प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.
[वनस्पति]
वनस्पतिविषयक [ॠग्वेद] |
१ओषधी.- वैदिक वाङ्मयांत उद्भिज्जजगत् याचे साधारणपणें दोन भाग केलेले आहेत. एक ओषधि अथवा वीरुध् 'वनस्पति' आणि दुसरा, वन अथवा वृक्ष 'झाडें' ओषधि हा शब्द वीरुध् ह्या शब्दाशीं विरोध दाखविण्याकरितां योजिला आहे आणि त्याचा अर्थ रोगघ्न शक्ति असलेली अथवा मनुष्याला उपयोगी, असा कोणताहि गुण असणारी वनस्पति असा आहे; आणि वीरुध् हा सर्वसाधारण शब्द झाडेंझुडपें यांनां लावतात. परंतु कधी कधीं जेव्हां वीरुध् हा शब्द ओषधीजवळ असतो, तेव्हां रोगघ्न गुण नसणारीं रोपें असा त्याचा अर्थ असतो. रोपामध्यें कोणकोणते गुण असतात, त्याची सूचि उत्तरकालीन संहितांमध्यें दिली आहे. ती अशी:-मूल, तूल, काण्ड, वल्श, पुष्प आणि फळ, याशिवाय झाडांचे आणखी अवयव स्कन्ध, शाखा व पर्ण हे असतात. अथर्ववेदांत स्पष्ट नाहींत तरी विस्तृत असे वनस्पतीचे भाग केले आहेत. पसरणारी (प्रस्तृणती:), झुडपाळ (स्तश्विनी), देंठ व वेष्टन एकच असणारी (एकशुंगा), वेली (प्रतन्वती:), पुष्कळ देंठ असलेली (अंशुमती), काण्डें असलेली (काण्डिनी), आणि पसरणा-या शाखा असलेली (विशाखा:). ॠग्वेदांतहि वनस्पतींचीं नांवें फलिनी:, पुष्पवती: आणि प्रसूवरी: अशा त-हेचीं दिसतात.
२काश.- हा शब्द ॠग्वेदांत एका ठिकाणीं चटया वगैरे करण्याकरिता एक प्रकारचें गवत या अर्थी उपयोगांत आणलेला आहे, परंतु शुद्ध असा पाठ कोणता आहे हें मात्र रॉथला समजत नाहीं. तैत्तिरीय आरण्यकांतहि हाच अर्थ आहे.
३किंशुक.- ॠग्वेदांतील विवाहविषयक सूक्तांत या झाडाचें नांव आलें आहे. याच्या पल्लवांनीं विवाहस्थल सुशोभित करीत असत. किंशुक याचा अर्थ पळस असाच मानितात.
४कियाम्बु.- हें एका पाण्यांतील रोपाचें नांव असून, ॠग्वेदांतील एका प्रेतसंस्कारविषयक ॠचेंत असें म्हटलें आहे कीं, ही रोपें प्रेत जाळलें असेल त्या ठिकाणीं उगवतात. रुढ व्युत्पत्तीप्रमाणे या शब्दाचा अर्थ 'कांही पाणी असलेले' असा आहे.
५कु-शर:- ॠग्वेदांत एका ठिकाणीं शर आणि दुस-या गवताच्या जाती, सर्पांनां लपून राहण्याला योग्य स्थानें असतात असें लिहिलें आहे.
६क्षुम्प.-ॠग्वेदांत 'झुडुप' या अर्थी एके ठिकाणीं हा शब्द आला आहे. हें झाड आणि अहिछत्रक (कुत्र्याचें छत्र. आळंबी) एकच आहेत असें लिहिलें आहे.
७खदिर.- म्हणजे खैर. ॠग्वेदांत व तदुत्तर ग्रंथांत एका कठिण लांकडाच्या झाडाचें नांव म्हणून हा शब्द आला आहे. अश्वत्थ वृक्षाचें रोप या झाडांवर आपोआप उगवत असे आणि त्याच्यापासून अरुन्धती नांवाची लता उत्पन्न होत असे असें अथर्ववेदांत वर्णन आहे. या लांकडाच्या कठिणपणामुळें स्त्रुवा अथवा दर्वी इत्यादि यज्ञिय पात्रें याचींच करीत असत. त्याच ठिकाणीं ती दर्वी गायत्रीच्या रसापासून तयार करीत असत असें म्हटलें आहे. त्याच्या गाभ्यापासून कात तयार करीत असल्याबद्दल वैदिक वाङ्मयांत आधार सांपडत नाहीं. या गाभ्याचा (सार) ताईत करण्याकडे उपयोग करीत.
८घास.-ॠग्वेदांत हा शब्द अश्वमेधीय अश्वाला देण्याचें गवत म्हणून आला आहे. अथर्ववेदांत आणि तदुत्तर ग्रंथांत देखील याचा गवत असा अर्थ आहे.
९तरु.- या शब्दाचा नेहमींचा संस्कृत भाषेंतला अर्थ झाड असा आहे. पण तो वैदिक ग्रंथांत आढळून येत नाहीं. फक्त ॠग्वेदांत एका ठिकाणीं हा शब्द आला आहे व सायणाचार्यांनी त्याचा अर्थ झाड असा केलेला आहे; व तसा तो होतोहि. पण 'तरुभि:' या रुपाचा अर्थ निराळाच करावा लागतो.
१०दर्भ.- ॠग्वेद व तदुत्तर ग्रंथ यांत हा शब्द गवताचें नांव म्हणून आला आहे. अथर्ववेदामध्यें याचा उपयोग 'मन्युशमन' म्हणून, व केंस कापले जाणें किंवा छाती बडविली जाणें यांवर तोडगा म्हणून सांगितला आहे. याला भूरिमूल (फार मुळें असलेला), सहस्त्र पर्ण (हजार पानें असलेला) व शतकंद (शंभर कांदे असलेला) अशी नांवें दिली आहेत.
११दूर्वा.- हा शब्द ॠग्वेदांत व पुढील ग्रंथांत वारंवार आलेला आहे. हें गवत ओलसर जागेंत वाढत असें. ॠग्वेदांत एकें ठिकाणीं एक उपमा आलेली आहे व तीवरुन तिचे तंतु तिच्या कांडयाप्रमाणें आडवेच येतात असा अर्थ निघतो.
१२नद- सरोवरांत वाढणारा वेत या अर्थानें हा शब्द ॠग्वेदामध्यें आलेला आहे व अथर्ववेदांत वार्षिक म्हणजे वर्षाकाळीं होणारा या अर्थी आला आहे. स्त्रिया या वेतांच्या चटया तयार करीत असा उल्लेख अथर्ववेद ६.१३८,५ येथें आला आहे. याचा उल्लेख इतरत्रहि वारंवार आलेला आहे.
१३पर्ण.- हें नांव पलाश याला दिलेलें सांपडतें. हा शब्द ॠग्वेदामध्यें अश्वत्थ या शब्दाबरोबर आलेला आहे व अथर्ववेदांत अश्वत्थ व न्यग्रोध या शब्दांबरोबरहि आलेला आहे. अथर्ववेदांत असें म्हटलें आहे कीं, हीं दोन्ही झाडें अभिचारकर्मामध्यें यज्ञपात्रांतल्या अन्नावर घालण्याच्या झांकणाच्या उपयोगी आहेत. या पर्णवृक्षाचा पळीसारख्या (जुहू) किंवा स्तंभासारख्या अगर स्त्रुव्यासारख्या (लहान पळीसारख्या) यज्ञांतल्या वस्तू तयार करण्याचे कामीं उपयोग होतो असेंहि म्हटलें आहे. हा वृक्ष उत्पन्न होण्याचें कारण तैत्तिरीय संहितेंत असें दिलें आहे कीं, गायत्री सोम आणीत असतां, तिचें एक पीस गळून पडलें व त्यापासून हा वृक्ष निर्माण झाला. या वृक्षाचा इतरत्रहि उल्लेख आलेला आहे. याच्या सालीचाहि (पर्णवल्क) उल्लेख आढळतो.
