प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण ७ वें.
देश्य चळवळ व परराष्ट्रीय राजकारण.

व्यापारी प्रतिनिधि.- हिंदुस्थानामध्यें व्यापारी मंडळीस आपला व्यापार वाढविण्यासाठीं संघ करून त्या संघाच्या शाखा चोहोंकडे उपस्थित करण्याची शक्यता आज आहे. या तर्‍हेनें त्यांनीं प्रयत्‍न केला तर आज कॉन्सल्स जें काम करतात तेंच काम या संघांच्या उपकार्यालयांकडे राहील. या तर्‍हेचीं गृहें विविध राष्ट्रांत स्थापन करावीं म्हणून व्यापारी मंडळींत आज थोडाबहुत बोलवा आहे तो बोलवा फार नसण्याचें कारण एवढेंच कीं हिंदुस्थान देश हा कच्च्या मालाचा उत्पादक आहे, पक्क्या मालाचा उत्पादक नाहीं. पक्क्या मालाच्या उत्पादक देशास सर्व जगाच्या बाजारांकडे डोळ्यांत तेल घालून पहावें लागतें. सध्यां कॉन्सलचें मुख्य काम आपल्या देशांतीत पक्का माल खपविणें हें आहे व तें करण्यास आपणांस फारसें क्षेत्र नाहीं.

जर राष्ट्रें दुसर्‍या राष्ट्रांच्या जमिनींचे तुकडे स्वतःच्या घशांत टाकण्याची हांव सोडून देतील तर त्यांस सार्वराष्ट्रीय मुस्तद्दीगिरीचें असें काम तरी कोणतें बजावावयाचें राहील? असें काम राहील तर तें व्यापारासंबंधाचें असणार व त्यांत साखर पेरणार्‍या मुत्सद्दयापेक्षां आपला माल दुसर्‍याच्या बाजारांत कां शिरत नाहीं याचें आर्थिक परिक्षण करणाराच मनुष्य अधिक उपयोगी पडेल. वर कल्पिलेल्या परिस्थितींत जें कार्य परदेशस्थ प्रतिनिधीस पहावें लागेल तें हें कीं, आर्थिक चढाओढीमध्यें दुसर्‍यास अधिक यश येण्यास कोणत्या गोष्टी कारण झाल्या असतील त्यांचा छडा लावणें व आपल्या राष्ट्रालां परराष्ट्रांत धंदा करण्यास असलेली संधि शोधणें. या तर्‍हेच्या कार्यासाठीं जर खासगी संस्था प्रयत्‍न करूं लागतील तर त्याच्या आड सरकार येणार नाहीं व कदाचित् या प्रकारचे प्रतिनिधी सरकारमार्फतहि नेमतां येतील.