प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

प्रकरण १० वें
उपसंहार

मनुष्याचा बुद्धपूर्व इतिहास या विभागांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तथापि या प्रयत्नामध्यें सामान्यत: एकंदर सात आठ हजार वर्षांचाच इतिहास मांडला गेला आहे असें दिसेल. मनुष्यप्राणी भूपृष्ठशास्त्रवेत्त्यांच्या दृष्टीनें जें चतुर्थयुग आहे. त्या चतुर्थयुगांत आहे. याची भूतलावर वस्ती आज किती लक्ष वर्षे आहे. याविषयीं विचार चालू आहे. जमिनीवरच्या थरामध्यें जें मनुष्यांचे अवशेष सांपडतात त्यांची व आजच्या भिन्न मानववंशाकडून होणाऱ्या भौगोलिक व्याप्तीची संगति अजून लावतां आली नाहीं व पुराणवस्तूशास्त्राचें  संशोधन आणखी कित्येक दशकें झाल्याशिवाय आणि अभ्यासाचें क्षेत्र सर्व जग झाल्याशिवाय लावतां येणार नाहीं. भाषाशास्त्रापासून निघणारे मनुष्यभ्रमणात्मक सिद्धान्त अजून वृद्धिगत झाले नाहींत. या शास्त्राचें ध्येय काय, तर ज्याप्रमाणें एखाद्या घराण्याचा वंशवृक्ष तयार करतां येतो आणि त्या वंशवृक्षामध्यें निपुत्रिक किंवा सुपुत्र पुरुष बसवून तो मांडतां  येतो त्याप्रमाणें ज्या जातीचे अवशेष उरले आहेत त्या जाती व नष्ट झालेल्या जाती या सर्वांचा वंशवृक्ष तयार करावयाचा, हें मानववंशशास्त्राचें अंतिम ध्येय आहे. हा वंशवृक्ष तयार करतांना प्रत्येक राष्ट्राची कामगिरी त्या वंशवृक्षाबरोबरच मांडावयाची. अशा तऱ्हेनें इतिहास कधीं भविष्यत्कालीं तयार होईल तो होवो. पण तें ध्येय आहे हें खास. त्या दृष्टीनें प्रयत्नहि झाले पाहिजेत. सामान्य कुलाचा वंशवृक्ष मांडतांना जी अडचण उत्पन्न होत नाहीं अशी एक अडचण मानववंशवृक्ष तयार करतांना उत्पन्न होते. पुष्कळ राष्ट्रे किंवा मानववंश मरून जात नाहींत किंवा चालूहि रहात नाहींत, तर त्यांचे घटक इतर मानववंशांत समाविष्ट होतात. अशा तऱ्हेच्या प्रसंगी इतिहासशोधन अधिक कठिण होत जातें.

इजिप्तच्या अत्यन्त प्राचीन कालापासून बुद्धाच्या कालापर्यंत इतिहासाचें सातत्य यांत मांडावयाचा प्रयत्न केला आहे. पण हिंदूस्थानचा इतिहास बराचसा कुरुयुद्धापर्यंतचाच आहे. करुयुद्धापासून बुद्धकालापर्यंत म्हणजे शैशुनागापर्यंत आपणांस पौराणिक राजावलीशिवाय दुसरें साहित्य उपलब्ध नाहीं, व ती राजावली चवथ्या विभागांत मांडलीच असल्यामुळें येथें देण्याचें प्रयोजन नाहीं. सांस्कृतिक इतिहास द्यावयाचा तर तेथेंहि पंचाईतच उत्पन्न होते. श्रौतसूत्रें व षड्दर्शनें यांच्या आज आपणांस ज्या आवृत्त्या उपलब्ध आहेत त्या सर्व बुद्धेत्तरकालांत संस्कारित झाल्या आहेत असें उघड दिसतें. परस्परापेक्ष जीं दोन मीमांसांचीं सूत्रें त्यांत बौद्धमतखंडनाचा प्रयत्न आहे व तीच गोष्ट रामायणभारतासारख्या ग्रंथांची होय. रामायणानें एका क्षेपक श्लोकांत बुद्धास तर चोरच म्हटलें आहे आणि भारतामध्यें तर बौद्धांचा उल्लेख अनेक ठिकाणीं आहे. दोन्ही आर्षमहाकाव्यावर बुद्धोत्तरकालीं संस्कार झाले हें कोणीहि नाकबूल करावयाचा नाहीं. गृह्यसूत्रें व धर्मसूत्रें हीं तर बरीचशीं आजच्या स्वरूपांत बुद्धोतरकालीनच दिसत आहेत. तर त्यांच्या विषयीं विवेचन ब्राह्मणकुलें व संप्रदाय यांबरोबर जेवढें केले त्यापेक्षां अधिक करतां आलें नाहीं.

