प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.  

[वनस्पति]

 वनस्पतिविषयक [ॠग्वेद]

ओषधी.- वैदिक वाङ्मयांत उद्भिज्जजगत् याचे साधारणपणें दोन भाग केलेले आहेत. एक ओषधि अथवा वीरुध् 'वनस्पति' आणि दुसरा, वन अथवा वृक्ष 'झाडें' ओषधि हा शब्द वीरुध् ह्या शब्दाशीं विरोध दाखविण्याकरितां योजिला आहे आणि त्याचा अर्थ रोगघ्न शक्ति असलेली अथवा मनुष्याला उपयोगी, असा कोणताहि गुण असणारी वनस्पति असा आहे; आणि वीरुध् हा सर्वसाधारण शब्द झाडेंझुडपें यांनां लावतात. परंतु कधी कधीं जेव्हां वीरुध् हा शब्द ओषधीजवळ असतो, तेव्हां रोगघ्न गुण नसणारीं रोपें असा त्याचा अर्थ असतो. रोपामध्यें कोणकोणते गुण असतात, त्याची सूचि उत्तरकालीन संहितांमध्यें दिली आहे. ती अशी:-मूल, तूल, काण्ड, वल्श, पुष्प आणि फळ, याशिवाय झाडांचे आणखी अवयव स्कन्ध, शाखा व पर्ण हे असतात. अथर्ववेदांत स्पष्ट नाहींत तरी विस्तृत असे वनस्पतीचे भाग केले आहेत. पसरणारी (प्रस्तृणती:), झुडपाळ (स्तश्विनी), देंठ व वेष्टन एकच असणारी (एकशुंगा), वेली (प्रतन्वती:), पुष्कळ देंठ असलेली (अंशुमती), काण्डें असलेली (काण्डिनी), आणि पसरणा-या शाखा असलेली (विशाखा:). ॠग्वेदांतहि वनस्पतींचीं नांवें फलिनी:, पुष्पवती: आणि प्रसूवरी: अशा त-हेचीं दिसतात.
काश.- हा शब्द ॠग्वेदांत एका ठिकाणीं चटया वगैरे करण्याकरिता एक प्रकारचें गवत या अर्थी उपयोगांत आणलेला आहे, परंतु शुद्ध असा पाठ कोणता आहे हें मात्र रॉथला समजत नाहीं. तैत्तिरीय आरण्यकांतहि हाच अर्थ आहे.
किंशुक.- ॠग्वेदांतील विवाहविषयक सूक्तांत या झाडाचें नांव आलें आहे. याच्या पल्लवांनीं विवाहस्थल सुशोभित करीत असत. किंशुक याचा अर्थ पळस असाच मानितात.
कियाम्बु.- हें एका पाण्यांतील रोपाचें नांव असून, ॠग्वेदांतील एका प्रेतसंस्कारविषयक ॠचेंत असें म्हटलें आहे कीं, ही रोपें प्रेत जाळलें असेल त्या ठिकाणीं उगवतात. रुढ व्युत्पत्तीप्रमाणे या शब्दाचा अर्थ 'कांही पाणी असलेले' असा आहे.
कु-शर:- ॠग्वेदांत एका ठिकाणीं शर आणि दुस-या गवताच्या जाती, सर्पांनां लपून राहण्याला योग्य स्थानें असतात असें लिहिलें आहे.
क्षुम्प.-ॠग्वेदांत 'झुडुप' या अर्थी एके ठिकाणीं हा शब्द आला आहे. हें झाड आणि अहिछत्रक (कुत्र्याचें छत्र. आळंबी) एकच आहेत असें लिहिलें आहे.
खदिर.- म्हणजे खैर. ॠग्वेदांत व तदुत्तर ग्रंथांत एका कठिण लांकडाच्या झाडाचें नांव म्हणून हा शब्द आला आहे. अश्वत्थ वृक्षाचें रोप या झाडांवर आपोआप उगवत असे आणि त्याच्यापासून अरुन्धती नांवाची लता उत्पन्न होत असे असें अथर्ववेदांत वर्णन आहे. या लांकडाच्या कठिणपणामुळें स्त्रुवा अथवा दर्वी इत्यादि यज्ञिय पात्रें याचींच करीत असत. त्याच ठिकाणीं ती दर्वी गायत्रीच्या रसापासून तयार करीत असत असें म्हटलें आहे. त्याच्या गाभ्यापासून कात तयार करीत असल्याबद्दल वैदिक वाङ्मयांत आधार सांपडत नाहीं. या गाभ्याचा (सार) ताईत करण्याकडे उपयोग करीत.
घास.-ॠग्वेदांत हा शब्द अश्वमेधीय अश्वाला देण्याचें गवत म्हणून आला आहे. अथर्ववेदांत आणि तदुत्तर ग्रंथांत देखील याचा गवत असा अर्थ आहे.
