प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
सारस्वत व्याकरणाचा विशेष- इतर संप्रदायांप्रमाणें यांतहि संक्षेप हा हेतु आहेच. परंतु सारस्वत व्याकरणाचा विशेष हा कीं, त्यांत सर्व विषय अवघ्या ७०० सूत्रांत आणला आहे.याचा दुसरा विशेष म्हणजे प्रसाद हा होय. सारस्वतानें प्रत्याहाराचा उपयोग केला आहे, पण त्यांतील घोटाळयाचें 'इत्, मात्र काढून टाकले आहेत. उदाहरणार्थ, त्याच्या परिभाषेत च, ट, त, क, प या अक्षरांनां'चप्, या सूत्रमय शबदानें संबोधिलें आहे. यामुळें नियमांत कोणत्या अक्षरांचा अंतर्भाव होतो हें वाटेल त्यास चटकन कळूं शकतें. उलट पक्षीं पाणिनीच्या'चय्, या संज्ञेपासून, ज्यानें त्याच्या व्याकरणांचा अभ्यास केला नाहीं. अशा इसमास तिळमात्रहि बोध होऊं शकणार नाहीं. शिवाय या संप्रदायांत उपयोगांत आणिलेल्या पारिभाषिक संज्ञाहि अतिशय सोप्या आहेत. या गोष्टी या शाखेस साध्य करितां आल्या, याचें कारण तिच्या पुरस्कर्त्यांनीं व्याकरणाचा अभ्यास भाषेसाठीं म्हणून करावयाचा व्याकरणासाठीं नव्हे, अशी द्दष्टी ठेविली होती हें होय.