व वर्णनावरून ग्रीवा या शब्दाचा अर्थ मान असाच युक्त दिसतो. श्वासनलिका किंवा कातडयाखालची मृदु हाडें असा अर्थ नसावा. कारण सुश्रुत व वेद यांमध्यें या ठिकाणच्या हाडांत साम्य आहे. जत्रु हा शब्दहि निश्चयार्थ नाहीं. सुश्रुतानें हा शब्द शरीसंस्थानांत वापरलाच नाहीं. चरकानें जत्रूचीं हाडें दोन आहेत असें सांगितलें आहे. हीं हाडें म्हणजें छातीच्या आरंभाला जी दोन मोठी हाडें वर आलेलीं दिसतात, व जीं बाहूपाशीं बांधलेली आहेत, ती होत. सुश्रुतानें यांसच अक्षक असें नांव दिलें आहें.
भंषस् हा शब्द वैद्यकांत नाहीं. चरकांत शतपथांतील संख्येइतकी म्हणजें तीनशें साठ हाडांची संख्या दिली आहे. सुश्रुतांत तीं तीनशेच सांगितली आहेत. चरक व शतपथ ब्राह्मण यांची संख्या जरी जुळती आहे, तरी दोहोंचा तपशील जुळत नाहीं. मानेंतील पंधरा हाडें व वक्षस्थलांत सतरा, ही संख्या दोहोंत एकच आहें.
यजुर्वेदसंहितेंत जी शरीराच्या भागांची नांवे आलीं आहेत ती सर्व वैद्यकांत आहेत. वेदांतील हाडांसंबंधी व शरीरावयवांसंबंधी आलेली कित्येक नांवे वैद्यकांत नाहींत; उदाहरणार्थ कंकुष, हलीक्ष्ण, अणूक, कबंध, पुरीतत, वनिष्ठ, भसत, प्लाशि इत्यादि. मानेवर मन्या नांवाच्या दोन शिरा आहेत. त्यामध्यें कफाचा संचय झाला असतां मन्यास्तंभ नांवाचा रोग होतो असें सुश्रुतांत लिहिले आहें. अथर्ववेदांत मन्या नांवाचा जो रोग वर्णिला आहे तो हाच असावा. संस्कृतांत दोन सामासिक पदें विशेषनामवाचक आलीं असतां कोणचें तरी एक उच्चारून संबंध दोहोशी आणतात, जसें सत्यभामा याच्या ऐवजी केवळ भामा म्हणतात. तसेचं मन्यास्तंभ या ऐवजीं नुसतें मन्या लिहिणें संभवतें. गंडमाळा हा रोग स्वतंत्र असल्यामुळें मन्या हे नांव त्या रोगास लावणें बरोबर दिसत नाहीं.
१४शिप्रा -- या शब्दाचा अर्थ संदिग्ध आहे. ह्याचा अर्थ अनेक ठिकाणी 'गाल' असा आहे इतर ठिकाणी ह्याचा अर्थ शिरस्त्राणाचें गालावर येणारे भाग किंवा लगाम असा आहे. अय:शिप्रा (हा शब्द अश्विनांना लावलेला आहे ) मध्यें त्याचप्रमाणें हिरण्यशिप्र, हरिशिप्र व हिरिशिप्र ह्या शब्दसमूहांत ह्या शिप्र शब्दाचा अर्थ, लोखंडाचें, सोन्याचें किंवा पितळेंचें शिरस्त्राण असा असावा. त्याचप्रमाणें शिप्रिन् ह्याचा अर्थ शिरस्त्राण असा होईल.
१५शृंग -- ऋग्वेद व उत्तरकालीन ग्रंथ हयांमध्यें कोणत्याहि जनावराचें शिंग असा याचा अर्थ आहे. अथर्ववेदांत बाणाच्या टोकांलाहि श्रृंग असें म्हटलें आहें.
१६श्मश्रु -- ऋग्वेद व उत्तरकालीन ग्रंथ हयांमध्यें याचा अर्थ दाढी व मिशा म्हणजे केश ह्याच्या उलट असा आहें. पूर्वीच्या काही हजामत करणें ही गोष्ट माहीत होती. तैत्तिरीय संहितेंप्रमाणें दाढी धारण करणें हें पुरूषत्वाचें चिन्ह होतें. मेगॅस्थनीज म्हणतो की, हिंदु लोक आपली दाढी मरेपर्यत नीट निगा करून राखीत असत. हें म्हणणें खरें दिसतें.