१४पर्वन्.- या शब्दाचा अर्थ वेताच्या गांठी, वनस्पति अगर झाड यांचा सांधा किंवा पेर, अथवा शरीराचा अवयव असा आहे. शिवाय याचा अर्थ विशिष्ट काल-विशेषत: अमावास्या व पौर्णिमा यांचे वेळीं महिन्यांचे जे विभाग पडतात तो असाहि आहे. गेल्डनरच्या मतें सामवेदांतील स्तोत्राचा एक भाग असा या शब्दाचा अर्थ आहे.
१५पवमान.- गाळण्यांतून गाळून शुद्ध होणा-या सोमरसाला हें नांव वारंवार लावलेलें ॠग्वेदांत आढळतें. पुढील ग्रंथांत कांही ठिकाणीं याचा अर्थ (शुद्ध करणारा) वायु असा आहे.
१६पाकदूर्वा- ॠग्वेदांतील एका ॠचेंत कियांबु व व्यल्कश ह्या शब्दांबरोबर हा शब्द आलेला आहे. ज्या ठिकाणीं मृत शरीर दग्ध करण्यांत येतें त्या ठिकाणीं जीं झाडें किंवा ज्या वनस्पती वाढविल्या जात, त्यांपैकी ही एक होय. हा मंत्र तैत्तिरीय आरण्यकांत क्यांबु या पाठानें पुन: आलेला आहे. अथर्ववेदामध्यें हा शब्द शांडदूर्वा असा आलेला आहे. पाकदूर्वा हा शब्द सायणाचार्य म्हणतात त्याप्रमाणें परिपक्व दूर्वा असा असावा. शांड दूर्वा याचा अर्थ भाष्यकारानें निरनिराळया ठिकाणीं निरनिराळा केला आहे. उदाहरणार्थ अंडाकृति मुळया असलेलें एक प्रकारचें धान्य (येथें शांड असा शब्द न समजतां सांड असा समजला पाहिजे) किंवा लांब पेरें असलेलें एक प्रकारचें धान्य (बृहद्दूर्वा) असेंहि याला नांव आहे. उलट पक्षीं तैत्तिरीय आरण्यकांत टीकाकार या पाकदूर्वा शब्दाचा अर्थ एक प्रकारचें लहान जातीचें तृणधान्य असा करितो.
१७पिप्पल.- ॠग्वेदामध्यें दोन ठिकाणीं हा शब्द गूढार्थानें आलेला आहे. पण दोन्हीपैकीं एकाहि ठिकाणीं पिंपळाच्या झाडाचें फळ असा याचा अर्थ होत नाही. बृहदारण्यकोपनिषदामध्यें याचा लहान फळ असा सामान्य अर्थ घेण्याची कांही आवश्यकता नाही; पिंपळाच्या झाडाचें फळ या विशिष्ट अर्थानें संदर्भ चांगला जुळतो; व हाच अर्थ शतपथ ब्राह्मणांतहि अभिप्रेत आहे. अथर्ववेदामध्यें पिप्पली हें स्त्रीलिंगी रुप आलेंलें असून अरुंधतीप्रमाणें जखमांवर इलाज म्हणून तिच्या फळाचा उल्लेख आलेला आहे.
१८पुंडरीक.- ॠग्वेद व तदुत्तर ग्रंथ यांमध्यें कमलाचें केसर असा या शब्दाचा अर्थ आहे. पंचविंश ब्राह्मणांत (१८.९,६) नक्षत्रांच्या प्रकाशानें कमलाचा जन्म होतो असें म्हटलें असून अथर्ववेदांमध्यें (१०.८,४३) कमळाची मनुष्याच्या अंत:करणाशीं तुलना केलेली आहे.
१९पुष्कर.- ॠग्वेदांत आणि तदुत्तर ग्रंथांत याचा अर्थ नील कमल असा आहे. अथर्ववेदांत याच्या गोड परिमलाचा उल्लेख येतो. हें कमल तळयांत उगवत असें; व म्हणूनच तळयांस पुष्करीणी (कमळें असलेलें) असें नांव पडलें. पुष्करस्त्रज या आश्विनांच्या नांवावरुन हें फूल शरीरावर अलंकाराप्रमाणें ते धारण करीत असत असें दिसतें. पळीच्या गोल तोडाला त्याच्या कमळासारख्या आकारावरुन पुष्कर म्हणत असावेत असा तर्क होतो. वरील अर्थानें याचा उपयोग ॠग्वेदातं किंवा ऐतरेय ब्राह्मणांत नि:संशय केलेला आहे. निरुक्ताप्रमाणें पुष्कराचा अर्थ 'पाणी' असा असून हा अर्थ शतपथ ब्राह्मणांतहि आढळतो.
२०प्रसू.- ॠग्वेद व तदनंतरच्या ग्रंथांत याचा अर्थ गवताचे किंवा यज्ञाच्या वेळच्या वनस्पतीचे (सोमाचे) कोंब असा आहे.
२१भेषज्.- 'इलाज,' 'रोगावर उपचार करणारी वस्तु' या अर्थानें हा शब्द ॠग्वेद व तदुत्तर ग्रंथ' यांत नेहमीं येतो. हा शब्द अलंकारिक रीतीनें सुद्धां कोठें कोठें उपयोगांत आणला आहे. वनस्पति, पाणी आणि मंत्रतंत्र यांची औषधांमध्यें गणना केली आहे. अथर्ववेदांतील बहुतेक सर्व वैद्यकी म्हणजे अनुकरणमूलक अगर सादृश्यमूलक अभिचार आहे, उदाहरणार्थ, काविळीचा पिंवळेपणा पक्ष्यांच्या पिंवळट वर्णांत जावो अशी एके ठिकाणीं प्रार्थना केली आहे. आणखी एके ठिकाणीं तर बेडकाकडून ताप घालविण्याविषयीं मंत्र आहे. कारण जलवासी बेडूक हा स्वभावत:च अग्निशामक असल्यामुळें त्याला ज्वरस्ताप सहज शमवितां येईल असें अग्नि व जल यांतील विरोधावरुन समजण्यांत आलें असावें.
२२मुंज.- या शब्दाचा अर्थ एक प्रकारचें तृण असा आहे. मुंज या तृणाची वाढ झपाटयानें होते व त्याची उंची सरासरी दहा फूट असते. विषारी प्राण्यांच्या विसाव्याच्या जागा या अर्थानें याचा उल्लेख ॠग्वेदांत इतर तृणांबरोबर आलेला आहे. त्याच वेदांत मुंजतृण हें शुद्ध करण्याचें अर्थातच सोमरस गाळण्याचें साधन आहे असें म्हटलें आहे. इतर संहिता आणि ब्राह्मण या ग्रंथांतहि या तृणाचा उल्लेख आलेला आहे. हें तृण पोकळ (सुषिर) असून त्याचा उपयोग एखादें उच्च सिंहासन (आसन्दी) विणण्याकडे करीत असत असें शतपथ ब्राह्मणांत म्हटलें आहे.
२३यवस्.- जनावरांकडून खाल्लें जाणारें आणि आरण्याग्नीनें जळून जाणारें एक प्रकारचें तृण. वरील अर्थी ॠग्वेदांत व तदुत्तर ग्रंथांत हा शब्द आला आहे.
२४वनस्पति.- 'अरण्यांतला राजा' याचा मूळचा अर्थ वृक्ष असा असून, खांब, युप किंवा काठी हा जो त्या शब्दाचा अर्थ आहे तो नंतरचा आहे. रथाच्या एका भागाला किंवा सर्व रथाला हा शब्द कांही ठिकाणीं लाविलेला आहे. लांकडी उखळ (वा.सं.९.१२) व लांकडी ताईत (अथ. ६.८५,१) असाहि या शब्दाचा अर्थ असून, सर्वांत श्रेष्ठ सोमवल्ली असा अर्थ कांही ठिकाणी (ॠ.१.९१,५) गर्भित आहे.
