प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
सारस्वत शाखा, तिचा काळ- सारस्वत शाखेची सुरूवात इ.स. १२५० च्या पूर्वी झाली नसावी, किंवा असलीच तर फार अगोदर तरी नसावी. कारण, १२५० च्या सुमारास होऊन गेलेल्या बोपदेवाच्या मुग्धबोधांत हिचा उल्लेख नाहीं. बोपदेवास सारस्वत शाखा माहीत असती तर इतरांप्रमाणें त्यानें हिचाहि उल्लेख केला असता. ही शाखा हेमचंद्रासहि माहीत होतीसें दिसत नाहीं. इ.स. १४५० च्या अगोदर लिहिलेली अशी सारस्वतावरील एकहि टीका उपलब्ध नाहीं. या शाखेच्या बऱ्याचशा टीका सोळाव्या व सतराव्या शतकांत लिहिल्या गेल्या आहेत. टीकाकारांच्या ठिकाणांवरून असें दिसतें कीं, हिचा प्रसार उत्तरहिंदुस्थान, गुजराथ, नागपूर, बिकानेर, उदेपूर, दिल्ली इकडेच झाला असावा. भट्टोजीच्या नेतृत्वाखालीं पाणिनीच्या संप्रदायाचें पुनरूज्जीवन होईपर्यंत ही शाखा जोरांत होती. हिचीं सूत्रें ७०० च आहेत. या गोष्टी लक्षांत घेतां कातंत्र शाखेप्रमाणें हीहि शाखा कांहीं विशिष्ट गरज भागविण्यासाठीं उदयास आली असावी असें दिसतें. मुसुलमान लोकांनां, संस्कृत ग्रंथांवर टीका करण्याच्या उद्देशानें कां होईना, संस्कृताच्या अभ्यासाची अवश्यकता वाटूं लागली होती.माळव्याचा शांतताप्रिय व विद्वान् राज्यकर्ता ग्यासुद्दिन खिलजी, हुमायनाच्या अज्ञातवासांत दिल्ली येथें राज्य करणारा सालेमशहा व जहांगीर बादशहा यांनीं सारस्वत व्याकरणाच्या अभ्यासास उत्तेजन दिलें. सारस्वत व्याकरणाच्या उदयाचें श्रेय बहुतेक मुसुलमानी अंमलासच द्यावें लागेल.