भारतीय आर्यन् लोकांचे व त्यांच्या पूर्वजांचे इतिहासकाल यांविषयीं संक्षेपवाक्य म्हणून येणेप्रमाणें सांगता येईल.
१)    मूलगृहकाल: या कालाविषयीं अनुमानें दिवसानुदिवस वाढत आहेत व जुनीं टाकलीं जात आहेत. अजून स्थलनिश्चयहि नाहीं किंवा सहस्त्रकांनी मोजण्याइतका देखील कालनिश्चय नाहीं.
२)    दुसरा काल पर्शुभारतीयकाल: या कालांत देखील पर्शूंचे आणि भारतीयांचे पूर्वज कोठें असावेत याविषयीं स्थाननिश्चिय करतां येत नाहीं व हा काल केव्हां असावा हेंहि सांगतां येत नाहीं.
३)    तिसराकाल भारतीय आर्यन् लोकांचा काल: या कालाचे प्रथमत: दोन भाग पडतात. सूतसंस्कृतीचा काल हा पहिला भाग होय आणि मांत्रसंस्कृतीचा काल हा उत्तर भाग होय. मांत्रसंस्कृति उत्पन्न होण्याच्या पूर्वी 'दाशराज्ञयुद्ध' झालें. दशराज्ञयुद्धपूर्वीच सूतसंस्कृतीच्या आर्यन् लोकांनी उत्तरहिंदुस्थान व वैदर्भ व्यापिला होता. आणि कदाचित् सिलोनपर्यंतहि त्यांचा प्रवेश झाला होता. मात्रसंस्कृतीच्या कालाचा प्रारंभबिंदू म्हणजे दाशराज्ञ युद्ध होय, आणि हें करुयुद्धापूर्वी सहाशें वर्षे अजमासें झालें असावें. ॠ्ग्वेदीय मंत्रांच्या रचनेपासून कुरुयुद्धकालीन संहितीकरणापर्यंत सर्व खटपट याच सहाशें वर्षांतील होय. या सहाशें वर्षांची धार्मिक कामगिरी म्हटली म्हणजे सामान्य अग्न्युपासनेपासून सप्तसंस्था व सूत्रें याचा विकास ही होय. आजचा संस्कारधर्महि अथर्ववेदाच्या घटनेमार्फत याच कालांत समंत्रक झाला असावा. याच कालामध्यें मंत्रकालीन देवतांमध्ये प्रथमत: वरुणोपासनेचा क्षय आणि इंद्राचें प्रामुख्य व त्याच्या नंतरहि इंद्रास मागें टाकून प्रजापतीचें प्रामुख्य व शिवविष्णूस मान्यता इत्यादि क्रिया दैवतेतिहासांत झालेल्या दृष्टीस पडतात.

व्यापक व नियमांकित विचारांचा इतिहास आपणांस शोधावयाचा असल्यास सूतसंस्कृतिकालीन साहित्य आपणांस अनुपलब्ध आहे. त्याची परंपरा आपणांस ॠग्वेदांतूनच आरण्यकापर्यंत न्यावी लागते, आणि त्याची संगति बौद्ध व जैन ग्रंथांशीं लावावी लागतें. ॠग्वेदांत व्यापक विचार दहाव्या मंडळांतच आढळतो. परंतु ॠग्वेदांत पुनर्जन्माची कल्पना सुद्धां नाहीं. आणि कर्मवादहि नाहीं. आध्यात्मिक सूक्तें आहेत व त्यांमध्यें सर्व जगभर एकच आत्मा भरून राहिला आहे हीं अद्वैतवाद्यांची कल्पना दिसून येते. ईश्वरसंशयवादाचें निराकरण देखील ॠग्वेद २.१२ व ८.८९ मध्यें आढळतें. ॠ. १० १२१ या सूक्तांत ''कस्मै देवाय हविषा विधेम'' असें ध्रुपद आहे. कोठें प्रजापति, तर कोठें ब्रह्मणस्पति, तर कोठें विश्वकर्मा अशा अनेक तऱ्हेच्या नांवाखाली एकेश्वरीकल्पना व एकेश्वरीच्या ठायीं विश्वकर्तृत्व हीं ॠग्वेदांतील तात्विक सूक्तांत व्यक्त केलींच आहे असें मागें सांगितलें आहेत (वेदविद्या पृ. ४२).

व्यापक विचारांचें ॠग्वेदांतील महत्त्वाचें मंडळ म्हणजे दहावें होय. यांतच हिरण्यगर्भसूक्त व पुरुषसूक्त हीं आहेत आणि या सूक्तांत सृष्टीच्या उत्पत्तीविषयीं विचार व्यक्त झाले आहेत.

यज्ञसंस्थेमध्यें ब्रह्मवाद्यांचें काम जें संशयनिवृत्ति, त्या कामाचे अवशेष ब्राह्मण ग्रंथांतील आख्यायिकांच्या रूपानें व गोष्टींच्या रूपानें शिल्लक राहिले आहेत, त्यांत कांहीं, आरण्यकांत शोभतील अशा कथा, आहेत. जगत्सृष्टिविषयक कथा तैत्तिरीय ब्राह्मणाच्या दुसऱ्या कांडांत दिली आहे. तसेंच नाचिकेताची कथा तिसऱ्या काण्डांत दिली आहे. तथापि एकंदरींत असें म्हणण्यास हरकत नाहीं कीं, व्यापक विचारांचा इतिहास लिहावयास पद्धतशीर प्रारंभस्थान आरण्यकें व उपनिषदें हें होय. या इतिहासांचा इतर इतिहासाशीं संबंध जुळवावयाचा म्हटला म्हणजे तो सांगतां येईल कीं यज्ञसंस्थेच्या अंतिम कालापर्यंत व्यापक विचार किंवा नियमांकित विचार फारसा कोठें विकसित झालेला दिसत नाहीं.

आर्यन् लोकांच्या प्रसाराचा इतिहास व वैदिक वाङ्मय यांची संगति इतकीच लावतां येईल कीं, आर्यन् लोकांचा प्रसार चोहोंकडे वेदपूर्वकालींच झाला होता. फक्त ब्राह्मण जातीचा प्रसार व वाङ्मयवाल्यांचा प्रसार यांची व वाङ्मयाच्या वाढीची संगति लावतां येईल. ती थोडक्यांत येणेंप्रमाणें: ॠग्मंत्रकालीं या वर्गाचा गंगेपर्यंत प्रसार झाला होता आणि ब्राह्मणयजुर्वेदकालीं सर्वउत्तरहिंदुस्थानभर झाला होता. अश्वमेधसंस्था ज्यावेळेस समंत्रक करण्यांत आली त्यावेळेस महाराज्ञी कांपील्यस्पर्धेचा उल्लेख करतांना दाखविली आहे. ॠग्वेदांत गंगेच्या पूर्वेकडील प्रदेशाचा उल्लेख फक्त एकच आहे; आणि तो कीकटाचा होय. ॠग्मंत्र व यजुर्वेदब्राह्मणकाल यांमध्यें एवढाच स्थानिक फरक निर्देश करतां येतो. यापेक्षां जास्त करतां येत नाहीं. वाङ्मयाची वाढ व वाङ्मयवाल्या वर्गाचा प्रसार यांचा संबंध ॠग्वेदकाल व यजुर्वेदब्राह्मणकाल असे दोन गट करून दाखवितां येतो; यापेक्षां जास्त स्पष्ट करतां येत नाहीं.