२५वल्शा.- याचा अर्थ फांदी असा असून, हा शब्द बहुतकरुन शतवल्शा (शंभर फांद्या असलेला), सहस्त्रवल्शा (हजार फांद्या असलेला), अशा अर्थानें ॠग्वेदांत येतो; व तो समासांत येतो. अलंकारिक भाषेंत हा शब्द संततीला लावलेला आहे.
२६विभीतक-विभीदक.- यांपैकीं दुसरा शब्द हें जुनें रुप असून मोठा वृक्ष असा त्याचा अर्थ आहे. या झाडाच्या सकवच फळाचा उपयोग द्यूतांत होत असे. या झाडाच्या लांकडाचा उपयोग यज्ञांतला अग्नि प्रज्वंलित करण्याकडे होत असे (तै.सं. २.१,५,८).
२७वीरुध्.- ॠग्वेद व मागाहून झालेले ग्रंथ यांमध्यें याचा अर्थ वनस्पति असा आहे. ओषधि या शब्दाशीं तुलना केली तर वीरुध ही इतर वनस्पतींची वाचक आहे. परंतु केव्हां केव्हां या शब्दाचा अर्थ ओषधि असाच असतो.
२८वृक्ष.-ॠग्वेद व तदुत्तर ग्रंथ यांमध्यें झाड या सामान्य अर्थी हा शब्द आलेला आहे. अथर्ववेदामध्यें (१८.२.२५) याचा अर्थ वृक्ष पोखरुन केलेली शव ठेवण्याची पेटी असा आहे. रक्त विप्रोचन करणा-या झाडांच्या दुश्चिन्हांचा उल्लेख षडिंश ब्राह्मणांत आला आहे.
२९वेतस् .- ॠग्वेदामध्यें व तदुत्तर ग्रंथांत एका पाणझाडाचें किंवा तशाच प्रकारच्या एका वेताचें हें नांव आहे. त्याला सोनेरी (हिरण्मय) व अप्सुज (पाण्यांत जन्मलेलें) अशी दोन नांवें आहेत.
३०व्रतति.- ॠग्वेदांत व तदुत्तर ग्रंथांत याचा अर्थ सरपटणारी वनस्पति असा आहे.
३१शर.- ॠग्वेद व तदुत्तर ग्रंथ यांमध्यें हें एक प्रकारच्या वेताचें नांव आहे. बाण करण्याकडे होणारा या वेताचा उपयोग आणि त्याचा वांकण्याचा धर्म अशा दोहोंचा उल्लेख अथर्ववेदांत स्पष्टपणें आलेला आहे.
३२शल्मलि.-हें एका 'रेशमी कापडाच्या' (लॅ०- सल्मलिया-मलबारिका) झाडाचें नांव आहे. याचें फळ विषारी आहे असें ॠग्वेदांत म्हटलें आहे. पण ज्या गाडीमधून नव-या मुलीची मिरवणूक निघत असे ती गाडी या वृक्षाच्या लांकडाची बनवीत असत. हें झाड सर्व वृक्षांत उंच आहे असें याचें वर्णन आलेलें आहे.
३३शाखा.- ॠग्वेद व तदुत्तर ग्रंथ यांमध्यें झाडाची शाखा असा या शब्दाचा अर्थ आहे. शाखा या अर्थानें 'वया' हा शब्द ॠग्वेदामध्यें अधिक वेळां आलेला आहे.
३४सस.- ॠग्वेदामध्यें याचा अर्थ वनस्पति किंवा तृण असा आहे. हा शब्द सोमवल्ली व बर्हि यांनां लावलेला आहे.
३५सैर्य.- कटिकांनीं पीडिलेल्या एक प्रकारच्या गवताचें नांव म्हणून हा शब्द ॠग्वेदामध्यें आलेला आहे.
३६सोम.- ही एक प्रसिद्ध वल्ली असून तिच्यापासून वैदिक कालीं सोमरस काढीत असत. या सोमरसाचें इतकें महत्व आहे कीं, ॠग्वेदाचें एक संबंध मंडळ व इतर मंडलांतील सहा सूक्तें या सोमवल्लीवर लिहिली आहेत. तथापि या सोमवल्लीबद्दल प्रत्यक्ष माहिती फारच थोडी उपलब्ध आहे. या वल्लीच्या फांद्या पिंगट (बभ्रु), तांबडया वर्णाच्या (अरुण) किंवा पिवळट (हरित्) अशा आहेत. हिलेब्रँट म्हणतो त्याप्रमाणें नैचाशाख हें विशेषण जर सोमवल्लीला लावलें तर त्या वल्लीच्या फांद्या खालीं लोंबतात असें म्हटलें पाहिजे. या वल्लीच्या अंकुराला 'अंशु' असें नांव आहे व सर्व वल्लीला 'अंधस्' हें नांव असून त्याचा अर्थ रस असाहि होतो. पर्वन् म्हणजे त्या वल्लीचें पेर होय. 'क्षिप्' (बोट) हें अंकुरांनां नांव आहे. यावरुन हे अंकुर बोटांप्रमाणें असावेत असें दिसतें. क्षणा व वाण हे शब्दहि अंकुरालाच लावीत असत. याचे देंठ वाटोळे नसून त्यास शिरा असत याबद्दल थोडासा पुरावा आहे. ही वल्ली डोंगरांवर होत असे मूजवत् पर्वताची या सोमवल्लीबद्दल विशेष ख्याति होती. या सर्व उल्लेखांवरुन ही वल्ली कोणती हें निश्चयानें सांगतां येत नाहीं. कांही लोकांच्या मतानें हिला लॅटिनमध्यें सारकोस्तेमा ब्हिमिनेल किंवा अस्क्लेपिअस अॅसिडा असें म्हणतां येईल. हिला पहिलें नांवच अधिक शोभेल असें रॉथचें मत आहे. वॅट्च्या मतानें अफगाणिस्तानांतील द्राक्षाची वेल म्हणजेच सोमवल्ली होय. राईसच्या मतानें ऊंस हीच सोमवल्ली असावी. मॅक्समुल्लर व राजेंद्रलाल मित्र यांच्या मतानें बीअर नांवाच्या दारुमध्यें हा रस टाकला जाई असें आहे. म्हणजे, ज्याला इंग्रजींत हॉप् म्हणतां येईल त्याचाच सोमवल्ली हा एक प्रकार असावा. द्राक्षांची वेली किंवा इंग्रजी हॉप् या दोन्हीहि सोमवल्ली नव्हत असें हिलेब्रँट म्हणतो. तेव्हां ही वल्ली आतां नक्की ओळखणें एकंदरींत दुरापास्तच आहे. ही वल्ली कुटण्यापूर्वी ती विकत घेत असत असें यजुर्वेद संहितेंत म्हटलें आहे. हिलेब्रँटचें मतानें ही वल्ली ॠग्वेदकालीं सुद्धां लोकांकडून विकत घेतली जात असे असें आहे. ही डोंगरावर वाढत असे व ती सामान्य माणसांनां दुष्प्राप्य असे. कदाचित् एखाद्या विशिष्ट जातीच्या लोकांच्या किंवा राजाच्या ताब्यांत ही वल्ली असावी व हे लोक म्हणजे किकट असावेत. वस्तुस्थिति अशी आहे कीं, हा (सोमवल्ली विकत घेण्याचा) विधि करणें म्हणजे गंधर्वापासून सोमवल्ली मिळवणें होय व ही जी वल्ली मिळवावयाची क्रिया, तिचें यज्ञरुपानें अनुकरण करणें होय; आणि हेंच अनुकरण नाटकाच्या अनेक मूळांपैकीं एक आहे (?) खरी वल्ली मिळण्याची अडचण असल्यामुळें (कारण ती फार दूर डोंगरांवर असे) त्या वल्लीच्या बदलीं इतर वल्लींचा उपयोग करावा असें ब्राह्मण ग्रंथांत म्हटलेलें आहे ही वल्ली प्रथम दगडांनीं किंवा उखळांत