प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.            
 
हेमचंद्रासंबंधी माहिती- हेमचंद्र हा कार्तिक शु. १५ संवत् ११४५ (इ.स.१०८८ किंवा १०८९)या साली धुंडुक नांवाच्या एका गांवांत जन्मास आला हें गांव सध्यां अहमदाबाद जिल्ह्याच्या हद्दींत आहे. याच्या बापाचें नांव चचिग व आईचें नांव पहिनी असून हीं दोघेंहि गरीब बाण्याच्या कुळांतील होतीं.हेमचंद्राचें मूळचें नांव चंगदेव होतें.त्याची आई मोठी धार्मिक वृत्तीची बायको होती.तिच्या पोटीं येणारा पुढें मोठा नांवलौकिकवान् होणार आहे असें तिला अगोदरच स्वप्नांत कळलें असून या स्वप्नाचा अर्थ तिला देवचंद्र नांवाच्या एका जैन भिक्षूनें सांगितला होता असें म्हणतात. हेमचंद्र पांच वर्षाचा झाल्यावर देवचंद्रानें पहिनीला बरेच पैसे देऊं करून हेमचंद्रास धर्मकार्यार्थ वाहून टाक म्हणून तिला उपदेश केला. पहिनीनें त्याप्रमाणें केलें परंतु त्याबद्दल पैसे मात्र घेतले नाहींत.हेमचंद्राला देवचंद्राच्या हवालीं केलें. माघ शु.१४ च्या दिवशीं रविवार होता.या समारंभाचे वेळीं त्याचें नांव चंगदेव होतें तें सोमचंद्र असें ठेविलें. पुढील बारा वर्षोतील हेमचंद्रासंबंधीं फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. या काळांत हेमचंद्रानें विद्याभ्यास संपल्यावर त्याला सूरि किंवा आचार्य ही पदवी देण्यांत आली. या वेळेस त्याचेंनांव पुन्हां एकदां बदलले गेलें. आतां त्याला लोक हेमचंद्र असें ह्मणू लागले. हेमचंद्राबद्दलचा दुसरा उल्लेख, अनहिल पट्टण या गांवच्या एका स्वरात मोठया समितीचा पुढारी म्हणून आलेला आहे. त्यावेळी, तेथें जयसिंग किंवा सिद्धराज नांवांचा राजा राज्य करीत होता. याचें राज्य अबूपासून गिरनारपर्यंत पश्चिमसमुद्रापासून माळव्याच्या सरहद्दींपर्यंत पसरलेलें होतें.त्यानें पूर्वापारपासून आपल्या घराण्यांत चालत आलेली शिवपूजा कधींहि चुकूं दिली नाहीं. तथापि, विद्येचा तो मोठा चहाता असून धर्मसंशोधनाची त्याला मोठी आवड होती. हेमचंद्रानें आपल्या चतुर युक्तिवादानें सिद्धराजास आपल्या संप्रदायांत ओढण्याचा नसला तरी त्यासाठीं त्याच्या मनांत सहानुभूति उत्पन्न करण्याचा प्रयत्न चालविला होता.आपल्या ब्राह्मण प्रतिपक्षीयांशीं वादविवाद करण्यांत हेमचंद्र मोठा कुशल होता. त्याच्याबद्दल व जयसिंगाबद्दल कित्येक गोष्टी प्रसिद्ध आहेत.

जयसिंहानंतर जयसिंहाचा पुतण्या कुमारपाल गादीवर आला. त्याच्या कारकीर्दीचीं पहिलीं दहा वर्षे राज्याच्या उत्तर सरहद्दीवरचा प्रदेश जिंकण्यांतच गेलीं. शत्रूचें भय चोहों बाजूंनीं नाहींसें झाल्यावर त्यानें शांतवृत्तीनें ध्यानधारणेमध्यें आयुष्य घालविण्याचा उपक्रम सुरू केला. कुमारपालाचें लक्ष अशा रीतीनें पारमार्थिक विचाराकडे वळविण्यास हेमचंद्र कारणीभूत झाला असावा यांत संशय नाहीं. या गोष्टीला अनुलक्षून मोहराजपराजय नांवानें एक नाटकहि लिहिलेलें आहे. कुमारपालाच्या मागाहून अजयपाल गादीवर बसला. त्याचा मंत्री यश:पाल यानें हें नाटक लिहिलें असल्यानें, हेमचंद्राच्या काळासंबंधीच्या माहितीसाठी आधारभूत जे ग्रंथ आहेत त्यांपैकीं सर्वांत जुना ग्रंथ हा होय. या नाटकाप्रमाणें, कुमारपालाचें परिवर्तन वि.सं. १२१६ (इ.स.११५९-६०) मध्यें मार्गशीर्ष शु. २ स घडलें. कुमारपालाच्या सांगण्यावरून व त्यानें स्वीकारिलेल्या नव्या संप्रदायावरचा त्याचा विश्वास द्दढ व्हावा म्हणून हेमचंद्रानें योगशास्त्र लिहिलें. याच्या अगोदर सिद्धराजाच्या सांगण्यावरून त्यानें शब्दानुशासन हा ग्रंथ लिहिला होता. आपल्या कारकीर्दिच्या अखेरी अखेरीस कुमारपालानें हेमचंद्राबरोबर पश्चिमहिंदुस्थानांत पुष्कळ यात्रा केल्या. या अर्थातच जैन लोकांच्या पवित्र क्षेत्रांच्या होत्या. नव्वदाच्या घरांत आल्यावर आपला काळ जवळ आला असें समजून हेमचंद्र प्रायोपवेशन करावयास बसला. मृत्युसमयीं त्याचें वय सुमारें ८४ वर्षोंचें होतें.