तरु.- या शब्दाचा नेहमींचा संस्कृत भाषेंतला अर्थ झाड असा आहे. पण तो वैदिक ग्रंथांत आढळून येत नाहीं. फक्त ॠग्वेदांत एका ठिकाणीं हा शब्द आला आहे व सायणाचार्यांनी त्याचा अर्थ झाड असा केलेला आहे; व तसा तो होतोहि. पण 'तरुभि:' या रुपाचा अर्थ निराळाच करावा लागतो.
१०दर्भ.- ॠग्वेद व तदुत्तर ग्रंथ यांत हा शब्द गवताचें नांव म्हणून आला आहे. अथर्ववेदामध्यें याचा उपयोग 'मन्युशमन' म्हणून, व केंस कापले जाणें किंवा छाती बडविली जाणें यांवर तोडगा म्हणून सांगितला आहे. याला भूरिमूल (फार मुळें असलेला), सहस्त्र पर्ण (हजार पानें असलेला) व शतकंद (शंभर कांदे असलेला) अशी नांवें दिली आहेत.
११दूर्वा.- हा शब्द ॠग्वेदांत व पुढील ग्रंथांत वारंवार आलेला आहे. हें गवत ओलसर जागेंत वाढत असें. ॠग्वेदांत एकें ठिकाणीं एक उपमा आलेली आहे व तीवरुन तिचे तंतु तिच्या कांडयाप्रमाणें आडवेच येतात असा अर्थ निघतो.
१२नद- सरोवरांत वाढणारा वेत या अर्थानें हा शब्द ॠग्वेदामध्यें आलेला आहे व अथर्ववेदांत वार्षिक म्हणजे वर्षाकाळीं होणारा या अर्थी आला आहे. स्त्रिया या वेतांच्या चटया तयार करीत असा उल्लेख अथर्ववेद ६.१३८,५ येथें आला आहे. याचा उल्लेख इतरत्रहि वारंवार आलेला आहे.
१३पर्ण.- हें नांव पलाश याला दिलेलें सांपडतें. हा शब्द ॠग्वेदामध्यें अश्वत्थ या शब्दाबरोबर आलेला आहे व अथर्ववेदांत अश्वत्थ व न्यग्रोध या शब्दांबरोबरहि आलेला आहे. अथर्ववेदांत असें म्हटलें आहे कीं, हीं दोन्ही झाडें अभिचारकर्मामध्यें यज्ञपात्रांतल्या अन्नावर घालण्याच्या झांकणाच्या उपयोगी आहेत. या पर्णवृक्षाचा पळीसारख्या (जुहू) किंवा स्तंभासारख्या अगर स्त्रुव्यासारख्या (लहान पळीसारख्या) यज्ञांतल्या वस्तू तयार करण्याचे कामीं उपयोग होतो असेंहि म्हटलें आहे. हा वृक्ष उत्पन्न होण्याचें कारण तैत्तिरीय संहितेंत असें दिलें आहे कीं, गायत्री सोम आणीत असतां, तिचें एक पीस गळून पडलें व त्यापासून हा वृक्ष निर्माण झाला. या वृक्षाचा इतरत्रहि उल्लेख आलेला आहे. याच्या सालीचाहि (पर्णवल्क) उल्लेख आढळतो.
१४पर्वन्.- या शब्दाचा अर्थ वेताच्या गांठी, वनस्पति अगर झाड यांचा सांधा किंवा पेर, अथवा शरीराचा अवयव असा आहे. शिवाय याचा अर्थ विशिष्ट काल-विशेषत: अमावास्या व पौर्णिमा यांचे वेळीं महिन्यांचे जे विभाग पडतात तो असाहि आहे. गेल्डनरच्या मतें सामवेदांतील स्तोत्राचा एक भाग असा या शब्दाचा अर्थ आहे.
१५पवमान.- गाळण्यांतून गाळून शुद्ध होणा-या सोमरसाला हें नांव वारंवार लावलेलें ॠग्वेदांत आढळतें. पुढील ग्रंथांत कांही ठिकाणीं याचा अर्थ (शुद्ध करणारा) वायु असा आहे.