१७केश -- डोक्याचें केश या अर्थी ब्राह्मणांत ह्याचा वारंवार उल्लेख आलेला आहे. वेदकालीन आर्यलोक आपल्या केशांची विशेष काळजी घेत असत असें दिसतें. अथर्ववेदांतील ब-याचशा ऋचा केशांची पूर्ण वाढ कोणत्या त-हेंनें होईल ह्या विषयाचें प्रतिपादन करितात. कापणें किंवा श्मश्रु करणें ( वप् ) ह्याचाहि उल्लेख बरेच वेळा आलेला आहे. मनुष्याला लांब केश असणें हें दुर्बलतेचें द्योतक आहे.
१८चक्षुस् -- चक्षुस् म्हणजें डोळा. अथर्ववेदांमध्यें घोर चक्षुस चा उल्लेख असल्यामुळें त्यांवर उपाय म्हणून मंत्र दिलें आहेत. त्रिककुद् पर्वतावरील मलम आणि जंगिड वनस्पति हेहि त्यावर उपाय सांगितले आहेत. विवाहविधींत पत्नीला अशुभदृष्टिबाधा  होऊं नयें म्हणून प्रार्थना आहे ( अघोर चक्षुस् ) ब्राह्मणांत डोळयाच्या रचनेचा त्याचे शुक्ल कृष्ण भाग, आणि वुवुळ ( कनीनका ) असा उल्लेख आला आहे. डोळयांच्या अलजि ह्या नांवाच्या रोगाचाहि उल्लेख आहे. चक्षुस् शब्दाबद्दल वरील सर्व माहिती वैद्यशास्त्रसंमत आहे. यमुनानदींत सांपडणारें अंजन नेत्रक्षोभ घालवितें. हें अंजन म्हणजें ज्यास हल्ली सुर्मा म्हणतात. तेंच होय, यास वैद्यकांत स्त्रोतोंजन म्हणतात.
१९पर्शु -- अथर्ववेद व मागाहून झालेलें ग्रंथ हयांमध्यें याचा अर्थ बरगडी असा आहे.
२०पाद -- अथर्ववेद व मागाहून झालेले ग्रंथ हयांमध्यें पशु, पक्षी किंवा इतर प्राणी हयांचा पाय अशा अर्थानें हा शब्द आलेला आहें.
२१विषाण -- अथर्ववेद व त्यानंतरचें ग्रंथ हयांमध्यें ह्याचा अर्थ जनावराचें शिंग असा आहें.
२२जांबिल -- ( गुडघ्याची खळगी ) हा शब्द मैत्रायणी संहितेंत एकदां आला आहे. जांबिल अशा रूपानें हा शब्द काठक व वाजसनेयि संहितामध्यें आला आहे. वाजसनेयि संहितेवरील टीकेत महीधराचार्य ह्याचा अर्थ ढोपराची वाटी असा घेतो, व त्यांचे असें म्हणणें आहे की हा ढोपराची वाटी असा अर्थ घेण्यांचें कारण तो जांबिल जांबीर म्हणजें महाळुंग फळासारखा दिसतो. हा शब्द वैद्यकांत नाहीं.
२३पाद -- ब्राम्हणं ग्रंथांत चतुर्थ चरण ह्या अर्थानें हा शब्द नेहमीं आढळतो. हा अर्थ, चतुष्पाद प्राण्याच्या चार पायांपैकी एक म्हणजे एक चतुर्थांश ह्या लक्षणेनें झाला आहें.
२४हिता -- ब्राह्मण ग्रंथांत कोठल्याशा अशुद्ध रक्तवाहिनी ( धमनी ) चें हें नांव आहें.
२५उदान -- याचा उल्लेख वाजसनेयि संहितेंत असून पंच प्राणी पैकी पांचव्यांचें हें नांव आहें. कधीं कधीं तो दुसरा म्हणजे प्राणाच्या नंतर आणि व्यान आणि समान यांच्या पूर्वी असा असतो. कधीं कधीं तो प्राण याच्या विरूद्ध व प्राण व अपान यांच्या पूर्वी असतो. उदान हयांत उत् म्हणजें ऊर्ध्व व आन् म्हणजे वर येणें, असा शब्दार्थ आहें. ज्यावेळीं श्वास बाहेर सोडला जातो त्यावेळी जें वायूचें ऊर्ध्व गमन होतें, तें एक उदानांचें कार्य मानतात. शिवाय बोलणें बल, वर्ण, स्मरणशक्ति, या गोष्टीही उदान वायूच्या योगानें होतात. हा नाभीपासून कंठापर्यंत असतो. ह्याचें मुख्य स्थान छाती आहे. शतपथ ब्राह्मणांत हा वायु अन्नपचन करतो अशी कल्पना आढळते व ती उपनिषदांतहि आहे. परंतु तो मरणसमयी कंठाच्या बाहेर येऊन जीवाला घेऊन जातो अशीहि कल्पना आहे.