प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.
उपप्रकरण ७ वें.
देश्य चळवळ व परराष्ट्रीय राजकारण.
जिप्सींसंबंधानें हिंदुस्थानचें कर्तव्य.- जिप्सींविषयीं आपलें कांहींतरी कर्तव्य आहे ही गोष्ट विसरणें अयोग्य होईल. जिप्सींचें परदेशगमन हें मध्यकालांत झालें.
जिप्सींच्या विषयीं आज आपणांस काय करतां येईल? जिप्सींच्या अंगांत भारतीय भावना संचरूं लागली तर ती गोष्ट हिंदुस्थानास हितावह होईल यांत शंका नाहीं. संस्कृतीच्या आणि मनुष्यहिताच्या प्रगतीस ही गोष्ट हितावह आहे कीं, ज्या भटक्या जाती आहेत त्यांस स्थायिकता प्राप्त व्हावी, आणि मनुष्यसमूह तुटक तुटक आहेत ते एकमेकांशीं संयुक्त व्हावे. जिप्सींचीहि या ध्येयानुसार प्रगति होणें अवश्य आहे. या प्रगतीसंबंधानें महत्त्वाचा प्रश्न एवढाच कीं, या भावी जिप्सींनीं त्या त्या देशांतील जनतेंत पूर्ण समाविष्ट व्हावें किंवा आपलें भारतीयत्व कायम ठेवावें. त्यांचें भारतीयत्व कायम राहणें शक्य नाहीं या प्रकारच्या भवितव्याच्या सूचक गोष्टी घडून येत आहेत. रोमानिया, बल्गेरिया वगैरे भागांत पुष्कळ जिप्सी तेथील सामान्य रहिवाशांप्रमाणें राहूं लागले आहेत, आणि खुद्द इंग्लडमध्यें देखील जिप्सी व इतर जनता यांचे लग्नव्यवहार होऊं लागले आहेत. जिप्सींची जात शुद्ध नाहीं. त्यांनीं निरनिराळ्या राष्ट्रांतील आणि निरनिराळ्या जातींची मुलें चोरल्यामुळें आणि कित्येक दुसरे भटक्ये त्यांत सामील झाल्यामुळें त्यांची जात आज मिश्र झाली आहे. शिवाय जिप्सींस स्थाईक वस्ती करून रहावयास भाग पाडणारे कायदेही चोहोंकडे झाले आहेत. या तर्हेच्या गोष्टी जिप्सींचा समावेश पाश्चात्त्य राष्ट्रांत होईल अशी भवितव्यता दाखवितात.
उलट बाजूनें बोलावयाचें झाल्यास आपणांस असें म्हणता येईल कीं, एक हजार वर्षें जी जात सतरा रक्तांशीं मिसळून सतरा ठिकाणचे हाल सोसून आणि कोणत्याहि तर्हेचें कायमचें वाङ्मय नसतां आपलें स्वत्व कायम ठेऊं शकली, ती जात ज्या राष्ट्रां, तिची वस्ती आहे त्या राष्ट्रास तेथील राष्ट्रीकरणाच्या शिक्षणपद्धतीनें एकदम पचनीं पाडतां येईल असें म्हणवत नाहीं. ज्यू लोकांसारख्या लोकांनां शहरांत रहावयास मिळतें, आणि त्या लोकांनां राष्ट्रांत मानाच्या जागाहि अनेक मिळतात. तरी देखील ज्यू लोकांस राष्ट्रांत समाविष्ट करण्याचें काम कोठेंहि यशस्वी झालेलें नाहीं. तसेंच पारमार्थिक संप्रदाय हें वैयक्तिक मत असून तें आजच्या काळांत सुद्धां बापापासून मुलाला प्राप्त होतें, यावरून पितृमूलक धर्म राष्ट्रीकरणाच्या तडाक्यांत सांपडेल तरी विलिन होतील किंवा नाहीं असा संशय वारंवार वाटतो.
जिप्सींच्या संबंधानें आपणांस जें करता येईल आणि जें करणें आपणांस हितावह होईल तें हें कीं, त्यांचें भारतीयत्व जागृत करणें. या जागृतीच्या कार्यासाठीं आपल्या देशांतून जिप्सींमध्यें काम करण्यासाठीं प्रचारक गेले पाहिजेत. त्यांच्या भाषांचा अभ्यास करून, हिंदुस्थानच्या इतिहासाची त्यांस माहिती व्हावी व त्यांस आपल्या रामायणभारतादि ग्रंथांची ओळख व्हावी या हेतूनें त्यांच्या भाषांत वाङ्मयहि तयार केलें पाहिजे.
जिप्सींनां संस्कृत भाषेची ओळख होऊन त्यांस संस्कृत भाषेशीं त्यांच्या भाषांचा असलेला संबंध कळावा हेंहि त्यांच्या मध्यें भारतीयभावना प्रसृत होण्यास अवश्य आहे. त्यांच्या मध्यें जाऊन जें कार्य करावयाचें तें दोन हेतूंनीं करावयाचें. एक हेतु त्यांची भारतीयभावना दृढ होत जावी हा होय. आणि दुसरा हा कीं, त्यांनां त्यांच्या वस्तीच्या देशांत चांगली अधिक स्थिति प्राप्त होण्याची व्यवस्था व्हावी. त्यांनां अधिकाधिक चांगली स्थिति प्राप्त झाली आणि त्यांच्या पत्करलेल्या देशांत त्यांनां मानाची पदवी प्राप्त झाली म्हणजे ते आपली अधिक महत्त्वाची जबाबदारी ओळखून ती पार पाडण्यास लायक होतील. जे लोक एका देशांतून दुसर्या देशांत गेले व तेथील नागरिक बनले त्यांचें संस्कृतीच्या इतिहासांतील स्थान फार महत्त्वाचें आहे. ते दोन राष्ट्रांतील मध्यस्थांचें कार्य करतात. तसेंच दोन भिन्न संस्कृतींनीं एकत्र मिसळ्याचें कार्य ते सोपें करतात. असो.
परदेशीय राजकारणाचें मुख्य ध्येय सर्व राष्ट्रांचा परस्परांशीं सुलभतेनें व्यवहार व्हावा हें होय. दुर्बलांचें संरक्षण करण्यासाठीं हिंदुस्थान जी खटपट करील ती वरी ध्येयास पोषक होईल.