प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण १ लें.
वेदांविषयीं भारतीय वृत्ति.

उपनिषदांची वृत्ति.– यज्ञकर्माची निंदा व तत्त्वज्ञानाची प्रशंसा उपनिषद्भंथांत केलेली दिसते. वेद ईश्वरप्रणीत आहेत हें जरी उपनिषदांत सांगितलें आहे तथापि तत्त्वज्ञानविषयक उपनिषद्भागाहून कर्मकांडविषयक वेदभाग गौण प्रतीचा आहे असेंच पुढें दिलेल्या वचनाचें तात्पर्य आहे.

“अज्ञानरूपी महासागरांतून तरून जाण्याच्या कामीं १६ ऋत्विज व यजमान आणि पत्‍नी मिळून १८ असामींच्या हातून घडणार्‍या ज्ञानरहित यज्ञकर्माची नाव बळकट आहे व तिचा आपणांस उपयोग होऊन आपण अज्ञानसागर तरून जाऊं असें जे कोणी मूढ समजत असतील ते पुन्हां अज्ञानसागरांतच गटंगळ्या खात राहतील अर्थात् ते पुन्हां जन्ममरणाच्या फे-यांत पडतील” ({kosh मुंडकोप. १.२.७.}*{/kosh} प्लवा ह्येते अदृढा यज्ञरूपा अष्टादशोक्तमवरं येषु कर्म। एतच्छ्रेयो येऽमिनंदंति मूढा जरा मृत्युं ते पुनरेवापियन्ति।।) याखेरीज “यज्ञयागादि कर्में व लोकोपयोगी अशीं विहिरी, तलाव वगैरे बांधणें इत्यादि पूर्त कर्में करीत राहणें हेंच कायतें पुरूषार्थाचें श्रेष्ठ साधन आहे असें जे मूढजन समजत असतात ते स्वर्गलोकांत कांहीं काळ सुख भोगून पुन्हां या किंवा याहूनहि खालच्या लोकांत जन्माला येतात” ({kosh मुंड. १.२,१०}*{/kosh} इष्टापूर्तं मन्यमाना वरिष्ठं नान्यच्छ्रेयो वेदयन्ते प्रमूढाः। नाकस्य पृष्ठे ते सुकृतेऽनुभूत्वेमं लोकं हीनतरं वा विशन्ति।।)

वेदामध्येंच असणार्‍या ज्ञान व कर्मकांडविषयक दोन विभागांपैकीं ज्ञानकांडविषयक विभागासच कसा मोठेपणा उपनिषदें देतात हें वरील उता-यांवरून स्पष्ट होतें. याच मुंडकोपनिषदांत सर्व भूतांनां व्यापून असणार्‍या परमात्म्याची ‘वेद’ ही ‘वाचा’ आहे. ({kosh मुंड०२.१,४.}*{/kosh} वाग्विवृताश्च वेदाः) असें जरी म्हटलें आहे तथापि वेदाच्या या सामान्य गौरवापेक्षां वर निर्दिष्ट केलेला कर्मकांड व ज्ञानकांड यांमधला तरतमभाव लक्षांत घेण्याजोगा आहे.

कर्म व ज्ञानविषयक भागास अनुसरून उपनिषदांत वेदवाङ्मयाचे परा व अपरा हीं नांवें देऊन दोन विभाग कसे दाखविले जातात व त्यांत ‘परा’ नामक भागास म्हणजे उपनिषद्भागास कसें महत्त्व दिलें जातें हें पाहणें मौजेचें आहे.

मुंडकोपनिषदांत एके ठिकाणीं शौनकानें अंगिरसाल प्रश्न विचारला आहे कीं, हे भगवन्, कोणत्या गोष्टीचें ज्ञान झालें असतां सर्व समजण्यांत येईल? (कस्मिन्नु भगवतो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातं भवतीति। मुंड० १.१,३.) या प्रश्नाला लागलीच उत्तर मिळालें आहे कीं, ‘अपरा’ व ‘परा’ या दोन विद्यांचें ज्ञान झालें म्हणजे सर्व समजण्यांत येतें.

ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, शिक्षा, कल्प, व्याकरण, निरूक्त, छंद व ज्योतिष यांनां ‘अपरा’ विद्या अशी संज्ञा आहे. (तत्राऽपरा ऋग्वेदो यजुर्वेदः सामवेदोऽथर्ववेदः शिक्षा कल्पो व्याकरणं निरूक्तं छंदो ज्योतिषमिति । मुंड० १.१,५.) व जिच्या योगानें अविनाशि अशा नित्य वस्तूचें परमात्म्याचें– ज्ञान होतें ती (उपनिषद्भाग) ‘परा’ विद्या होय. (अथ परा यया तदक्षरमधिगम्यते। मुंड ० १.१,५.).

वर दिलेल्या उता-यांवरून वेदापैकींच कर्मविशिष्ट भागापेक्षां ज्ञानविशिष्ट भागास दिलेलें वैशिष्ट लक्षांत येण्याजोगें आहे. तथापि ब्रह्माच्या गूढ ज्ञानप्राप्तीपेक्षां वेदांतील बाह्म भागांची म्हणजे ज्यांत संस्कार, विधी वगैरे सांगितले आहेत अशा भागांची किंमत फार कमी आहे या विचारांचें अस्तित्व दर्शविण्यासाठीं आणखी कांहीं उतारे पुढें देत आहों.