कुटून (उखळाचा उल्लेख फक्त ॠग्वेदांतच आढळतो) मग तिचा रस काढीत असत. दगडांनीं कुटण्याची चाल ॠग्वेदकालीं नेहमींची म्हणून वर्णिलेली आहे. या दगडांनां ग्रावन् किंवा अद्रि अशीं नांवें होतीं. व ते दगड हातांत धरीत. ही वल्ली जवळ जवळ ठेवलेल्या दोन अधिषवण फलकांवर ठेवीत; व मागाहून प्रचारांत आलेल्या विधीप्रमाणें खालीं एक खळगा खणीत व त्यावर फळया ठेवून त्यावर कुटीत. त्यामुळें ती कुटतांनां कुटावयाचे वेळीं मोठा आवाज निघे व त्याचा हेतु आसपासच्या राक्षसांची पीडा होऊं नये हा असे. ही वल्ली चर्मावर व वेदीवर ठेवीत. सध्याच्या प्रयोगांत ही वल्ली वेदीवर ठेवीत नाहींत. या वेदीला कांही ठिकाणीं धिषणा असें नांव दिलें आहे. कधीं कधीं दगडाच्या ऐवजीं उखळ व मुसळ यांचा उपयोग करीत. ही चाल इराणी लोकांकडून घेतली असून ॠग्वेदोत्तर काळांत प्रचारांत नव्हती. देवाला ज्या भांडयांतून सोम अर्पण करीत त्याला चमू हें नांव असें. ज्या भांडयांतून पुरोहित सोमरस पीत त्यांनां कला व चमस अशीं नांवें होतीं. कधीं कधीं चमू म्हणजे उखळ व मुसळ असाहि अर्थ होई. सोमपात्राला चमू म्हणण्याचें कारण कदाचित् त्याचा उखळाप्रमाणें आकार होता हें असावें. ज्या चर्मावर सोमवल्लीच्या कांडया ठेवीत त्याला त्वच् किंवा गोचर्म असें नांव आहे. कोश, रुधस्य, द्रु, वन व द्रोण हीं सर्व सोमपात्रांचीं नांवे आहेत व स्त्रुवा याचा अर्थ लांकडी पळी असा आहे. या वल्लीतून जास्ती रस बाहेर यावा म्हणून तिजवर पाणी शिंपीत असत. ॠग्वेदकालीं ही सोमवल्ली कोणत्या प्रकारानें दाबून तिचा रस कसा काढीत याविषयीं सविस्तर माहिती उपलब्ध नाही. गाळण्यांतून (पवित्र) गाळून तो रस शुद्ध करीत असत. या सर्व रसांत इतर रसांची भेसळ न करतां तो इंद्राला व वायूला अर्पण करीत. पण कण्व लोकांनीं हा प्रघात टाकून दिला होता. या रसाची बभ्रु, हरित्, अरुण, सुगंधि अशीं सामान्यपणें वर्णनें आलेलीं आहेत. सोमरसामध्यें दूध (गवाशिर), दहि (दध्याशिर) व धान्य (यवाशिर) यांचें मिश्रण करीत. या मिश्रणाचें वर्णन लक्षणेंनें अत्क (चिलखत), वस्त्र किंवा वासस् , अभिश्री, रुप, श्री, रस, प्रेयस् (विपुल) व कदाचित् नभस्, सुगंध या शब्दांनीं उल्लेखिलेलें आहे. तीव्र या विशेषणावरुन हें मिश्रण झाल्यावर जो तिखट वास येई त्याचा बोध होतो. रस काढून घेतलेल्या सोमवल्लीच्या काटक्यांनां ॠजीष असें म्हणत. ॠग्वेदांतील कांही स्थलांवरुन असा भास होतो, कीं, सोमरसांत मध मिसळीत असत. कदाचित् ''कोशं मधुश्चुतं'' (ज्यापासून मध गळतो आहे असें भांडें) याचा दोहोंचें मिश्रण करण्याकरितां उपयोग होत असें. या सोमरसांत सुरा मिसळीत कीं नांही याबद्दल निश्चित सांगतां येत नाहीं. दिवसांतून तीन वेळ सोमाचा रस काढीत. अवेस्तामध्यें दोन वेळ रस काढण्याची चाल होती असें दिसतें. सायंकाळीं ॠभूंकरितां, मध्यान्हीं इन्द्राकरितां व सकाळीं अग्नीकरितां सोमसवन करीत. पण इतर देवतांनांहि या प्रसंगीं सोमाच्या आहुती देत. सोमरस पिणारे व तो न पिणारे यांच्यातील सुक्ष्म भेद संहितां ग्रंथांत दाखविले आहेत. ज्या ठिकाणीं सोमवल्लीचा खप होत असे तीं ठिकाणें म्हणजे आर्जीक, पस्त्यावत्, शर्यणावत्, सुषोमा, पंचजनांचा देश वगैरे होत. सोमरसपान केलयावर अंगांत जी तरतरी येई तिचे उल्लेख अनेक वेळां आलेले आहेत. दुस-या एखाद्या उन्मादक पेयाप्रमाणें सोमरस लोकप्रिय होता कीं नाहीं हें सांगणें कठिण आहे. याच्या लोकप्रियतेबद्दल जो पुरावा आहे तो थोडा असून खात्रीलायक नाहीं. मै.सं. ४.७,४ मध्यें निव्वळ सोमरसाबद्दल नापसंती व्यक्त केली आहे. ख-या सोमवल्लीच्या अभावीं इतर वल्लीचा उपयोग केल्यामुळें इतर रसांचें मिश्रण करावें असें कण्व आग्रहानें सांगतात असें जें हिलेब्रँट म्हणतो तें त्याचें म्हणणें यथार्थ असावें. श. ब्रा. ४.१,३,६ येथील वर्णनावरुन वैद्यक पुस्तकांत या वल्लीला वाईट वास येतो असें जें म्हटलें आहे तें खरें ठरतें. पण वैदिक काळची सोमवल्ली व या वैद्यक ग्रंथांत उल्लेखिलेली वल्ली या निरनिराळया असूं शकतील. हा वाईट वास येण्याचें कारण सोमवल्लीच्या ऐवजीं दुसरी वल्ली उपयोगांत आणली गेली असेल अगर खरी सोमवल्ली लांबून आणल्यामुळें जुनी होऊन कुजली जात असेल, हें असावें. ॠ. ८.१८,३०; ३३,१४; ६६,१२; व विशेषत: ७.३३,२ या ठिकाणी असें वर्णन आलें आहे कीं, वसिष्ठ लोकांनीं पाशद्युन्म वायताच्या सोमयज्ञांतून इंद्राला सुदासाकडे नेलें. अवेस्तिक कालांत तिचें तसेंच महत्त्व वर्णिलें आहे. पण या सोमपानानें उपाध्यायांनाहि तसेंच सुख मिळतें असेंहि म्हटलें आहे (ॠ.१.९१.१३; ८.२,१२; १०.१६७,३). या पानामुळें रोग उत्पन्न होतो याबद्दल अनेक उल्लेख आहे (मै.सं.२.२.१३ इत्यादि). इंदाप्रमाणें सोमरस ओकून टाकल्यानें जें पाप उत्पन्न होई त्याची निष्कृति करण्याकरितां सौत्रामणी नामक एका यागाची योजना होती (तै.सं. २.३,२;५,६ श.ब्रा.५.५,४,९; १२.७,१,११). या यागाचें नांव अथर्व. ७.३,२ मध्यें अगोदरच आलें आहे; व हा यागहि नि:संशय जुना आहे. या वनस्पतीचें सध्याचें परंपरागत रुप ठरलें आहे त्याला ही गोष्ट अनुकूल आहे. कारण मॅक्समुल्लरनें उध्दृत केलेल्या वैद्यकी गुणासंबंधी उल्लेखांत ओकारी येण्याचा धर्म उल्लेखित आहे.