गृहस्थधर्माचा व स्त्रीपुरुषसंबंधाचा विकास यांविषयीं फारसा इतिहास देतांच येत नाहीं. पतिपत्नीधर्म ॠग्वेदाच्या अत्यंत प्राचीन भागांतहि पूर्णपणें स्थापित दिसतों, एवढेंच नव्हे तर ज्याअर्थी पुत्रांची मागणी वारंवार दिसते त्याअर्थी पितृपुत्रपरंपराहि स्थापित झाल्यासारखी दिसते. लग्न व स्त्रीपुरुषसंयोग यांतील भिन्नता पत्नी व दासी अशा भेदामुळें, व दासीपुत्रांना हलके समजत असत त्या वरून दिसत आहे. आणि त्याअर्थी विवाहसंबंधाचें पावित्र्यहि सिद्ध झालें होतें. ॠग्मंत्रांत उल्लेखिलेला कक्षीवान् औशिज यास जर राजपुत्राइतका मान असता तर त्यास भीक मागत देशोदेशीं फिरावें लागलें नसतें हें ॠग्वेदीय प्रमाण होय. ब्राह्मण कालीं दासीपुत्रांस हलके मानीत होते यांत नवल नाहीं. पण ते तसे मानीत होते याला प्रमाण हवेंच असलें तर कवष ऐलूषाची कथा देतां येईल. तेव्हां गृहस्थधर्मपूर्व सामाजिक इतिहास पाहण्यास आपणांस ॠग्वेदपूर्व समाजांकडे जावें लागेल. ॠग्वेदोत्तर समाजाकडे जाऊन आपणांस गृहस्थधर्माच्या पूर्वा यतीचें फारसें ज्ञान होणार नाहीं. एवढें मात्र खरें कीं, ज्याअर्थी दासीपुत्र व आईच्या नांवानेंच ओळखिले जाणारें पुरुष धार्मिक आयुष्यक्रमांत सुद्धां महत्त्वाचें स्थान पावूं लागले, व आचार्य म्हणून प्रसिद्धीस आले त्याअर्थी दासीपुत्राची सामाजिक स्थिति अत्यंत कठीण नसावी.

कुलांचा, जातींचा, व गोत्रांचा इतिहास यांचा दुसऱ्या कोणत्या तरी इतिहासांशीं संबंध लावावयाचा असल्यास तो यज्ञसंस्थेशीं व वाङ्मयेतिहासाशीं लावतां येतो. गोत्रें व प्रवर यांची कल्पना ॠग्वेदकालीं दिसत नाहीं. गोत्रें व प्रवर यांचे महत्त्व प्रथमत: श्रौतसूत्रांतच दिसतें म्हणजे यज्ञसंस्था संपूर्ण झाल्यानंतर दिसतें; आणि असें दिसतें, कीं प्रवरांचा उगम होतृवर्गांतील प्राचीनसंप्रदायांतून झाला असावा. यांविषयी विवेचन पूर्वीच्या एका प्रकरणांत सविस्तर केलें आहे.

वैदिक वाङ्मयाच्या इतिहासाचा मार्ग अंकित करण्यासाठीं दोनच राजकीय खळबळी दिसतात. एक राजकीय खळबळ प्रथमकाळ दाखविते व दुसरी अंतिम काळ दाखविते आणि त्या म्हटल्या म्हणजे दाशराज्ञयुद्ध व कौरवपांडवयुद्ध या अनुक्रमें होत.

दाशराज्ञयुद्धकालीन कथेविषयीं प्रस्तुत विभागांत ज्या नवीन गोष्टी मांडल्या आहेत त्या येणेंप्रमाणें:-

(१)दाशराज्ञयुद्धानंतर सर्व ॠग्वेदांतील मंत्रांची रचना झाली आहे. (२) दाशराज्ञयुद्ध हें आर्यन् लोकांचे पहिलें आगमन नव्हे (३) दाशराज्ञयुद्ध हें गोऱ्याकाळ्यांचें युद्ध नव्हतें. (४) गोऱ्याकाळ्यांचें युद्ध ॠग्वेदांत चित्रित नाहीं (५) आर्यदस्यूविरोधकल्पना ही ईश्वरसैतानयुद्ध कल्पनेप्रमाणें प्राचीन कल्पना आहे. आर्य हा जातिवाचक शब्द नसून शिष्टवर्गवाचक व यजनशीलवर्गवाचक शब्द आहे. (६) वर्ण हा शब्द समाजांतील श्रमविभागीवर्ग या अर्थानें ॠग्वेदांत नाहीं. (७) चार वर्गांचे अस्तित्व ॠग्मंत्रकालीं होतें व त्याच्याहि पूर्वी होतें, पण त्यास वर्ण शब्द लागला नव्हता. (८) वर्ण हा शब्द जेव्हां वर्गवाचक असेल तेव्हां यजनामुळें झालेल्या वर्गाचा वाचक होता आणि त्या शब्दाचें त्या अर्थानें अस्तित्व पर्शुभारतीयकालींहि असावें. (९) दाशराज्ञ युद्ध हें दोघां सदृश संस्कृतीच्या आर्यन् लोकांतच झालें तथापि दोन्ही पक्षांचे युद्धांतील सहाय्यक मात्र प्रसंगी भिन्न संस्कृतीय असूं शकतील.