१६पाकदूर्वा- ॠग्वेदांतील एका ॠचेंत कियांबु व व्यल्कश ह्या शब्दांबरोबर हा शब्द आलेला आहे. ज्या ठिकाणीं मृत शरीर दग्ध करण्यांत येतें त्या ठिकाणीं जीं झाडें किंवा ज्या वनस्पती वाढविल्या जात, त्यांपैकी ही एक होय. हा मंत्र तैत्तिरीय आरण्यकांत क्यांबु या पाठानें पुन: आलेला आहे. अथर्ववेदामध्यें हा शब्द शांडदूर्वा असा आलेला आहे. पाकदूर्वा हा शब्द सायणाचार्य म्हणतात त्याप्रमाणें परिपक्व दूर्वा असा असावा. शांड दूर्वा याचा अर्थ भाष्यकारानें निरनिराळया ठिकाणीं निरनिराळा केला आहे. उदाहरणार्थ अंडाकृति मुळया असलेलें एक प्रकारचें धान्य (येथें शांड असा शब्द न समजतां सांड असा समजला पाहिजे) किंवा लांब पेरें असलेलें एक प्रकारचें धान्य (बृहद्दूर्वा) असेंहि याला नांव आहे. उलट पक्षीं तैत्तिरीय आरण्यकांत टीकाकार या पाकदूर्वा शब्दाचा अर्थ एक प्रकारचें लहान जातीचें तृणधान्य असा करितो.
१७पिप्पल.- ॠग्वेदामध्यें दोन ठिकाणीं हा शब्द गूढार्थानें आलेला आहे. पण दोन्हीपैकीं एकाहि ठिकाणीं पिंपळाच्या झाडाचें फळ असा याचा अर्थ होत नाही. बृहदारण्यकोपनिषदामध्यें याचा लहान फळ असा सामान्य अर्थ घेण्याची कांही आवश्यकता नाही; पिंपळाच्या झाडाचें फळ या विशिष्ट अर्थानें संदर्भ चांगला जुळतो; व हाच अर्थ शतपथ ब्राह्मणांतहि अभिप्रेत आहे. अथर्ववेदामध्यें पिप्पली हें स्त्रीलिंगी रुप आलेंलें असून अरुंधतीप्रमाणें जखमांवर इलाज म्हणून तिच्या फळाचा उल्लेख आलेला आहे.
१८पुंडरीक.- ॠग्वेद व तदुत्तर ग्रंथ यांमध्यें कमलाचें केसर असा या शब्दाचा अर्थ आहे. पंचविंश ब्राह्मणांत (१८.९,६) नक्षत्रांच्या प्रकाशानें कमलाचा जन्म होतो असें म्हटलें असून अथर्ववेदांमध्यें (१०.८,४३) कमळाची मनुष्याच्या अंत:करणाशीं तुलना केलेली आहे.
१९पुष्कर.- ॠग्वेदांत आणि तदुत्तर ग्रंथांत याचा अर्थ नील कमल असा आहे. अथर्ववेदांत याच्या गोड परिमलाचा उल्लेख येतो. हें कमल तळयांत उगवत असें; व म्हणूनच तळयांस पुष्करीणी (कमळें असलेलें) असें नांव पडलें. पुष्करस्त्रज या आश्विनांच्या नांवावरुन हें फूल शरीरावर अलंकाराप्रमाणें ते धारण करीत असत असें दिसतें. पळीच्या गोल तोडाला त्याच्या कमळासारख्या आकारावरुन पुष्कर म्हणत असावेत असा तर्क होतो. वरील अर्थानें याचा उपयोग ॠग्वेदातं किंवा ऐतरेय ब्राह्मणांत नि:संशय केलेला आहे. निरुक्ताप्रमाणें पुष्कराचा अर्थ 'पाणी' असा असून हा अर्थ शतपथ ब्राह्मणांतहि आढळतो.
२०प्रसू.- ॠग्वेद व तदनंतरच्या ग्रंथांत याचा अर्थ गवताचे किंवा यज्ञाच्या वेळच्या वनस्पतीचे (सोमाचे) कोंब असा आहे.
२१भेषज्.- 'इलाज,' 'रोगावर उपचार करणारी वस्तु' या अर्थानें हा शब्द ॠग्वेद व तदुत्तर ग्रंथ' यांत नेहमीं येतो. हा शब्द अलंकारिक रीतीनें सुद्धां कोठें कोठें उपयोगांत आणला आहे. वनस्पति, पाणी आणि मंत्रतंत्र यांची औषधांमध्यें गणना केली आहे. अथर्ववेदांतील बहुतेक सर्व वैद्यकी म्हणजे अनुकरणमूलक अगर सादृश्यमूलक अभिचार आहे, उदाहरणार्थ, काविळीचा पिंवळेपणा पक्ष्यांच्या पिंवळट वर्णांत जावो अशी एके ठिकाणीं प्रार्थना केली आहे. आणखी एके ठिकाणीं तर बेडकाकडून ताप घालविण्याविषयीं मंत्र आहे. कारण जलवासी बेडूक हा स्वभावत:च अग्निशामक असल्यामुळें त्याला ज्वरस्ताप सहज शमवितां येईल असें अग्नि व जल यांतील विरोधावरुन समजण्यांत आलें असावें.