प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
सारस्वत शाखेचा उत्पादक कोण- परंपरेप्रमाणें या शाखेचा उत्पादक अनुभूति स्वरूपाचार्य हा आहे. असें सांगतात कीं, याला खुद्द सरस्वती देवीनें व्याकरण शिकविलें. सारस्वत हें नांवहि त्यावरूनच पडलें. परंतु ही गोष्ट संभवनीय दिसत नाहीं. कारण एक तर अनुभूति स्वरूपाचार्यानें आपल्या सारस्वतप्रक्रिया ग्रंथांत कांहीं र्वात्तिकें घातलीं आहेत. अनुभूति स्वरूपाचार्य स्वत:सूत्रकार असता तर त्यानें हीं वार्तिकें सूत्रें म्हणूनच लिहिली असतीं. दुसरी गोष्ट यानें दिलेले कित्येक नियम दुसऱ्या टीकांत नाहींत. तिसरें, क्षेमेंद्रटीकाकाराच्या टिप्पणीच्या शेवटी जो समाप्तिसंकल्प आहे त्यांत सारस्वताचा कर्ता नरेंद्राचार्य असा उल्लेख केलेला आहे. दुसऱ्या एका टीकाकारानें सारस्वताचा कर्ता नरेंद्रनगरि असल्याविषयीं लिहिलें आहे. विठ्ठलाचार्यांने आपल्या प्रक्रियाकौमुद्दीप्रसाद ग्रंथात एका नरेंद्राचार्याचा उल्लेख केलेला आहे. तेव्हां, अनुभूति स्वरूपाचार्य नांवाची एखादी ऐतिहासिक व्यक्ति नव्हतीच असें जरी निश्चयानें म्हणतां आलें नाहीं, तरी सारस्वत शाखेचा प्रवर्तक अनुभूति स्वरूपाचार्य नव्हें एवढें खास. नरेंद्राचार्याच्या नांवाचे स्पष्टच उल्लेख टीकांतून आढळतात.