वरील सर्व इतिहासाची अंगें सुदासापासून जनमोजयापर्यंतच्या मधल्या कालाच्या एक दोन पायऱ्याच सांगतात परंतु या दीर्घ काळांतील पायऱ्या विशेष बारीक तऱ्हेनें सांगणाऱ्या गोष्टी म्हणजे वैदिक वाङ्मय, ब्राह्मण जाति व यज्ञसंस्था या तीन होत. या तिहींचा अन्योन्याश्रम निकट आहे तो वेदविद्येंत सविस्तर दिला आहे. त्यांतील मुख्य गोष्टी येणेंप्रमाणें मांडतां येतील. वैदिक वाङ्मयाची घटना अशी सांगतां येईल कीं आज जें चार संहिता व ब्राह्मणें असें पृथक स्वरूप आहे तें ॠग्वेदाचें तृतीयसंहितीकरण असावें. संहितीकरणें एकंदर तीन झालीं असावीं. पहिलें संहितीकरण जेव्हां ॠक्सामयजु असें वर्गीकरण ॠग्मंत्रांतच दिसून येतें त्या काळचें होय. दुसरें संहितीकरण परंपराप्रसिद्ध व्यासाचें संहितीकरण असावें. तिसरें संहितीकरिण व्यासशिष्यकालीन असावें. दुसरें व तिसरें यांत अर्थात् अंतर फारसें नसावें. आणि जरी या दुसऱ्या व तिसऱ्या संहितीकरणाच्या कालामध्यें वेदांच्या निरनिराळ्या शाखा बांधल्या गेल्या असाव्या. तरी तो काल यज्ञसंस्थेच्या विकासाचा नसून अवनतीचाच होता असें म्हटलें पाहिजें. एवढेंच कीं ही संस्था मरतां मरतां थोडी भरभराटली असावी. हाच काल आरण्यकीय धर्माच्या उदयाचा काल होय, हाच काल ब्राह्मणसंघाचें वर्गस्वरूप जाऊन जातिस्वरूप मिळण्याचा काल होय, आणि हाच काल शाखावैशिष्टयाचा व शाखानुरूप नवीन गृह्यनिर्माण करून तेंच जातिवैशिष्टय करणाच्या प्रारंभाचा काल होय.

ॠग्मंत्रकालीं दैनिक अग्निहोत्रामध्यें सोम दिसत होता तो सोम दुर्मिळ होत जाऊन दैनिक अग्निहोत्रांतून तर गेलाच, परंतु प्रसंगोपात्त होणाऱ्या मोठ्या यज्ञांतून देखील सोम नाहिंसा होऊन सोम न मिळाल्यास कोणती तरी वल्ली वापरण्यास प्रारंभ होऊं लागला. हें वस्त्वंतर यजुर्वेदांत व ब्राह्मणांत दिसून येतें. इतका सोंमवल्लींचा यज्ञसंस्थेच्या इतिहासाशीं संबंध देतां येईल.

घरोघरचें दैनिक अग्निहोत्र अप्रिय किंवा लुप्त होऊं लागलें अशी स्थिती ॠग्मंत्रांत दृष्टीस पडते, व त्यामुळें मोठमोठ्या यज्ञास सार्वजनिक वर्गण्या घेऊन सुरुवात झाली, आणि लहान यज्ञांचे मोठे यज्ञ बनले. म्हणजे त्रैविद्यांच्या धंदेवाईक अस्तित्वास जागा उत्पन्न झाली. ज्या अर्थी दृष्टीचें व पशूचें हौत्र ॠग्वेदावरील ब्राह्मणांत नाहीं, व तें यजुर्वेदांत आहे त्या अर्थी मोठ्या सोमयागाची कल्पना उद्भवल्यानंतर ॠग्वेदाच्या संहितीकरणास प्रारंभ झाला असावा असें दिसतें. ॠग्वेदाचें दहावें मंडळ जेव्हां अथर्व्याचें गृह्य हिसकावून घेण्याची मसलत निघाली असावी त्यावेळचें दिसतें. गृह्यास उपयोगी पडणारे मंत्र दहाव्या मंडळांतच आहेत. इतरत्र फारसे नाहींत. ॠत्विग्वर्गांत दोन मुख्य स्पर्धा दिसतात. एक स्पर्धा त्रैविद्य व अथर्वे यांची, व दुसरी स्पर्धा कृष्णयजुर्वेदी व शुक्लयजुर्वेदी अध्वर्युंची. अथर्व्यांनां भांडून बाहेर पडलेल्या शुक्लांनीं प्रसंगी हातांत घेतलें असावें असें दिसतें. कारण वैतानसूत्र व पारस्कर यांची गट्टी दिसते. अथर्व्यांचा प्रवेश यज्ञसंस्थेत बऱ्याच उशिरां झाला असावा असें वाटण्यास प्रमाण म्हणून अथर्वांतील हौत्रउत्तर भागांत विसाव्या काण्डांत आहे असें देतां येईल आणि ते सर्व ॠग्वेदांतीलच मंत्र आहेत. हेंहि आणखी प्रमाण म्हणून देतां येईल.

