प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.             
 
सारस्वत शाखेच्या इतिहासाचें सिंहावलोकन- कातंत्रशाखेप्रमाणेंच याहि शाखेचा उदय एका विशिष्ट उद्देशानें झाला होता.याला बरेंसचें स्थैर्य आल्यावर, उत्तर हिंदुस्थानांत याचा अभ्यास अनेक टीकोपटीकांच्या सहाय्यानें झाला. या टीकांवरून असे दिसतें कीं, ज्या ज्या स्थळीं या टीका लिहिल्या गेल्या त्या त्या ठिकाणच्या लोकांच्या वाङमयविषयक आकांक्षा त्यांत प्रतिबिम्बित झाल्या आहेत. व्याकरण हें साधन आहे साध्य नव्हे, या गोष्टीची या शाखेच्या ग्रंथकारांस चांगली जाणीव होती व म्हणून त्यांनी 'व्याकरणाकरिंता व्याकरण' असलें एकांगी ध्येय आपल्या डोळयापुढें ठेविलें नाहीं.  यामुळें, पुढील काळांत इतर संप्रदायांप्रमाणें या शाखेची वाढ किंवा फाजील फैलाव होऊं शकला नाहीं. विल्किन्सनें लिहिलेलें एक जुनें इंग्रजी संस्कृत व्याकरण याच सारस्वत व्याकरणाच्या पायावर रचलेलें आहे. काशी व बिहार या प्रातांत या व्याकरणाचा अभ्यास बराच चालतो.