प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.
उपप्रकरण ७ वें.
देश्य चळवळ व परराष्ट्रीय राजकारण.
परराष्ट्रीय राजकारण.- जें राष्ट्र अगोदरच परसत्तेखालीं आहे त्या राष्ट्रास परराष्ट्रीय राजकारणांत कितपत क्षेत्र असणार? फारसें नसणारच हें खरें, पण मुळींच नसतें असें नव्हे. राज्यें परराष्ट्राच्या सत्तेखालीं असलीं म्हणजे फितुरी व राज्यक्रान्त्यर्थ चळवळी या दोन दृष्टींनीं राष्ट्रांराष्ट्रांच्या व्यवहारांत तीं पडूं शकतील. राज्यक्रान्त्यर्थ खटपट करणारा पक्ष परकीय राष्ट्रांच्या साहाय्याची अपेक्षा करतो आणि त्यांशीं दळणवळण सुरू करतो. हिंदुस्थानांत राज्यक्रांति करावी या हेतूनें हरदयाळ इत्यादि खटपटी मंडळींनीं गदर नांवाची चळवळ अमेरिकेंत सुरू करून इंग्लंडच्या शत्रूंशीं हातजमाई केली होती असें दिसून येतें. गदर चळवळ मृत झाली आहे आणि मोठ्या साम्राज्याला उलथून पाडण्यास आपण समर्थ होऊं अशा कल्पना यापुढें लोकांच्या डोक्यांत शिरण्याचा फारसा संभव नाहीं. अर्थात् या दृष्टीचें म्हणजे बंडासाठीं साहाय्य मागण्याचें राजकारण येत्या अनेक वर्षांत होईल असें दिसत नाहीं.
तथापि परराष्ट्रीय राजकारण अगदीं बंद राहणें मात्र शक्य नाहीं. राजकारण आणि सामाजिक चळवळी यांमधील रेषा दिवसानुदिवस कमी कमी होत जाईल. मजुरांच्या सार्वराष्ट्रीय परिषदा भरत आहेत आणि भांडवलवाल्यांच्याहि बर्याच भागांत परिषदा भरत आहेत. मजुरांच्या सार्वराष्ट्रीय परिषदांमध्यें हिंदुस्थानास अधिकाधिक महत्त्वाचें स्थान मिळावें म्हणून हिंदुस्थानसरकार व लोक खटपट करीत आहेत. मजुरांच्या परिषदांचा सर्व राष्ट्रांवर जर अधिकाधिक परिणाम होऊं लागला आणि हिंदुस्थान या मजूरपरिषदांमधून आपलें वजन वाढवूं लागलें तर सार्वराष्ट्रीय राजकारणाच्या खर्याखुर्या भागांत हिंदुस्थानचा प्रवेश झाला असें होईल. याशिवाय हेंहि लक्षांत ठेवलें पाहिजे कीं, राष्ट्रसंघ जसजसा अधिकाधिक बलवान् होत जाईल तसतसें परराष्ट्रीय राजकारणाचें किंवा त्यांत दाखविल्या जाणार्या मुत्सद्दीगिरीचें महत्त्व कमी कमी होत जाऊन राष्ट्रसंघाच्या परिषदांत काम करण्याचें महत्त्व वाढेल.
परराष्ट्रीय मुत्सद्दीगिरीचें स्वरूप दिवसानुदिवस सामान्य व्यवहाराच्या नियमांनीं अधिकाधिक बद्ध होत जाईल. गुप्त तहनामे बंद होणार त्यामुळें मुत्सद्दयांनां आपल्या राष्ट्राच्या नकळत कांहींएक करतां येणार नाहीं आणि एक मोठें राष्ट्र लहान राष्ट्रास धाकदपटशा देऊन कांहीं उपटूं लागेल तर तिकडे सगळ्या जगाचें लक्ष लागेल. या स्थितीमध्यें राजकारणाच्या मुस्तद्दीगिरीची खरी मजा गेली. राष्ट्राराष्ट्रांतील तहनामे या नवीन परिस्थितीमुळें दोन कंपन्यामधील काराराच्या स्वरूपाचे होतील.