ॠग्वेदांतील मंत्रांमध्येंच अनेक स्तोते एकत्र मिळून प्रार्थना करीत आहेत असें चित्र वारंवार येतें. आणि त्या स्तोत्यांत कांहीं तरी प्रकार होते असेंहि दिसतें. त्यांत गायत्री, अकीं, होते, ब्रह्ये हे मुख्यत्वानें सांगतां येतील. आणि त्या वेळेस या सर्वांचे स्वरूप जवळ जवळ सारखेंच असावें, पुढें स्पर्धेमध्यें होते व ब्रह्मे टिकले व अर्की व गायत्रीहे लयास गेले असें दिसतें. होता या शब्दाचा अर्थ अध्वर्यूच्या आदेशानें हौत्रवाक्यें म्हणणारा किंवा आव्हान करणारा असा नसून हवन करणारा किंवा मुख्यत्वानें हवन करणारा असा होता असें दिसतें (वेदविद्या पृ. ३७३-३७८). दुसऱ्या भागांत दिलेल्या उताऱ्यांवरून असें दिसून येईल कीं, होता यांतील हु धातूचा जितका आव्हानार्थी अर्थ निघेल तितकाच हवनार्थीहि अर्थ निघेल. अध्वर्यु हें पद शब्दाच्या स्वरुपावरूनच कर्मविशिष्ट न दिसतां पदवीविशिष्ट दिसतें, त्यामुळें त्यांचे उल्लेख चारहि वेदांतून फार थोड्या वेळां आलेले आहेत. हा अध्वर्यूंचा वर्ग होत्यांतूनच निघाला असावा, आणि प्रमुखत्वानें काम करणारा म्हणून अध्वर्यु म्हणवून घेत असावा. यांचेहि पहिलें भांडवल बरेंचसें. ॠचांच्या स्वरूपांत असावें आणि तें आज याजुषहौत्र म्हणून शिल्लक असावें. सर्वच क्रिया अगदीं प्रारंभी समंत्रक नसाव्या. ज्यावेळेस मोठमोठे याग करावयाचे असतील त्यावेळेस एकेक क्रिया समंत्रक होऊं लागली असावी. या वेळेस एकानें जर यज्ञांतील प्रत्येक क्रिया नियमबद्ध व मंत्रबद्ध करण्याकडे आपलें लक्ष घातलें तर दुसऱ्यानें अधिकाधिक स्तोत्रमंत्रांचा संचय करण्याकडे लक्ष घातलें. होत्यांची जी यज्ञसंस्था असेल तींत बरेचसें मंत्र म्हणून अग्निसमर्पण करण्यांत येत असेल तर अध्वर्यूच्या क्रियेमध्यें कर्मवैचित्र्य असेल. त्यांनीं कर्मवैचित्र्याकडेच लक्ष ठेवून आणि सोम दुर्मिळ होत असल्यामुळें सोमशिवाय यजनपद्धति निर्माण करून, 'सप्तहवि:संस्था' निर्माण केल्या, आणि त्या करतांना दुसऱ्या वर्गांची फारशी मदत घेतली नसावी. 'सप्तसोमसंस्था' ज्या वेळेस उत्पन्न झाल्या त्या वेळेस मात्र इतर लोकांची जरूर लागली. होता आणि अध्वर्यु यांचें एकीकरण अर्थात् सोमसंस्थांमुळें झालें एवढेंच नव्हे तर प्रत्यक्ष ॠग्वेदाची मांडणी देखील सोमसंस्थास अनुरूप करण्यांत आली. म्हणजे दर्शपूर्णमास, पशु यांचें हौत्र यजुर्वेदांतच आहे ॠग्वेदांत नाहीं. सोमसंस्थेमध्यें मात्र होत्याप्रमाणेंच उद्गात्यालाहि आमंत्रण करण्यांत आलें आहे. होत्यांच्या संघामध्यें जे आच यज्ञसंस्थेंत ॠत्विज् दिसतात ते त्यांची यज्ञसंस्था निराळी होती अशा स्थितीचेंच अस्तित्व दाखवितात. जो यज्ञांतील मुख्य मनुष्य, तो प्रेप देणार, तोच प्रशास्ता, परंतु जेव्हां अध्वर्यू व होते या दोघांचें एकीकरण झालें तेव्हां मुख्य पदवी 'होता' ही कायम राहिली व प्रशास्ता या पदवीऐवजीं मैत्रावरुण ही पदवी झाली असावी. म्हणजे होत्यांपैकीं जो समुच्चय अध्वर्युप्रधान सोमयागाला मिळाला त्यांतील होतृसहायकांत प्रेष देण्याच्या कामाचें महत्त्वच कमी करण्यांत आलें. ब्रह्मे हे देखील निराळ्याच यज्ञपरंपरेतील होते. ब्रह्मयाचे सहाय्यक स्वतंत्र आहेत व त्यांतहि हौत्र व आध्वर्यव करणारे आहेत. ब्राह्मणाच्छंसी हा ब्रह्म्याचा मनुष्य, पण कर्म करतो हौत्राचें. अग्नीध्र हा ब्रह्म्याचाच सहाय्यक पण कर्म करतो आंगमेहेनतीचें, अध्वर्युसारखें. पोता हाहि ब्रह्म्याचा मदतनीस पण याचें कर्म होत्यासारखें आहे. ज्या पद्धतीनें होते अध्वयुर्प्रधान यज्ञसंस्थेंत शिरले आणि त्यांचे मदतनीस आपल्या कामाचें स्वरूप न बदलता प्रविष्ट झाले म्हणजे वस्तुत: अध्वर्यु इत्यादींचें सहाय्यक बनून देखील नांवानें मात्र होत्यांचे साहाय्यक राहिले, तीन क्रिया ब्रह्म्यांस त्रैविद्यांच्या यज्ञसंस्थेंत स्थान मिळाल्यानें झाली. ही अध्वर्यूंची व ब्रह्म्यांची एकी झाली ती बराच काळ स्पर्धा झाल्यानंतरच झाली. त्यां स्पर्धेमध्यें ब्रह्म्यांनीं सोमयागाची अनवश्यकता वगैरे सांगून अध्वर्यूंच्या कामाला हरकत केलीच. ब्रह्म्यांची यज्ञसंस्था राजाश्रयानें चालत असावी व अध्वर्यूंची लोकश्रियावर चालत असावी. यामुळें अध्वर्यूंस ब्रह्म्यांस आपल्यांत घेण्याची इच्छा स्वाभाविकच झाली. तथापि ब्रह्म्यांस लोकसमाज अध्वर्यूंकडेच जास्त वळतो व अध्वर्यूंच्या यज्ञसंस्थेत लोकाकर्षक भागहि बराच आहे. ही गोष्ट पटली असावी व त्यांशीं समेट करण्याची इच्छा झाली असावी. अध्वर्यूंनीं ब्रह्म्यांस महत्त्वाचें स्थान दिलें. परंतु मुख्य व्यवस्थापकाचें काम आपणांकडेसच ठेविलें अध्वर्यूंनीं कित्येक लहानसहान क्रियांस सोमसंस्थांचें स्वरूप दिलें आणि अशा रीतीनेंत्या क्रिया ब्रह्म्यांच्या ताब्यांतून आपणांकडे घेतल्या, याला व्रात्यस्तोमाचें उदाहरण देतां येईल, असो.

