प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)
प्रकरण १० वें
उपसंहार
मनुष्याचा बुद्धपूर्व इतिहास या विभागांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तथापि या प्रयत्नामध्यें सामान्यत: एकंदर सात आठ हजार वर्षांचाच इतिहास मांडला गेला आहे असें दिसेल. मनुष्यप्राणी भूपृष्ठशास्त्रवेत्त्यांच्या दृष्टीनें जें चतुर्थयुग आहे. त्या चतुर्थयुगांत आहे. याची भूतलावर वस्ती आज किती लक्ष वर्षे आहे. याविषयीं विचार चालू आहे. जमिनीवरच्या थरामध्यें जें मनुष्यांचे अवशेष सांपडतात त्यांची व आजच्या भिन्न मानववंशाकडून होणाऱ्या भौगोलिक व्याप्तीची संगति अजून लावतां आली नाहीं व पुराणवस्तूशास्त्राचें संशोधन आणखी कित्येक दशकें झाल्याशिवाय आणि अभ्यासाचें क्षेत्र सर्व जग झाल्याशिवाय लावतां येणार नाहीं. भाषाशास्त्रापासून निघणारे मनुष्यभ्रमणात्मक सिद्धान्त अजून वृद्धिगत झाले नाहींत. या शास्त्राचें ध्येय काय, तर ज्याप्रमाणें एखाद्या घराण्याचा वंशवृक्ष तयार करतां येतो आणि त्या वंशवृक्षामध्यें निपुत्रिक किंवा सुपुत्र पुरुष बसवून तो मांडतां येतो त्याप्रमाणें ज्या जातीचे अवशेष उरले आहेत त्या जाती व नष्ट झालेल्या जाती या सर्वांचा वंशवृक्ष तयार करावयाचा, हें मानववंशशास्त्राचें अंतिम ध्येय आहे. हा वंशवृक्ष तयार करतांना प्रत्येक राष्ट्राची कामगिरी त्या वंशवृक्षाबरोबरच मांडावयाची. अशा तऱ्हेनें इतिहास कधीं भविष्यत्कालीं तयार होईल तो होवो. पण तें ध्येय आहे हें खास. त्या दृष्टीनें प्रयत्नहि झाले पाहिजेत. सामान्य कुलाचा वंशवृक्ष मांडतांना जी अडचण उत्पन्न होत नाहीं अशी एक अडचण मानववंशवृक्ष तयार करतांना उत्पन्न होते. पुष्कळ राष्ट्रे किंवा मानववंश मरून जात नाहींत किंवा चालूहि रहात नाहींत, तर त्यांचे घटक इतर मानववंशांत समाविष्ट होतात. अशा तऱ्हेच्या प्रसंगी इतिहासशोधन अधिक कठिण होत जातें.
इजिप्तच्या अत्यन्त प्राचीन कालापासून बुद्धाच्या कालापर्यंत इतिहासाचें सातत्य यांत मांडावयाचा प्रयत्न केला आहे. पण हिंदूस्थानचा इतिहास बराचसा कुरुयुद्धापर्यंतचाच आहे. करुयुद्धापासून बुद्धकालापर्यंत म्हणजे शैशुनागापर्यंत आपणांस पौराणिक राजावलीशिवाय दुसरें साहित्य उपलब्ध नाहीं, व ती राजावली चवथ्या विभागांत मांडलीच असल्यामुळें येथें देण्याचें प्रयोजन नाहीं. सांस्कृतिक इतिहास द्यावयाचा तर तेथेंहि पंचाईतच उत्पन्न होते. श्रौतसूत्रें व षड्दर्शनें यांच्या आज आपणांस ज्या आवृत्त्या उपलब्ध आहेत त्या सर्व बुद्धेत्तरकालांत संस्कारित झाल्या आहेत असें उघड दिसतें. परस्परापेक्ष जीं दोन मीमांसांचीं सूत्रें त्यांत बौद्धमतखंडनाचा प्रयत्न आहे व तीच गोष्ट रामायणभारतासारख्या ग्रंथांची होय. रामायणानें एका क्षेपक श्लोकांत बुद्धास तर चोरच म्हटलें आहे आणि भारतामध्यें तर बौद्धांचा उल्लेख अनेक ठिकाणीं आहे. दोन्ही आर्षमहाकाव्यावर बुद्धोत्तरकालीं संस्कार झाले हें कोणीहि नाकबूल करावयाचा नाहीं. गृह्यसूत्रें व धर्मसूत्रें हीं तर बरीचशीं आजच्या स्वरूपांत बुद्धोतरकालीनच दिसत आहेत. तर त्यांच्या विषयीं विवेचन ब्राह्मणकुलें व संप्रदाय यांबरोबर जेवढें केले त्यापेक्षां अधिक करतां आलें नाहीं.
