प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण ७ वें.
देश्य चळवळ व परराष्ट्रीय राजकारण.

सामान्य जनतेची जागृति.- सध्यां हिंदुस्थानामध्यें सामान्य जनतेंत राजकीय जागृति होऊं लागली आहे ही गोष्ट कोणाहि मनुष्यास नाकबूल करतां यावयाची नाहीं. अन्योन्याश्रयामुळें विशिष्ट क्रियेच्या अगर ती विशिष्ट क्रिया करणार्‍या वर्गाच्या हातीं एक प्रकारची सत्ता असते आणि संघशक्तीनें या सत्तेचा फार उपयोग करून घेतां येतों हें प्रत्येक वर्गास पटूं लागलें आहे. सरकारी नोकरींत असलेले कारकून, रेल्वे आणि टपाल यांतील नोकर आणि ट्रॅमवे, गॅस इत्यादि नगरोपयोगी कार्यांचे सेवक, तसेच भंगी व झाडूवाले इत्यादि लोकांस स्वहितरक्षणार्थ संघीभूत होऊन पगार वाढवून घेण्याचें धैर्य युद्धामुळें उत्पन्न झालेली महागाई आणीत आहे. जो अधिक ताणून धरील तो अधिक मिळवील आणि जो वर्ग एकजुटीनें वागेल तो अधिक ताणून धरण्यास समर्थ होईल, हीं तत्त्वें प्रत्येक काम करणारा ओळखूं लागला आहे. समाजांतील अन्योन्याश्रय ओळखून कामाच्या महत्त्वाच्या दृष्टीनें स्वतःच्या वर्गाचें भवितव्य ठरवून घेणें हा स्वयंनिर्णयाचा ओनामा आहे. येथील व इतरत्र जगांतील सर्व चालू व भावी राजकीय चळवळ समाजांतील या अन्योन्याश्रयावरच रचली गेली आहे व जाणार आहे.

संघामुळें उत्पन्न होणार्‍या लोकशक्तीच्या होत असलेल्या वाढीमुळें आणि जे कायदेशील हक्क लोकांस दिले गेले आहेत त्यांमुळें लोकांत आत्मविश्वास आणि स्वसामर्थ्यभावना उत्पन्न झाली आहे आणि यांच्या योगानें राष्ट्रास विशिष्ट हेतु अथवा ध्येय उत्पन्न होईल. आपणांस कांहींतरी करणें शक्य आहे असें जेव्हां वाटतें तेव्हांच कांहींतरी विधायक योजना करण्याची प्रवत्ति होते. ज्याच्या हातीं अधिकार नाहीं आणि अधिकार हातीं घेण्याची दूरची देखील ज्यास शक्यता नाहीं असा मनुष्य विनाकारण योजना करीत बसण्याचे परिश्रम त्यास मनोराज्याची खोड लागली असल्याशिवाय कशाला घेईल? कांहींतरी करतां येईल ही भावना जेव्हां नसेल तेव्हा लोकांत कर्तव्यशून्यता वागते आणि राष्ट्र दुर्गतीस पोंचतें. आजची कायद्यानें लाभलेली कार्यशक्ति अत्यंत अपुरी आहे असें जे समजतात त्यांनीं असहकारितेची चळवळ सुरू केली आहे. या चळवळची सर्व संभाव्य परिणाम सध्यां सांगण्याचा प्रयत्‍न करणें म्हणजे ज्ञानकोशकाराचा धंदा सोडून भविष्यवाद्याच्या धंद्यांत शिरणें होय. तथापि तात्कालिक परिणाम लिहिण्यास हरकत नाहीं. कारण ते सांगणें म्हणजे अत्यंत निकट कार्यकारणांचें विवेचन करणें आहे.

असहकारितेच्या चळवळीमुळें अधिक जहाल मंडळी नव्या कौन्सिलांचा त्याग करतील आणि त्यामुळें कौन्सिलांत शिरून सरकारशीं एकसारखा भांडत बसणारा वर्ग कमी होईल. लोकपक्षाच्या सुविचारयुक्त योजना पुढें मांडण्याची जबाबदारी त्यांचे प्रतिनिधी आपणांवर घेत तोंपर्यंत विधायक कामाची जबाबदारी सरकारवरच असते आणि यामुळें ही चळवळ नसती तर सरकारास नावडता पण अधिक जहाल व त्यामुळें अधिक लोकप्रिय वर्ग कौन्सिलांत प्रविष्ट होऊन त्यानें कोणतेंहि कार्य पार पाडणें सरकारास अशक्य केलें असतें. आज आंत जाणारा वर्ग लोकांच्या दृष्टीनें-कदाचित् चुकीच्या दृष्टीनें-‘घरभेद्या’ आहे आणि ज्या लोकांनीं ‘घरभेदीपणा’ करून कौन्सिलांत प्रवेश केला त्यांजवर काम चांगलें करून दाखविण्याची जबाबदारी अधिक पडली आहे. कारण हा घरभेदीपणा चांगल्या कामानेंच क्षम्य किंवा योग्य ठरणार. याशिवाय हेंहि लक्षांत घेतलें पाहिजे कीं, आंत गेलेल्या लोकांच्या वचनास अधिक महत्त्व देण्याची प्रवृत्ति सरकार दाखवील. कां कीं, सरकारवर विश्वास ठेवून ज्यांनीं काँग्रेसची आज्ञा अमान्य केली ते लोकहि चिडून कौन्सिल सोडून निघून गेले म्हणजे असहकारितेच्या तत्त्वाला अधिक जोर मिळेल.

असहकारितेचा विजय होण्यास एकंदर मजूरवर्गाची संघशक्ति वाढविली पाहिजे हें ओळखल्यामुळें आणि मजूरवर्गाची संख्या फार मोठी असून त्यांस मत असल्यामुळें मजूरवर्गामध्यें जाऊन काम करण्याची प्रवृत्ति मुत्सद्दयांत वाढेल. आक्टोबर महिन्याच्या ३१ तारखेस पहिल्या (ट्रेड युनियन काँग्रेसमध्यें) कामकरी संघाच्या परिषदेंत अध्यक्ष या नात्यानें लाला लजपतराय यांनीं जें भाषण केलें त्यांत त्यांनीं समाजाच्या अन्योन्याश्रयामुळें मजूरवर्गाच्या हातीं समाजाच्या किल्ल्या आहेत आणि देशाचें दास्य नाहींसें करण्यास मजूरांचें संघीकरण फार उपयोगी पडेल या तर्‍हेची आशा शब्दस्फुट केली.