यज्ञसंस्थांतील अंतस्थ घटनेसंबंधानें हें विवेचन झालें. संस्थांचें पौर्णपर्यहि मांडण्यांत आलेंच आहे. आतां सत्रविषयक विचारांचें पुनर्निरूपर करूं. सत्रें हीं प्राचीन मात्र लोकांचीं नसावींत असें वाटतें. सत्र शब्द  तशा अर्थानें ॠग्वेदांत नाहीं. सत्रें या शब्दाचा समुच्चयात्मक स्थान इतंपत अर्थ फार तर ॠग्वेदांत आलेल्या उदाहरणांतून काढतां येईल. सत्रें शुक्ल यजुर्वेदांत दिली नाहींत व कृष्ण यजुर्वेदांत देखील त्यांची मांडणी फार पुसट पुसट आहे. यावरून सत्रें फारशीं प्रचारांत नव्हतीं असें म्हणतां येईल. लोक फिरते असताना जी क्रिया स्वाभाविकपणे होई ती क्रिया पांचपन्नास मंडळींनी एकत्र बसून करावयाची हें मुख्य सत्र स्वरूप होय. सामुच्चयिक अग्न्युपासना ॠग्वेदांत दृष्टीस पडते, तिचें एक विशिष्टीकरण जर सोमयोगाच्या रूपानें दवाईकाकडून झालें तर सामान्यांकडून सत्ररूपान झालें. सामान्य जनांस आपण एकत्र होऊन कांहीं क्रिया करावयाची इच्छा उत्पन्न झाल्यास, जी कृति करावयाची ते सत्रसत्रात अर्थात सर्वसामान्यांनीं जमून तें केलें असल्यामुळें दक्षिणा नाहीं, यजमान ॠत्विज् ही भिन्नता नाहीं व त्यांचा कार्यक्रम विशेष विशिष्टीकस्ण पावला नाहीं, व नियमांनींहिं बद्ध झाला नाहीं. कृष्णयजुर्वेदामध्यें मात्र सत्रांत त्यांच्या वाढलेल्या संस्थाप्रमाणें दररोज याग करावेत असें सांगितलें आहे. लो. टिळकांनीं सत्रांच्या मुदतीचा संबंध तितक्या मुदतीचा दिवस असावा असा लावून त्यावरून उत्तरध्रुवात्मक मूलस्थानाच्या कल्पनेस तो आधार म्हणून दिला गेला.

समाजाचा इतिहास लिहिण्यासाठीं अनेक प्रकारच्या पद्धती वापरल्या जातात. त्या पद्धतीचें याथातथ्य ज्ञान करून देण्याचें हें स्थान नव्हे. त्याचें काही दिग्दर्शन पहिल्या विभागाच्या तिसऱ्या प्रकरणात केलें आहे. त्यामध्यें प्राचीन भारतीय व प्राचीन भिन्नस्थलीय भाषांचा तौलनिक अभ्यास, संस्कृत भाषेचा ऐतिहासिक अभ्यास व भिन्नकालीन भारतीय भाषाचा तौलनिक अभ्यास, प्राचीन कालाच्या अवशिष्ट वस्तूंचा अभ्यास उ. मोडकीं देवळें, जमीनीखालीं गाडलेलीं शहरें, राजवाडे वगैरेंचा स्थावरजंगम लिखाणाचा अभ्यास, मुद्राविज्ञान, तसेंच भारतीय संस्कृतीचा ज्या इतर भाषांवर परिणाम झाला असेल त्या इतर भाषाचा अभ्यास, संस्थारूप अवशेषांचा अभ्यास (उ. जातींचीं नावें, कुलदेवता इ.) तसेंच दैवतें, कल्पना, विचार, तत्त्वज्ञान इत्यादिकांवर अभ्यास म्हणजे तौलनिक दैवतशास्त्र इत्यादींचें स्वरूप वर्णिले आहे. आणि या सर्व प्रकारच्या अभ्यासापासून उत्पन्न होणारें ज्ञान तेंहि मांडले आहे. उदाहणार्थ तौलनिक दैवताभ्यास दुसऱ्या विभागांत दैवतेतिहासाबरोबर दिला आहे. भारतीय व अन्य स्थलीय भाषाच्या अभ्यासापासून जी इतिहासज्ञानप्राप्ति होते ती मूलगृहकालीन व पर्शुभारतीय संस्कृतीच्या वर्णनकालीं मांडलीच आहे. स्थावरजंगम लिहिणें व मुद्रविज्ञान यांच्यापासून होणारी फलप्राप्ती, जे ऐतिहासिक राजावलींचें व कथासूत्राचें धागें, त्याचेंहि फल प्रसंगानुसार मांडलेंच आहे. द्राविडी भाषेंतील शब्दसंग्रहाचा अभ्यास हा ऐतिहासिक पद्धतीनें करून त्यापासून उत्पन्न होणारी फलश्रुति ही मात्र फारशी मांडली गेली नाहीं. याचें कारण या इतिहासावर फारसा परिश्रमच झाला नाहीं. संस्कृत भाषेचा ऐतिहासिक अभ्यास करून त्यापासून जी इतिहासप्रगतीची मांडणी करावयाची त्या मांडणीचें प्रारंभस्थान वेदकालीन शब्दाचा साकल्यानें अभ्यास होय. हा अभ्यास प्रस्तुत विभागांत पहिल्या प्रथमच मांडला गेला आहे. आणि भविष्यकालीं या अभ्यासाची पद्धतशीर वृद्धि होईल अशी अपेक्षा आहे. वेदकालीन शब्दसंग्रहाचें साकल्यानें ज्ञान झाल्याशिवाय भाषेच्या ऐतिहासिक अभ्यासाच्या वल्गना व्यर्थ आहेत. आणि यासाठीं प्रस्तुत विषयाचा प्रारंभ म्हणून आम्ही त्याकडे बरीचशीं पृष्ठे दिलीं आहेत. शब्दसंग्रहाचा जो ऐतिहासिक अभ्यास व्हावयाचा त्याचे प्रकार मुख्यत: दोन आहेत. नवीन शब्द आणखी कोणते आले हें पूर्वीच्या शब्दाच्या यादीकडे लक्ष देऊन पाहावयाचें. आणि जुन्या शब्दांचे अर्थांतर कसकसें होत गेलें हें पहावयाचें. या दोन प्रकारच्या अभ्यासांनीं स्थित्यंतरामुळें बदललेली सामाजिक व सांस्कृतिक परिस्थिति लक्षांत येते. असो.

