प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.            

शाकटायनाचे व त्याच्या संप्रदायातील ग्रंथ- शब्दानुशासन व अमोघवृत्ति या ग्रंथांखेरीज(१)परिभाषा सूत्रें,(२)गणपाठ,(पाद १६)(३)धातुपाठ, (४)उणादि सूत्रें पाद ४व (५)लिंगानुशासन ७०आर्यां,या ग्रंथांचें कर्तृत्व शाकटायनाकडे आहे असें म्हणतात.हेमचंद्रानें आपला लिंगाानुशासन ग्रंथ शाकटायनाच्या ग्रंथावरच बसविलेला असून त्याची ती एक सुधारून वाढविलेली आवृत्ति आहे इतकेंच.

सर्व व्यकरणसंप्रदायांप्रमाणें याहि संप्रदायाच्या अलीकडील इतिहासाचे दोन भाग पडतात.एक टीका उपटीका निर्माण होण्याचा व दुसरा लहान चोपडीं व सारग्रंथ निर्माण होण्याचा काल. शाकटायनाच्या शब्दानुशासनावर माधवीय धातुवृत्तींत जिचा उल्लेख आलेला आहे ती न्यास नांवाची टीका व यक्षवर्मन् नांवाच्या टीकाकारानें लिहिलेली चिंतामणि नावांची एक टीका असे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. पैकीं पहिली न्यास टीका व प्रभाचंद्राचार्यांची न्यासटीका या दोन्ही एकच असाव्या. प्रभाचंद्राचार्यांची टीका ही अमोघवृत्ती वरील टीका होय.हींत स्वतंत्र विचारपूर्वक लिहिलेली कोणतीच गोष्ट नसून हिची इमारत अमोघवृत्तीच्या पायावर उभारलेली आहे. तरीदेखील मणिप्रकाशिका, चिंतामणि प्रतिपद व टिप्पणी यांसारख्या उपटिकाहि याच ग्रंथावर आहेत.

या टीकांखेरीज शाकटायनाच्या ग्रंथावरून बनविलेले असे दोन तीन व्याकरणग्रंथ उपलब्ध आहेत. यांतला प्रक्रियासंग्रह हा सर्वात उत्तम ग्रंथ असून तो कोल्हापूर येथें १९०७ सालीं प्रसिद्ध झाला आहे.गोमटसार नांवाच्या एका प्राकृत वेदान्तविषयक ग्रंथावर केशववर्णी नांवाच्या अभयचंद्राच्या शिष्यानें शके १२८१ (इ.स.१३५९) मध्यें एक टिका लिहिली आहे.त्यावरून अभयचंद्राचा काळ चौदाव्या शतकाचा पूर्वार्ध हा असावा.अभयचंद्रानें आपल्या ग्रंथांत नवशिक्या लोकांनां निरूपयोगी अशीं मुळांतील बरींच सूत्रें वगळलीं असून दुसऱ्या कित्येक सूत्रांवर नवशिक्यांच्या फायद्यासाठीं विस्तृत टीका लिहिली आहे. प्रक्रियाकौमुदीसारख्या ग्रंथांच्या धर्तीवर या ग्रंथाची रचना आहे. दयापालाचा रूपसिध्दि हा ग्रंथ वरच्यापेक्षांहि लहान आहे. दयापाल हा मितसागरचा शिष्य असून वरराज ऊर्फ दुसरा जयसिंह राजा याचा सहाध्यायी होता.हा चालुक्यवंशीय राजा शके ९४७ (इ.स.१०२५) मध्यें राज्य करीत होता.