३७स्पंदन.-ॠग्वेदामध्यें एके ठिकाणीं एक प्रकारचा वृक्ष असा याचा अर्थ आहे. रॉथचे मतानें हा शब्द स्वंदन असा असून तो रथ या अर्थानें असावा.
३८स्वधिति.- सें पी. कोशाप्रमाणें या शब्दाचा अथ ॠग्वेदामध्यें कांही ठिकाणीं 'कठिण लांकडाचें मोठें झाड' असा आहे. हा अर्थ शक्य दिसतो.
३९ह्लरस्.- रॉथचे मताप्रमाणें ॠग्वेदामध्यें तीन ठिकाणीं सोमाच्या गाळणीचा भाग असा या शब्दाचा अर्थ आहे व तो संभवनीय आहे. पण गेल्डनेरच्या मताप्रमाणें याचा अर्थ अडथळा असा आहे.
४०इक्षु.- पहिल्या प्रथम तैत्तिरीय संहितेंत आणि अथर्ववेद व उत्तर संहिता यांत हा शब्द ऊंस या अर्थी योजिला आहे. तो आपोआप अथवा मशागत करुन उगवत होता हें तेथील संदर्भावरुन कळत नाहीं.
४१करीर.-पर्णहीन झुडुपाचें किंवा त्याच्या फळाचें हें नांव पहिल्यानेंच तैत्तिरीय संहितेंत आलें आहे.
४२कार्ष्मर्य.-तैत्तिरीय संहिता, मैत्रायणी संहिता, आणि शतपथ ब्राह्मण यांत नेहमीं एका झाडाचें हें नांव आलेलें आहे.
४३कूर्च.-तैत्तिरीय संहिता आणि नंतरच्या ग्रंथांत आसना करितां एक गवताची मुष्टि (जुडी) या अर्थी हा शब्द उपयोगांत आला आहे. शतपथ ब्राह्मणांत एका ठिकाणी सुवर्णकूर्चहि आला आहे. यावरुनच मराठीत कुंचली असा शब्द आला असावा.
४४व्कल.-कुवल अथवा बदरीफळ, आणि व्कल हें एकच असून दूध विरजण्याकडे याचा उपयोग करीत असें तैत्तिरीय संहितेंत म्हटलें आहे.
४५गवीधुका, गवेधुका.- गवताच्या जातीचें नांव. गावीधुक आणि गवेधुक हीं विशेषणरुपेंहि आहेत. तें तांदुळाबरोबर (गवीधुका-यवागू) अथवा जवाबरोबर (गवेधुकासक्तव:) कांजी करण्याकरितां शिजवीत असत.
४६निर्यास.-याचा झाडांचा चीक असा अर्थ आहे. तैत्तिरीय संहितेंत (२.१,५,४) याच्या रक्तवर्णावरुन हें निषिद्ध अन्न मानलेलें आहे.
४७पिंजूल.- तृणांकुर किंवा विशेषत: दर्भ याच्या जुडया असा याचा अर्थ आहे. हा शब्द तैत्तिरीय संहिता व ब्राह्मण या ग्रंथांत सांपडतो.
४८पुंजील.- तैत्तिरीय संहिता व तैत्तिरीय ब्राह्मण यामध्यें गवताची लहान पेंढी या अर्थानें व पिंजूलाचा पर्याय म्हणून हा शब्द आलेला आहे.
४९बल्बज.-हें एक प्रकारच्या गवताचें नांव आहे. याचा अथर्ववेदांत उल्लेख येतो. हें गुराढोरांच्या मलमूत्रापासून उत्पन्न होतें असें यजुर्वेदसंहितेंत म्हटलें आहे. याचा बर्हिस् सारखा किंवा जळण म्हणून उपयोग करीत असें आढळतें. ॠग्वेदांत दानस्तुतींत याच्या टोपल्या किंवा इतर वस्तू तयार होत असा उल्लेख आढळतो.
५०बिल्व.- हें एका प्रकारच्या कठिण फळाच्या झाडाचें (बेल) नांव आहे. याचा निर्देश ब्राह्मणांत आणि अथर्ववेदांत केला आहे. तेथें अत्यंत महत्त्वाच्या फळाचा उल्लेख येतो. तैत्तिरीय संहितेंत व ब्राह्मण ग्रंथांत यज्ञांत दिल्या जाणा-या बलीस बांधण्याकरितां कधीं कधीं बिल्व वृक्षाचा स्तंभ (यूप) करीत असत असें म्हटलें आहे. शांखायन आरण्यकांत बिल्व वृक्षाच्या ताइताच्या स्तुतीपर मंत्र आहे.
५१विकंकत.- उत्तरकालीन संहिता ग्रंथांत व ब्राह्मण ग्रंथांत हा शब्द एका झाडाचें नांव म्हणून आलेला आहे. कांही विशिष्ट यागांत अग्नि प्रदीप्त करण्याकडे या लांकडाचा उपयोग करीत असत.
५२सुगंधितेजन.- उत्तरकालीन संहिता व ब्राह्मण ग्रंथांत एक प्रकारचें सुंगधि गवत असा याचा अर्थ आहे. अरणींतून उत्पन्न केलेला अग्नि वेदीवर ठेवतांनां तो पेटण्यासाठी याचा उपयोग करीत असत.
५३स्तंब.- अथर्ववेद व मागाहून झालेले ग्रंथ यांमध्यें गवताचा किंवा कोठल्याहि त-हेचा झुपका अशा अर्थानें हा शब्द आलेला आहे.
५४अजशृंगी.- (बक-याचें शिंग) याची भाष्यकारांनीं विषाणिन् याबरोबर तुलना केली आहे. याची अथर्ववेदांत राक्षसघ्न अशी ख्याति आहे. याचें दुसरें नांव अराटकी हें आहे. वेबर असें सुचवितो कीं हा शब्द 'प्रोसोपिस् स्पिसि जिरा' किंवा 'मिमोसा अॅक्रोमा' या अर्थी असावा.
५५अपामार्ग.-अभिचारामध्यें औषधाकडे मुख्यत्वेंकरुन क्षत्रिय रोगाला या झाडाचा वारंवार उपयोग करितात. अथर्व वेदांत त्याचें ''परत येणारें'' असें वर्णन आहे असें रॉथ आणि झिमर यांचें मत आहे. कारण त्याचे कांटे उलटे असतात (व्हिट्नचेंहि हेंच मत आहे.) अथवा योजकाच्या अंगावरच परत तो मंत्र या औषधीच्या योगानें फिरतो म्हणून हा अर्थ असावा असें ब्लूमफील्डचें मत आहे. या वनस्पतीचे कांटे उलटे असतात म्हणूनच ती मंत्र उलटविण्याकरितां उपयोगांत आणीत असत असें दिसतें.
५६अमूला.- (मूल रहित.) बाणांनां विषारी करण्याकरितां या झाडाचा उपयोग करीत असत असें अथर्ववेद म्हणतो. तथापि 'जंगम मालमत्ता' असा अर्थ ब्लूमफील्ड करतो.
५७अराटकी.- अथर्ववेदांत या झाडाचें एकदांच वर्णन आलें आहे. आणि बहुतकरुन अजशृंगी आणि हें झाड एकच असावें, असें वाटतें.
५८अरुन्धती.- अथर्ववेदांत पुष्कळशा मंत्रांत घाव किंवा आघात बरें करणारें, ताप घालविणारें आणि गाईंनां दूध उत्पन्न करणारें असें या झाडाचें वर्णन आहे. ही वनस्पति बहुधा प्लक्ष, अश्वत्थ, न्यग्रोध, आणि पर्ण अशा झाडांच्या आश्रयानें राहात असते. हिचा रंग सोनेरी आणि देंठ केंसाळ (हिरण्यवर्णालोमश वक्षणाच) असे. हिला सिलाची देखील म्हणत आणि लाक्षा बहुतकरुन हीपासून तयार होत असली पाहिजे.