संस्कृतसंभव भाषांचा, निदान संस्कृतसंभव म्हणून समजल्या जाणाऱ्या भाषांचा, ऐतिहासिक अभ्यास होण्यास आवश्यक साधन शब्दसंग्रहाचें प्रयत्न होत. ते प्रयत्न बरेचसे झाले आहेत आणि बऱ्याचशा प्राकृत समजल्या जाणाऱ्या भाषांचे कोशहि झाले आहेत. आतां उत्तरकालीन भाषांच्या शब्दांचें व्युत्पादन करण्याचे प्रयत्नहि चालू आहेत. त्या भाषांचें व्याकरणहि अभ्यासिलें जाऊन त्याचा संस्कृत व्याकरणांशीं संबंध पाहण्याचें काम चालू आहे. राजवाड्यांचें ज्ञानेश्वरीचें व्याकरण हा एक त्या प्रकारच्या अभ्यासाचा उत्कृष्ट नमुना होय.

ऐतिहासिक विवेचनामध्यें आपण एकाच प्रगतीच्या दोन भिन्न कालांतील अवशेषांची तुलना करून प्रगति मोजतों. किंवा दोन भिन्नस्थलीय भिन्न लोकांचे अवशेष तुलनेकरितां घेतलेच तर ते त्या दोहोंपासून त्याच्या पूर्वीचें स्वरूप अवगमिण्याकरितां ते तुलनेस घेतों. यांत सदोष अनुमानाला जागा कमी असतें. परंतु याहून जराशी अधिक सदोष परंतु वापरली गेलेली तौलनिक पद्धति म्हटली म्हणजे प्रगत व रानटी लोकांचे आचार व संस्था घेऊन त्या रानटी लोकांच्या आचारांपासून प्रगत लोकांचे आचार उत्पन्न झाले असावे अशा तऱ्हेची कल्पना करून संस्थांच्या इतिहासाची मांडणी करणें होय. आपण सुधारलेलें लोक त्याच रानटी स्थितींतून विकास होत होत सुसंस्कृत स्थितीस येऊन पोंचलों तर आजच्या रानटी लोकांचे जे आचार विचार असतील तेच आपल्या पूर्वजांचें असतील आणि त्यापासून आजचें सुधारलेलें आचार विचार विकास पावले असतील अशा प्रकारची कल्पना करून निरनिराळ्या मानववंशांतील व जातींतील धार्मिक, सांस्कारिक, राजकीय व गृह्यसंस्थांचा इतिहास मांडण्यांत आला आहे. बाकोफन, मॉर्गन वगैरेनीं या प्रकारच्या इतिहासास प्रारंभ केला त्याच प्रकारच्या अभ्यासास पुढें इतर लेखकांनीं विस्तृत स्वरूप दिलें. स्पेन्सरचा 'समाजशास्त्रांची मूलतत्त्वें' हा ग्रंथ याच प्रकारचा आहे आणि वेस्टरमार्कचे विवाहसंस्थेच्या इतिहासावरील ग्रंथ व नैतिक कल्पनांच्या इतिहासावरील ग्रंथ याच प्रकारचे आहेत. बुद्धपूर्व जगांतील चर्चेस घेतलेल्या राष्ट्रांच्या इतिहासामध्यें आजच्या सुधारलेल्या बहुतेक संस्था पूर्णपणें संस्थापित झालेल्या दिसतात. तेव्हां वन्य व नागरिक यांच्या तौलनिक 'अभ्यासापासून जो इतिहासभाग निघेल तो त्यापेक्षाहि प्राचीन काळचा असावा, किंवा फार तर त्यावेळच्या आज प्रगत म्हणून समजल्या जाणाऱ्या लोकांच्या पूवजांचा पण त्या वेळेस अप्रगत असलेल्या लोकांचा तत्कालीन इतिहास असावा असें म्हणण्यास हरकत नाही.

इजिप्त व असुर येथील लोकांचा प्राचीन इतिहास ख्रिस्त पूर्व आठ हजार वर्षांपूर्वीपासून सुरू होते, आणि त्या कालापासून आपणांस अमनी लेखाच्या कालापर्यंतचें म्हणजे भारती युद्धाच्या कालापर्यंतचें त्या राष्ट्रांचें ज्ञान अधिकव्यवस्थित आहे. दाशराज्ञयुद्धकाल आपण घेतला तरी तो ख्रिस्तपूर्व अडीच हजार वर्षांच्या पलीकडे नेतां येत नाहीं. सुदासदिवोदासांच्यापूर्वीची राजावली आपण घेतली तर ती फार तर हजार पंधराशें वर्षे आणखी पाठीमागें आपणांस पोंचवील. जास्त पोचवूं शकणार नाहीं. म्हणजे फार तर ख्रिस्तपूर्व तीन हजार वर्षांपर्यंत आपणांस नेईल. इतकें जरी झालें तरी अत्यंत अनुमानानें काढलेल्या प्राचीनतम भारतीय कालापूर्वी चार पांच हजार वर्षे पश्चिमेकडे दोन मोठ्या संस्कृती नांदत होत्या असें स्पष्ट दिसून येईल. पर्शुभारतीयकाल आणि मूलगृहकाल या कालाचा आपणांस आज अजमास करतांच येत नाहीं परंतु असें म्हणतां येईल कीं, ज्या वेळेस या आर्यन् राष्ट्रांची प्राचीनतमस्थिति केवळ शब्दसादृश्यावरून काढावयाची आहे व ज्या काळामध्यें आर्यन् राष्ट्रें भटकींच होतीं त्या वेळेस असुर्य व इजिप्त या दोन राष्ट्रांची संस्कृति चांगलीच वाढली होतीं; व ज्या वेळेस ॠग्वेदमंत्ररचना झाली असेल कीं नसेल याविषयींच संशय आहे त्यावेळेस असुरियामध्यें शासनपद्धति इतकी सुधारली होती कीं, त्यांचा कायदा लेखनप्रविष्ट झाला होता एवढेंच नव्हे, तर त्यांचा ग्रंथहि (हमुरबीचें कोड) करण्यात आला होता. एवढेंच नव्हे, तर हमुरबीच्या कायदेसंग्रहांत व्यावहारिक  कायद्यापासून आवांतर गोष्टी पृथक् होऊन व्यावहारिक गोष्टीच केवळ कायद्याचा विषय झाला होता. इतकी सुधारणा प्रत्यक्ष रोमन लोकांमध्यें बारा नियमांच्या काळापर्यंत झाली नव्हती. आणि भारतामध्यें तर जोराजनिर्मित शासनवलीचा संग्रहच कधीं झाला नाहीं. काहीं व्यावहारिक नियमांचा संग्रह झाला तो धर्मशास्त्राकार अर्थशास्त्रकार यांच्याकडूनच झाला. मोठमोठ्या इमारती, मोठमोठे मनोरे या बाबतीत देखील अत्यंत प्राचीन अवशेष या दोन संस्कृतींत असे उपलब्ध होतात तसे आपल्याकडे उपलब्ध नाहींत. व आपल्याकडे अशोकपूर्व लेखहि उपलब्ध होत नाहीत असे म्हटलें तरी चालेल. म्हणजे भौतिक सुधारणांच्या बाबतींत प्राचीन आर्यन् यांच्या पेक्षा असुर व मिसरी यांची संस्कृति अधिक जुनी व अधिक उच्च होती असें म्हटल्याशिवाय गत्यंतर नाहीं.