भारतीय आर्यन् लोकांचे व त्यांच्या पूर्वजांचे इतिहासकाल यांविषयीं संक्षेपवाक्य म्हणून येणेप्रमाणें सांगता येईल.
१) मूलगृहकाल: या कालाविषयीं अनुमानें दिवसानुदिवस वाढत आहेत व जुनीं टाकलीं जात आहेत. अजून स्थलनिश्चयहि नाहीं किंवा सहस्त्रकांनी मोजण्याइतका देखील कालनिश्चय नाहीं.
२) दुसरा काल पर्शुभारतीयकाल: या कालांत देखील पर्शूंचे आणि भारतीयांचे पूर्वज कोठें असावेत याविषयीं स्थाननिश्चिय करतां येत नाहीं व हा काल केव्हां असावा हेंहि सांगतां येत नाहीं.
३) तिसराकाल भारतीय आर्यन् लोकांचा काल: या कालाचे प्रथमत: दोन भाग पडतात. सूतसंस्कृतीचा काल हा पहिला भाग होय आणि मांत्रसंस्कृतीचा काल हा उत्तर भाग होय. मांत्रसंस्कृति उत्पन्न होण्याच्या पूर्वी 'दाशराज्ञयुद्ध' झालें. दशराज्ञयुद्धपूर्वीच सूतसंस्कृतीच्या आर्यन् लोकांनी उत्तरहिंदुस्थान व वैदर्भ व्यापिला होता. आणि कदाचित् सिलोनपर्यंतहि त्यांचा प्रवेश झाला होता. मात्रसंस्कृतीच्या कालाचा प्रारंभबिंदू म्हणजे दाशराज्ञ युद्ध होय, आणि हें करुयुद्धापूर्वी सहाशें वर्षे अजमासें झालें असावें. ॠ्ग्वेदीय मंत्रांच्या रचनेपासून कुरुयुद्धकालीन संहितीकरणापर्यंत सर्व खटपट याच सहाशें वर्षांतील होय. या सहाशें वर्षांची धार्मिक कामगिरी म्हटली म्हणजे सामान्य अग्न्युपासनेपासून सप्तसंस्था व सूत्रें याचा विकास ही होय. आजचा संस्कारधर्महि अथर्ववेदाच्या घटनेमार्फत याच कालांत समंत्रक झाला असावा. याच कालामध्यें मंत्रकालीन देवतांमध्ये प्रथमत: वरुणोपासनेचा क्षय आणि इंद्राचें प्रामुख्य व त्याच्या नंतरहि इंद्रास मागें टाकून प्रजापतीचें प्रामुख्य व शिवविष्णूस मान्यता इत्यादि क्रिया दैवतेतिहासांत झालेल्या दृष्टीस पडतात.