५९अर्क.-अथर्ववेदांतील एका मंत्रांत अर्क हें एका झाडाचें नांव आहे असें आढळतें. आधुनिक संस्कृतांत हा शब्द मराठींतील रुइ या अर्थानें येतो.
६०अलसाला.-अथर्ववेदांतील एका मंत्रांत हा शब्द धान्यलता अशा अर्थी योजिला आहे.
६१अलाबु.- दूधभोपळा, अथर्ववेदांत त्याचा भांडयासारखा उपयोग करीत असत असा उल्लेख आहे.
६२अवका.- अथर्ववेद आणि तदुत्तर संहिता आणि ब्राह्मणें यांत हें एक पाण्यांतलें झाड आहे असा उल्लेख आहे. गन्धर्व याचा उपयोग खाण्याकडे करीत. त्याचें नंतरचें नांव शैवल असून तें आणि शीपाल हीं एकच होत.
६३अश्वत्थ:- भरतखंडांतील झाडांपैकी मोठें झाड. याला पिंपळ म्हणतात. ॠग्वेदांत (१.१३५,८; १०.९७,५) या झाडापासून जहाजें करितात असा उल्लेख आहे, (ही नुसती कल्पना आहे. मूळांत तसा स्पष्ट उल्लेख नाहीं.) आणि तदनंतरच्या ग्रंथांत त्या झाडाचा वारंवार उल्लेख आलेला आहे. ही लांकडें एकमेकांवर घासून विस्तव काढीत असत; त्यांत वरचें लांकूड पिंपळाचें आणि खालचें शमीचें असे. व्कचित् स्थलीं हीं झाडें दुस-या झाडांच्या-मुख्यत्वेंकरुन खदिराच्या-फाद्यांवर वाढतात. आणि त्या झाडांचा नाश करितात; म्हणून त्यांना 'नाश करणारा' (वैबाध) असें म्हणतात. याचीं फळें गोड असून पक्षी त्यांचें भक्षण करितात. या झाडांखालीं ईश्वर वास करितो अशी समजूत आहे. हा वृक्ष आणि न्यग्रोध यांना 'शिखण्डिन्' असें म्हणतात.
६४आण्डीक.-अथर्ववेदांत हा शब्द भक्षणीय वनस्पति म्हणून आलेला आहे. फलें अथवा पानें अंडाकृति किंवा कमळाच्या आकारासारखीं असतात.
६५आल.-अथर्ववेदांत या शब्दाचा अर्थ 'गवत' असावा. सायणांच्या मताप्रमाणें सस्यवल्ली असा अर्थ असणा-या अलसाला, सिलांजाला व नीलागलसाला या तील शब्दांचा हा अवयव आहे. व्हिटने म्हणतो कीं या शब्दांनां एकादा विवक्षित अर्थ देतां येत नाहीं.
६६इठ.-अथर्ववेदांत हा शब्द दोन वेळां आलेला आहे. पहिल्या उता-यांत याचा अर्थ वर्षामध्यें नाश पावणारा लव्हाळा आणि दुस-यांत घरांचें गवताचें काम, असा केला आहे.
६७इषीका.-'गवताचें किंवा बोरुचें काण्ड.' अथर्ववेद आणि त्यानंतरचे ग्रंथ यांत 'अशक्तपणा, नाशिवंतपणा, ठिसूळपणा' या अर्थी हा शब्द वारंवार योजिला आहे. शांखायन आरण्यकांत गाईच्या गोठयाच्या अर्गलेला जी खीळ असते त्या अर्थी हा योजिला आहे (अगलेषीके). शतपथ ब्राह्मणांत 'इषीकांनीं भरलेलें शूर्प' असा उल्लेख आहे.
६८उदुम्बर.- ॠग्वेदांत जरी हें नांव नाही तथापि अथर्ववेद आणि त्यानंतर हें नांव आढळतें. कोणच्याहि धर्मविधींत याच्या समिधांचा उपयोग करीत असत. यूप आणि दर्वी याचीच करीत असत आणि उदुंबराच्या ताईतांचा देखील उल्लेख आहे. त्याचें लांकूड-दुस-या अश्वत्थ, न्यग्रोध, आणि प्लक्ष वगैरेप्रमाणें- यज्ञामध्यें उपयोग करण्याला योग्य आहे असें मानीत असत. ऐतरेय ब्राह्मणांत त्याचीं फळें गोड असल्याकारणानें त्या फळांनां 'मधु' म्हटलें आहे. यास वर्षांतून तीन वेळां पाड लागतो असाहि उल्लेख आहे. पंचविंश ब्राह्मणांत उदुम्बरच्या जंगलांचाहि निर्देश आहे.
६९कुमुद.-अथर्ववेदांत एका ठिकाणी दुस-या कित्येक पाणरोपामध्यें या रोपाचेंहि नांव आहे. हें रोप म्हणजे पांढरे कमळच असलें पाहिजे आणि हें नांव वेदोत्तर संस्कृतांत विशेष आढळतें.
७०कूदी.- कांही प्रतींत कूटी असा पाठ आढळतो. अथर्ववेद आणि कौशिक सूत्रांत याची डाहाळी, (जीवानें पुन्हा शरीरांत प्रवेश करुं नये म्हणून) शवाला बांधीत, असें विधान आहे. भाष्यकार, बदरी आणि हें झाड एकच आहे असें म्हणतो.
७१जीवन्त.- अथर्ववेदामध्यें एका मंत्रांत याचा अर्थ एखादी वनस्पति असा असावा असें वाटतें. जीवन्त याच्याबद्दल जीवल असा शोध जो व्हिटने व रॉथ यांनीं घातलेला आहे, तो असमर्थनीय वाटतो.
७२ताजद्भंग.- (सहज मोडलेलें) हा शब्द अथर्ववेदामध्यें एखाद्या वृक्षाचें किंवा वनस्पतीचें नांव म्हणून आलेला आहे. कौशिक सूत्रामध्यें हा समास असा गणला आहे व त्या सूत्रावरील भाष्यकाराचे मतें हा एरंड वृक्ष असावा. व्हिटनेच्या मतें हे शब्द निराळे आहेत व त्यांचा अर्थ 'भांगेप्रमाणें ते चटकन (ताजत्) मोडोत' असा तो आपल्या पुस्तकांतील उता-यांत देतो.
७३त्रायमाण.-अथर्ववेदामध्यें एका अपरिचित झाडाचें हें नांव आहे. हा शब्द बहुतकरुन नुसतें विशेषण असावें व रक्षण करणारा हा त्याचा अर्थ आहे. पण हा अर्थ स्वरामुळें स्वीकारतां येत नाहीं.
७४धव.- अथर्ववेदामध्यें प्लक्ष, अश्वत्थ व खादिर या झाडांच्या नांवाबरोबर उल्लेखिलेलें हें एका वृक्षाचें नांव आहे. धव म्हणजे मनुष्य हें नांव निरुक्ताचे अगोदर आलेलें नाहीं. विधवा या शब्दामुळेंच धव या शब्दाला अस्तित्व आहे. विधवा या शब्दाची व्युत्पत्ति नव-याविरहित अशी चुकीची (?) केलेली आहे.
७५नलद.- 'जटामांसी नांवाची सुगंधी वनस्पति' असा याचा अर्थ असून हा शब्द अथर्ववेद, ऐतरेय, व शांखायन आरण्यकांत आलेला आहे (या आरण्यकांत असेंहि म्हटलें आहे कीं, हिचा उपयोग माळेकरितां होतो). सूत्रग्रंथांतहि हा शब्द आलेला आहे. अथर्ववेदामध्यें नलदी हा स्त्रीलिंगी शब्द आलेला आहे व तो अप्सरांबद्दल आलेला आहे.