तुर्कस्थानांतील अस्कलॉनमध्यें खोदकामांत जे अवशेष सांपडले (टाइम्स ऑफ इंडिया २८-५-२१) यांमध्यें तर इतक्या मोठ्या मूर्ती आढळल्या कीं त्या मूर्तीचे तळपाय एक वाराहून मोठे आहेत. अस्कलॉन शहराचा भरभराटीचा काळ म्हणजे ख्रि.पू. चवदावें शतक होय. नुकतेंच म्हणजे १८-९-२३ च्या सुमारास (त्या तारखेचा टाईम्स ऑफ इंडियाचा अंक पहा) सर आर्थर इव्हॅन्स यांनीं बाहेर काढलेल्या इजिअनसंस्कृतीच्या चित्रकलविषयीं वर्णन आलें आहे. व त्यावेळचीं कांही चित्रेंहि सापडलीं आहेत त्यांवरून तत्कालीन पशुपक्ष्याविषयीं फार सुंदर माहिती मिळते. त्याच पत्राच्या २९-८-२३ च्या अंकांत लंडनहून आलेल्या तारेमध्यें फ्रान्समध्यें प्राचीन काळीं असलेल्या मूर्तिशिल्पाचें ज्ञान दाखविणारा एक संग्रह सांपडल्याचें प्रसिद्ध झालें आहे. त्यामध्यें ज्या अनेक पशुपक्ष्यांचीं सुंदर घडणीचीं चित्रें आहेत, त्यापैकी बरेच प्राणी आज नष्ट झाले आहेत. तीं चित्रें कोणत्या काळीं घडलीं असावीं त्याविषयीं निश्चय झाला नाहीं, पण तो काळ वीस हजारांपासून पंचवीसहजार वर्षांपूर्वीचा असावा अशी कल्पना केली गेली आहे.

या सर्व गोष्टींवरून असें दिसतें कीं, असुरीमिसरी संस्कृतीच भौतिक बाबतींत भारतीय संस्कृतीच्या पुढें आहे एवढेंच नाहीं तर क्रीट फ्रान्स येथील संस्कृतीहि भौतिक बाबतींत भारतीय संस्कृतीच्या पुढें आहे.

पर्शूंची संस्कृति व भारतीयांची संस्कृति, यांची तुलना केली तर आपणांस असें म्हणतां येईल कीं, राजकीय सत्तेची घटना आणि साम्राज्यविस्तार याच्या बाबतींत पर्शूंचे महत्त्व ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकापासून ते मुसुलमानी उद्यापर्यंत होतें. परंतु बुद्धपूर्वकालीं याचें राजकीय महत्त्वहि फारसें नसावें. बुद्धोत्तरकालीं एवढेंच म्हणता येईल कीं मागधांच्या पराक्रमकालापेक्षा पर्शूंचा पराक्रमकाळ २०० वर्षे अधिक अगोदर येतो. परंतु अलेक्झांडरच्या नेतृत्वाखालीं ग्रीक सैनिकापुढें पर्शियन लोकांस टिकाव धरता आला नाहीं. आणि त्याच्या राजसत्तेंचे क्षत्र अशोककालीन राजसत्ताक्षेंत्रापेक्षां कधीच मोठें नसावें. पर्शूंना रोमन साम्राज्याशीं लढता लढता जरी आपलें महत्त्व कायम ठेवता आलें तरी त्यांची एकंदर राजकीय करामत भारतीय सम्राटांपेक्षां अधिक होती असा निर्णय देववत नाहीं. सांस्कृतिकदृष्टया त्यांचें एकंदर कार्य भारतीय कार्यापेक्षा कमी महत्त्वाचें व अधिक उत्तरकालीन होतें असें म्हटलें पाहिजे. झरथुट्र हा बुद्धपूर्वकालीन होता असें खात्रीनें सिद्ध झाल्याचें आम्ही समजत नाहीं. शिवाय पर्शूंमध्यें वेदांगादि शास्त्राचा विकास मुळींच झाला नाहीं. म्हणून त्या बाबतीमध्यें पर्शूंनां प्राचीन भारतीयांपेक्षां उच्च् तर संस्कृतीचें वाहक किंवा भोक्ते असें म्हणतां येणार नाहीं. सूतसंस्कृतीशीं समकालीन इराणी संस्कृति काय असावी याविषयीं अजमासच करतां येत नाहीं; एवढेंच नव्हे तर पर्शूंच्या राजावलीचा व निश्चित इतिहासाचा प्रारंभ शैशुनागांपेक्षां पूर्वी नाही.