प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.        

सिध्दान्तकौमुदीवरील सारग्रंथ- यांत वरद राजानें लिहीलेल्या तीन ग्रंथांचा प्रामुख्यानें उल्लेख केला पाहिजे. मध्य, लघु, आणि सार सिध्दान्तकौमुदी हीं या ग्रंथांचीं नांवें आहेत. आश्चर्याची गोष्ट ही कीं, या सारभूत ग्रंथांचें स्पष्टीकरण होण्यासाठीं यांवरहि टीकापर ग्रंथ लिहावे लागले. शिवानंद नांवाच्या एका गृहस्थाच्या विनंतीवरून रामशर्मन् यानें मध्यसिध्दान्तकौमुदीवर टीका लिहिली व लघुसिध्दान्तकौमुदीवर मौनी घराण्यापैकी गोवर्धन भट्टाचा नातू व रघुनाथ भट्टाचा मुलगा जयकृष्ण यानें टीका लिहिली.