७६नीलागलसाला.- अथर्ववेदाच्या पैप्पलाद संहितेमध्यें नीलाकलसाला हा पाठ असून भाष्यकाराचे मताप्रमाणें अथर्व-वेदामध्यें धान्यलता अशा अर्थानें हा शब्द आलेला असावा.
७७न्यग्रोध.- 'खाली खालीं वाढणारें झाड.' हें आपल्या फांद्या जमीनींत रोखून नवीन बुंधे बनविण्याबद्दल प्रसिद्ध आहे. ॠग्वेदामध्यें जरी या वृक्षाचें नांव आलेलें नाहीं तरी पिशेलनें एका सूक्तावरुन (त्यांत न्यग्रोधाचीं सर्व लक्षणें आलीं आहेत) सिद्ध केल्याप्रमाणें हा वृक्ष त्या कालीं लोकांस ठाऊक असला पाहिजे. या वृक्षाचा उल्लेख अथर्ववेद व मागाहूनचें वाङ्मय यांत आलेला आहे. यज्ञांतील पात्रें याच्याच लांकडाची बनविलेली असत; हल्लीच्याप्रमाणें पूर्वी सुद्धां या झाडाचें महत्व फार असावें. याच्याच जातींतील अश्वत्थ वृक्षाचा उल्लेख अथर्ववेदांत अगोदरच आलेला आहे.
७८न्यस्तिका.- अथर्ववेदामध्यें एक प्रकारची वनस्पति असा याचा अर्थ आहे. भाष्यकार या वनस्पतीला शंखपुष्पिका असेंहि म्हणतात.
७९परुष्.-अथर्ववेदामध्यें (८.८,४) याचा अर्थ वेत व शांखायन श्रौतसूत्रा (१९.२२,२०) मध्यें बाण असा आहे.
८०पाठा.- अथर्ववेदामध्यें व कौशिक सूत्रांत हें नांव आलेलें आहे. भाष्यकाराचे मतानें ही वनस्पति व मागाहून प्रसिद्धीस आलेली पाठा वनस्पति दोन्ही एकच होत. या वनस्पतीचा पूर्वी ओषधि म्हणून बराच उपयोग होत असे. व रॉथचे मतानें हल्लीहि तसा उपयोग होतो. हा शब्द पाठा असाच समजणें इष्ट आहे.
८१पीलु.- कबुतरें ज्या झाडाच्या फळावर उपजीविका करतात त्या झाडाचें हें नांव अथर्ववेदामध्यें आलेलें आहे (कदाचित् हें अक्रोडाचें झाड असावें).
८२पूतिरज्जू.- रॉथच्या मताप्रमाणें हें अथर्ववेदांत एका अप्रसिद्ध वल्लीच्या जातीचें नांव आलें आहे. कौशिक सूत्रांत याचा ''सडकी, कुजकी दोरी'' या अर्थानें उपयोग केला आहे. परंतु याचा अर्थ साप असा असावा असें लुडविग् सुचवितो.
८३पूतुद्रु.- अथर्ववेदांत व यजुर्वेद संहितेंत हें देवदाराचें दुसरें नांव आहे. कौशिकसूत्रांत याचें पूर्णरुप पूतुदारु असें आहे.
८४पृश्निपर्णी.-(ठिपके असलेलें चित्रविचित्र पान) हें एका वल्लीचें नांव अथर्ववेदाच्या एका ॠचेंत आलें आहे. कण्व नांवाच्या गर्भपात करणा-या दुष्ट लोकांपासून संरक्षण करण्याच्या कामीं ही वल्ली उपयोगी पडे. ही शतपथब्राह्मणांत सुद्धां आली, आहे. सेंटपीटर्सबर्गच्या कोशांत 'हर्मिओनिटिस कार्डिफोलिआ' म्हणून तिला म्हटलें आहे. परंतु रॉथ आपल्या पुढील लेखांत असें म्हणतो कीं जिला लक्ष्मणा म्हणतात तीच ही वल्ली होय; आणि इचा उपयोग वांझपणा दूर करण्याकडे होत असे. एका भाष्यकाराच्या मतानें, (त्यानें कात्यायन श्रौतसूत्रांत म्हटल्या प्रमाणें) 'ग्लिसाइन डेबिलिस' असें म्हणण्याचाच येथें उद्देश असावा.
८५प्लक्ष.- हें वीचिपर्णयुक्त उंबराच्या जातीच्या एका झाडाचें नांव आहे. हें सुंदंर आणि उंच झाड असून याला पांढरी लहान फळें येतात. याचा उल्लेख अथर्ववेद आणि तैत्तिरीय संहिता यांतून न्यग्रोध आणि पर्ण यांच्याबरोबर आलेला आहे. व्युत्पत्तिदृष्टया याचें प्रक्ष असें रुपांतर तैत्तिरीय संहितेंत आलें आहे. याचा ब्राह्मण ग्रंथांतहि उल्लेख येतो.
८६भंग.- 'भांग' याचा उल्लेख अथर्ववेदांत येतो. ॠग्वेदांत (९.६१,१३) हें सोमाचें विशेषण म्हणून आलें आहे. व त्याठिकाणीं त्याचा बहुधा अर्थ 'मादक' असा आहे. व तोच अर्थ आतां भांगेचा विशेष म्हणून समजतात.
८७मदुघ.- मधुवेल हें एका मधुर - गोड - अशा एका वेलीचें नांव अथर्ववेदांत आलें आहे. याच्या रुपाबद्दल बराच संशय आहे. कारण पुष्कळ जुन्या हस्तलिखितांतून मधुघ हा शब्द आला आहे.
८८रजनी.- हा शब्द अथर्ववेदाच्या एका उता-यांत सांपडतो; तेथें त्याचा अर्थ एक प्रकारचें रोपडें असा आहे. बहुधा हा अर्थ त्याच्या धात्वर्थापासून निघाला आहे (रंज् -रंजविणें). हें रोपडें कोणतें हें नक्की ठरवितां येत नाहीं.
८९वानस्पत्य.-अथर्ववेदांत एक दोन ठिकाणीं हा शब्द पुल्लिंगी, लहान वृक्ष अशा अर्थी आलेला आहे. इतर ठिकाणीं नपुंसकलिंगी याचा अर्थ वृक्ष (वनस्पतीचें) फळ असा होतो.
९०विषाणका.- अथर्ववेदामध्यें एका वनस्पतीचें हें नांव आहे. ब्लूमफील्डचे मतें या शब्दाचा अर्थ नुसतें शिंग असा आहे. वातीकार नांवाच्या रोगावर इलाज म्हणून याचा उपयोग होतो. या रोगाचें निश्चित स्वरुप समजत नाहीं. झिमरचें मत असें आहें कीं, क्षतांमुळें हा रोग उत्पन्न होतो व झिमर या शब्दाशीं अ-वात (इजा न झालेला) या ॠग्वेदांतील विशेषणाची तुलना करतो. पण ब्लूमफील्डचें असें मत आहे कीं, शरीरांतल्या वातामुळें हा रोग उत्पन्न होतो.
९१विहल्ह.- अथर्ववेदामध्यें एका वनस्पतीचें हें नांव आहे. विहम्ल व विहह्ल असे याच शब्दाचे दुसरे पर्याय आहेत.
९२शफक.-अथर्ववेदामध्यें एका वनस्पतीचें हें नांव आलेलें आहे. हें नांव आपस्तंब श्रौतसूत्रांतहि आलेलें आहे व त्या ठिकाणीं त्याचा अर्थ खाण्यालायक फळ किंवा पाण्यांत वाढणारी वनस्पति असा आहे. कदाचित् हें पाण्यांत वाढणारें एखादें फळ असेल. याला शफक नांव पडण्याचें कारण त्याच्या पानांचा आकार खुरा (शफा) प्रमाणें असतो.