व्यापक व नियमांकित विचारांचा इतिहास आपणांस शोधावयाचा असल्यास सूतसंस्कृतिकालीन साहित्य आपणांस अनुपलब्ध आहे. त्याची परंपरा आपणांस ॠग्वेदांतूनच आरण्यकापर्यंत न्यावी लागते, आणि त्याची संगति बौद्ध व जैन ग्रंथांशीं लावावी लागतें. ॠग्वेदांत व्यापक विचार दहाव्या मंडळांतच आढळतो. परंतु ॠग्वेदांत पुनर्जन्माची कल्पना सुद्धां नाहीं. आणि कर्मवादहि नाहीं. आध्यात्मिक सूक्तें आहेत व त्यांमध्यें सर्व जगभर एकच आत्मा भरून राहिला आहे हीं अद्वैतवाद्यांची कल्पना दिसून येते. ईश्वरसंशयवादाचें निराकरण देखील ॠग्वेद २.१२ व ८.८९ मध्यें आढळतें. ॠ. १० १२१ या सूक्तांत ''कस्मै देवाय हविषा विधेम'' असें ध्रुपद आहे. कोठें प्रजापति, तर कोठें ब्रह्मणस्पति, तर कोठें विश्वकर्मा अशा अनेक तऱ्हेच्या नांवाखाली एकेश्वरीकल्पना व एकेश्वरीच्या ठायीं विश्वकर्तृत्व हीं ॠग्वेदांतील तात्विक सूक्तांत व्यक्त केलींच आहे असें मागें सांगितलें आहेत (वेदविद्या पृ. ४२).
व्यापक विचारांचें ॠग्वेदांतील महत्त्वाचें मंडळ म्हणजे दहावें होय. यांतच हिरण्यगर्भसूक्त व पुरुषसूक्त हीं आहेत आणि या सूक्तांत सृष्टीच्या उत्पत्तीविषयीं विचार व्यक्त झाले आहेत.
यज्ञसंस्थेमध्यें ब्रह्मवाद्यांचें काम जें संशयनिवृत्ति, त्या कामाचे अवशेष ब्राह्मण ग्रंथांतील आख्यायिकांच्या रूपानें व गोष्टींच्या रूपानें शिल्लक राहिले आहेत, त्यांत कांहीं, आरण्यकांत शोभतील अशा कथा, आहेत. जगत्सृष्टिविषयक कथा तैत्तिरीय ब्राह्मणाच्या दुसऱ्या कांडांत दिली आहे. तसेंच नाचिकेताची कथा तिसऱ्या काण्डांत दिली आहे. तथापि एकंदरींत असें म्हणण्यास हरकत नाहीं कीं, व्यापक विचारांचा इतिहास लिहावयास पद्धतशीर प्रारंभस्थान आरण्यकें व उपनिषदें हें होय. या इतिहासांचा इतर इतिहासाशीं संबंध जुळवावयाचा म्हटला म्हणजे तो सांगतां येईल कीं यज्ञसंस्थेच्या अंतिम कालापर्यंत व्यापक विचार किंवा नियमांकित विचार फारसा कोठें विकसित झालेला दिसत नाहीं.
आर्यन् लोकांच्या प्रसाराचा इतिहास व वैदिक वाङ्मय यांची संगति इतकीच लावतां येईल कीं, आर्यन् लोकांचा प्रसार चोहोंकडे वेदपूर्वकालींच झाला होता. फक्त ब्राह्मण जातीचा प्रसार व वाङ्मयवाल्यांचा प्रसार यांची व वाङ्मयाच्या वाढीची संगति लावतां येईल. ती थोडक्यांत येणेंप्रमाणें: ॠग्मंत्रकालीं या वर्गाचा गंगेपर्यंत प्रसार झाला होता आणि ब्राह्मणयजुर्वेदकालीं सर्वउत्तरहिंदुस्थानभर झाला होता. अश्वमेधसंस्था ज्यावेळेस समंत्रक करण्यांत आली त्यावेळेस महाराज्ञी कांपील्यस्पर्धेचा उल्लेख करतांना दाखविली आहे. ॠग्वेदांत गंगेच्या पूर्वेकडील प्रदेशाचा उल्लेख फक्त एकच आहे; आणि तो कीकटाचा होय. ॠग्मंत्र व यजुर्वेदब्राह्मणकाल यांमध्यें एवढाच स्थानिक फरक निर्देश करतां येतो. यापेक्षां जास्त करतां येत नाहीं. वाङ्मयाची वाढ व वाङ्मयवाल्या वर्गाचा प्रसार यांचा संबंध ॠग्वेदकाल व यजुर्वेदब्राह्मणकाल असे दोन गट करून दाखवितां येतो; यापेक्षां जास्त स्पष्ट करतां येत नाहीं.