प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.
उपप्रकरण ७ वें.
देश्य चळवळ व परराष्ट्रीय राजकारण.
देश्य चळवळीचें कांहीं स्वरूप राष्ट्रधर्म व राजकीय बल यांविषयीं विवेचन करतांना स्पष्ट केलें आहे. या चळवळीच्या काँग्रेससारख्या यंत्राच्या स्पष्टीकरणाचें महत्त्वाचें अंग म्हटलें म्हणजे संस्था ज्या भावनांतून निर्माण होतात त्या भावनांचा आणि त्या भावनांच्या बनावटीचा इतिहास हें होय. सामान्य, अधिकारहीन आणि द्रव्यहीन अशा वर्गास चेतना उत्पन्न करण्यासाठीं ज्या कांहीं खटपटी झाल्या त्यांचें स्वरूप आपल्या लक्षांत नीट आलें पाहिजे. देश सुव्यवस्थितपणानें सुसंघटित करणें याच्या पुढील पायरी म्हटली म्हणजे त्या देशानें पराराष्ट्राशीं बरोबरीच्या नात्यानें व्यवहार करणें ही होय.