९३शमी.-अथर्ववेद व मागाहून झालेले ग्रंथ यामध्यें एका वृक्षाचें हें नांव आलेलें आहे. अथर्ववेदामध्यें केंसाला अपायकारक, मद उत्पन्न करणारे व रुंद पानाचें असें त्याचें वर्णन आलेलें आहे. हे गुण-ज्याला इंग्रजींत 'प्रोसोपिस् स्पिसिजिरा' किंवा 'मिमोसा सुमा' म्हणतात त्यांत दिसून येत नाहींत. शमीच्या लाकडांपासून यज्ञांतला अग्नि उत्पन्न करण्याकरितां ज्या अरणीचा उपयोग होत असे त्या अरणीच्या खालचा भाग शमीचा बनवीत व वरचा भाग अश्वत्थाच्या लांकडापासून तयार करीत. या शमीच्या फळाला शमीधान्य असें नांव आहे.
९४सह.- अथर्ववेदामध्यें रॉथचे मतानें हें एका वनस्पतीचें नांव आहे. पण ब्लूमफील्डच्या मतानें हा शब्द नुसतें विशेषण असून त्याचा अर्थ प्रबल असा आहे.
९५सिलांजाला.- भाष्यकाराच्या मतानें हा शब्द शलांजाला असा असून अथर्ववेदांत त्याचा एक वनस्पति (कदाचित् 'ग्रेन-क्रीपर) असा आहे. कौशिकसूत्रांत हा शब्द शिलांजाला असा आहे.
९६कर्कन्धु.- वाजसनेयि संहितेंत हा शब्द बोरीचें झाड आणि फळें यांनां लाविलेला आहे. बोराचा रंग लाल (रोहित) असतो. कुवल आणि बदर म्हणजे फळें असाहि अर्थ मानला जातो.
९७शष्प्य.- वाजसनेयि संहिता व ब्राह्मण ग्रंथ यामध्यें नवें किंवा अंकुर फुटलेलें गवत असा याचा अर्थ आहे.
९८अश्ववार, अश्ववाल.- पहिला शब्द मैत्रायणीसंहितेंत आणि दुसरा शब्द काठक व कपिष्ठल संहितेंत आणि शतपथ ब्राह्मणांत, एक जातीचा बोरु या अर्थी योजिला आहे.
९९आदार.-सोमाच्याबद्दल या झाडाचा उपयोग करीत असत असा कठसंहितेंत (२४.३) उल्लेख आहे. पूतिका आणि हें झाड एकच असें शतपथ ब्राह्मण (४.५,१०,४) म्हणतें.
१००कुवल.- यजुर्वेदसंहिता आणि ब्राह्मण यामध्यें हें बोराचें नांव आहे. हें कर्कन्धु आणि बदर यांचेबरोबर वारंवार येतें.
१०१कृमुक.-काठकसंहिता आणि शतपथ ब्राह्मण यांत याचा अर्थ जळाऊ लांकडाच्या एका जातीचें नांव असा आहे.
१०२पीतुदारु.-काठकसंहितेमध्यें व मागाहूनच्या ग्रंथांत हा शब्द आलेला असून त्याचा अर्थ कांहीच्या मतें देवदारु व इतरांचें मतें खदिर किंवा उदुंबर वृक्ष असा आहे.
१०३रोहितक.- मैत्रायणीसंहितेंत एका वृक्षाचें नांव म्हणून रोहीतक या बदललेल्या पाठानें हा शब्द आला आहे.
१०४वृष.-काठसंहितेमध्यें एक प्रकारची वनस्पति असा या शब्दाचा अर्थ दिलेला आहे. पुढें 'जेंडारुस्सा व्हलॉरिस' याला हेंच नांव दिले असेल मैत्रायणीसंहितेमध्यें वृश असा शब्द आलां आहे व बोथलिंग त्याचा अर्थ एक लहान जनावर असा करतो. हा अर्थ अगदीं शक्य आहे.
१०५अन्यत:प्लक्षा.- (एकाच बाजूला फडफडणा-या पानांची उंबराचीं झाडें) शतपथ ब्राह्मणांत हें कुरुक्षेत्रांतील एका सरोवराचें नांव आहे. त्याचा उल्लेख पुरुरवा आणि उर्वशी यांच्या गोष्टींत केलेला आहे. सिरमोरमध्यें कोठेंतरी तें असावें असें पिशेल म्हणतो.
१०६अमला.- हें बहुतकरुन आंवळयाचें झाड असावें. याला आमलक अथवा आमलका असेंहि म्हणतात. जैमिनीय उपनिषद ब्राह्मणांत (१.३८,६) याचा उल्लेख आहे.
१०७अश्मगंधा.-शतपथ ब्राह्मणांत या झाडाचा उल्लेख आहे. अश्वगंधा व हें झाड बहुधा एकच आहे.
१०८आश्ववाल.-शतपथ ब्राह्मणांत (३.४,१,१७;६,३,१०) हें विशेषण (अश्वपुच्छतृणकृत) प्रस्तर याच्याकडे लाविलें आहे, यावरुन अश्ववाल तृणाचें अस्तित्व सिद्ध होतें.
१०९उशना.-ज्या झाडापासून सोमरस काढीत असत त्या झाडाचें हें नांव आहे असें शतपथ ब्राह्मणांत (३.४,३,१३; ४.२,५,१५) लिहिलें आहे.
११०कुश.-'पवित्र गवत.' दर्भ या अर्थानें हा शब्द शतपथ ब्राह्मणांत येतो. सें. पी. कोशांत याचा अर्थ फक्त गवत असा केला आहे.
१११तार्ष्टाघ.-हा वृक्षविशेष आहे म्हणून कौशिक सूत्रांत याचां उल्लेख केलेला आहे. या शब्दापासून बनलेलें तार्ष्टाघी हें विशेषण अथर्ववेदामध्यें आलेलें आहे. वेबरच्या मतें सर्वप, मराठींत मोहरीचें झाड, असा याचा अर्थ होतो.
११२तिल्वक.- हा शब्द शतपथ ब्राह्मणामध्यें एका झाडाचें नांव म्हणून आलेला आहे. या झाडाजवळ समाधि बांधणें हें अशुभ मानलेलें आहे. या शब्दापासून बनलेलें तैल्वक हें विशेषण मैत्रायणी संहितेंत आहे, व षङ्घिश ब्राह्मणांत यूपाचें वर्णन करण्याकडे याचा उपयोग केलेला आहे.
११३त्रिप्लक्ष.- पुल्लिंगी अनेकवचनीं. या शब्दाचा अर्थ तीन उंबराचीं झाडें' असा आहे. पंचविंश ब्राह्मणाप्रमाणें हा शब्द ज्या ठिकाणीं यमुनेजवळ द्दषद्वती अद्दश्य झाली त्या जागेचें नांव आहे.
११४नैचुदार.- 'निचुदार लांकडाचें बनविलेलें' अशा अर्थानें पंचविंश ब्राह्मणांत हा शब्द आलेला आहे. हा निचुदार वृक्ष कसा होता हें समजत नाहीं.
११५पलाश.-पर्ण शब्दाप्रमाणें याचा अर्थ ब्राह्मणग्रंथांत पान असा आहे. या नांवाचा एक वृक्ष सुद्धां असून याचें पहिलें नांव पर्ण असें आहे.
११६प्रप्रोथ.-पंचविंश ब्राह्मणांत (८.४,१,) हें सोमाच्या ऐवजीं उपयोगांत आणावयाच्या एका वल्लीचें नांव आहे.
११७फलवती.- षड्विंश ब्राह्मणांत हा शब्द आला आहे. फलयुक्त, फलांनीं लादलेली असा याचा अर्थ आहे. हें एका वेलीचें नांव आहे. भाष्यकारांच्या मतें ही प्रियंगूच होय.
११८बिंब.- हा शब्द जैमिनीय उपनिषद् ब्राह्मणांत आढळतो (३.५,६). हें एका झाडाचें नांव आहे.