उपनिषद्विचारंचीच पुनरावृत्ति करणारी भगवद्गीता, तींत श्रीकृष्ण म्हणतात, हे पार्था, भोग व ऐश्वर्य यांच्या प्राप्तीसाठीं धडपड करणारे व कामनांच्या ठिकाणीं चित्त ठेवणारे जे अज्ञानी लोक फलप्राप्तीविषयीं खुलवून दिलेलीं वचनें पाहून त्याविषयींच बडबड सुरू करतात, वेदवाक्यांची काथ्याकूट करीत बसतात, कर्मकांडापेक्षां थोर कांहीं नाहीं असें प्रतिपादन करतात, स्वर्गप्राप्ति हेंच ज्यांचें ध्येय व जन्म आणि कर्में यांचीच प्राप्ति करून देणार्‍या जगद्व्याल वैदिक क्रियेचेंच जे स्तोम माजवितात, त्या भोग व ऐश्वर्य यांनीं वेडावलेल्या अर्थात् चित्त ठिकाणावर नसलेल्या लोकांची अनेक ठिकाणीं गुंतून राहिलेली बुद्धि एकाग्रतेच्या कामीं उपयोगी पडत नाहीं (यामिमां पुष्पितां वाचं प्रवदंत्यविपश्चितः । वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः ।। कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदाम्। क्रियाविशेषबहूलां भोगैश्वर्यगतिं प्रति।। भोगैश्वर्यप्रसक्तानां तयाऽपहृतचेतसाम्। व्यवसायात्मिका बुद्धि समाधौ व विधीयते ।। भागव० .४२-४४).

याच्या पुढच्या ४६ व्या श्लोकांत “क्षुद्र अशा एखाद्या पाण्याच्या डबक्यांत जितक्या गरजा भागतात तितक्या गरजा मोठ्या थोरल्या तलावांत सहजच भागून जातात. त्याचप्रमाणें सर्व वेदांमध्यें सांगितलेल्या कामना आत्मसाक्षात्कार झालेल्या ब्राह्मणाला सहजच प्राप्त होत असतात” असें म्हटलें आहे. (यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके । तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः) छांदोग्य उनिषद् (.१.२-३) यामध्यें सनत्कुमाराला नारद म्हणत आहेत कीं हे भगवन्, मी ऋग्वेद जाणतों, यजुर्वेद, सामवेद चौथा अथर्ववेदहि जाणतों. इतिहास पुराणेंहि मला ठाऊक आहेत. पण मी नुसता मंत्रवेत्ता आहें, मला आत्मक्षान नाहीं, याबद्दल मला दुःख वाटतें. यावर सनत्कुमार उत्तर देतात कीं नारदा, जें कांहीं तूं जाणत आहेस त्याचेंच नांव आत्मा. (ऋग्वेदं भगवोऽध्येमि यजुर्वेद सामवेदमाथर्वणं चतुर्थं....एतद्भगवो ध्येमि। सोहं भगवो मंत्रविदेवास्मि नाऽत्मवित्.....त होवाच यद्वै किं चैतदध्यगीष्ठा नाभैवैतत्) ऋग्वेदादि चार वेद तूं जाणत आहेस तेंच नामब्रह्म होय यासाठी तूं त्या नामब्रह्माचीच उपासना कर (नामोपास्वेति). जो कोणी नामब्रह्माची उपासना करतो त्याला त्या नामब्रह्माचे ठिकाणीं यथेष्ट संचार करतां येतो. ‘(स यो नामब्रह्म इत्युपास्ते यावन्नम्रो गतं तत्रास्य यथाकामचारो भवति यो नाम ब्रह्मेत्युपास्ते। छांदो० .१,५) भागवतपुराणांतील एका श्लोकांतहि ब्रह्मविद्येचें महत्त्वच दर्शविलें आहे. “हे राजा, सर्वपृथ्वीभर पूर्वेस शेंडे करून दर्भ पसरून यज्ञनिमित्तानें झालेल्या अतिशय पशुवधाचाच अभिमान बाळगून तूं स्तब्ध बसला आहेस व आत्मज्ञानसंपादनरूप सत्यकर्म करण्याचें मनांत सुद्धां आणीत नाहींस याला काय म्हणावें? अरे ज्या योगानें हरीचा-भगवंताचा –संतोष होईल, त्याचा प्रसाद होईल तीच खरी विद्या व तेंच खरें कर्म” हरीच्या ठिकाणीं बुद्धी जडविणें हीच खरी विद्या आहे. (आस्तीर्य दर्भैः प्रागग्रैः कार्त्स्येन क्षितिमंडलम्। स्तब्धो बृहद्वधान्मानी कर्म नावैषि यत्परम्।।  

तत्कर्म हरितोषं यत् सा विद्या तन्मतिर्यया ।। .२९,४९) ब्रह्मज्ञान होण्यास वेदांतील अनेकेश्वरीमत कसा अडथळा करितें व त्या मतापासून निघालेल्या व स्वर्गसुखाच्या इच्छेनें केलेल्या संस्कारांविषयीं तिटकारा नसला तरी निदान अनादर तरी कसा वाटत असे हें वरील उतार्‍यावरून सहज कळून येण्यासारखें आहे.