प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
व्याकरणशास्त्राचा उगम- भाषेच्या व्याकरणाची अशी चर्चा ऋग्वेदाच्या पुढच्या पुढच्या भागांतच दिसून येऊं लागते. 'चत्वारि शृंगा:' याचें 'नामाख्यातउपसर्गनिपात' किंवा 'सप्तसिंधव:' याचें 'सप्त विभक्तय:' हीं पतज्जलींने दिलेलीं विक्षिप्तपणाची स्पष्टीकरणें जरी बाजूस ठेविली, तरी देखील ''क्र. १०,१२५ किंवा तैत्तिरिय संहिता ६.४,७,३.'' या स्थलांवरून असें स्पष्ट दिसतें कीं, भाषेंतील शब्दांचीं रूपें हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय होऊ शकेल. व स्वतंत्रपणानें त्यांचा अभ्यास करण्याइतके महत्व त्यांनां आहे ही जाणीव त्या वेळीहि उत्पन्न झालेली होती'' असे डॉ.बेलवलकर म्हणतात, पण ते आम्हांस पूर्ण संमत नाहीं. आपणांस ऋग्वेद १०.१२५ या उल्लेखावरुन एवढें म्हणतां येईल कीं, वाणीस ऋग्वेदकालीं देखील महत्व आणि पूज्यत्व आलें होतें. पण पूज्वत्व म्हणजे अभ्यास विषयत्व नव्हे हें डॉ. बेलवलकर विसरतात. तैत्तिरीय संहिताकाळी भाषाविज्ञानाची अधिक प्रगती झाली होती असें आपणास 'व्याकृता' आणि 'व्याकुरू' इत्यादि शब्दप्रयोगांवरून दिसून येईल. तै. सं. ६.४,७,३. मधील उल्लेख ''वागवै पराच्य व्याकृतावदत्ते देवा इन्द्रमव्रुवन् इमांनोवाचं व्याकुरू इति सोऽब्रवीद्वरं वृणै'' असा आहे.
भाषेच्या व व्याकरणाच्या द्दष्टीने ब्राह्मणग्रंथांच्या कालाकडे आपण नजर टाकली तर त्या ग्रंथांतील भाषेच्या व शब्दांच्या रूपांचा संहिताकालांतील जुन्या भाषेशी व त्यांतील शब्दांच्या रूपांशी कांहींच संबंध राहिलेला दिसत नाहीं.जुने शब्द व जुनी रूपें अपवादात्मक होऊन त्यांच्या जागी नवे शब्द व नवी रूपें दिसूं लागतात. परंतु ऋग्वेदसंहितेच्या जुन्या भाषेंत लिहीलेल्या सूक्तांचें मूळ स्वरूप अनेक कारणांमुळें जसेंचें तसेंच कायम ठेवणें अगत्यांचे झाल्यामुळें त्या भाषेंचे विशेष व त्यांतील शब्दांची रूपें यांचे विवेचन करणें आवश्यक झालें व्याकरणाचा उगम त्या विवेचनांतूनच झाला असें म्हणणास हरकत नाहीं. तरी पण, ब्राह्मणग्रंथांचा मुख्य कटाक्ष यज्ञविधींवरच आहे. यज्ञविधीपैकी प्रत्येक बारीकसारीक गोष्टीचें समर्थन व अध्वर्यूच्या कार्याचें समर्थन या गोष्टींतच ब्राह्मणग्रंथ गुंतलेले आहेत; खरें पाहिलें असतां विधीवाक्यांचे महत्व यज्ञसमर्थनाकडे आहे. विधीवाक्यें बहुतेक ब्राह्मणांत आहेत अर्थात् स्पष्टिकरण करावयांचे तें ब्राह्मणवाक्यांचें होय.यामुळे वैदिक भाषाविषय पाणिनीय व्याकरणांत चांगल्या तऱ्हेनें स्पष्ट करण्यांत आलेला नाहीं. ब्राह्मणांतील विधीवाक्यांचें समर्थन करतांना कथा द्यावयाची, दुसरीं काही तरी कारणें द्यावयाची आणि कधीं कधीं व्युत्पत्तिशास्त्राकडे किंवा दुसऱ्या कोणत्या तरी भाषाशास्त्राकडे धांव घ्यावयाची अशी प्रवृत्ती आहे. तिचा परिणाम प्रतिशाख्यें, शिक्षा, व्याकरण, निरूक्त इत्यादि शास्त्रें होत. हीं सर्व भाषाशास्त्रें आज व्याकरण या स्थूल शब्दाखालीं आपण घालतो.
विस्खलित ऋग्वेदसूक्तांची ज्या वेळेस मंडले बांधली गेली, परिषद् आणि चरण यांच्या घटनेचे नियम जेव्हां ठरले गेले, तेव्हां व्याकरणाचा शास्त्र या द्दष्टिनें अभ्यास होण्यास सुरूवात झाली.याच कालांत भाषेच्या विद्यार्थांनां मदत व्हावी म्हणून वर्ण, स्वर, मात्रा, उच्चार व संधि यांसंबंधांच्या नियमांनीं भरलेला लहान मोठीं चोपडी निर्माण झालीं. पदपाठाच्या रचनेनें तर या कामांत एक पाऊल आणखी पुढें टाकलें गेलें.
यास्काच्या पूर्वींचे व्याकरणकार कोण होते यासंबंधाची माहिती अगदींच नसावी ही दुदैंवाची गोष्ट होय. आज प्रतिशाख्यें म्हणून जे पाणिनीय कालानंतरचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्यांहून वेगळया स्वरूपाचीं प्रतिशाख्यें यास्कापूर्वी अस्तित्वांत असलीं पाहिजेत, मग त्यांची नांवे कोणतीहि असोत. हल्लींच्या प्रातिशाख्यांनां बीजभूत अशा तऱ्हेनें जीं ही प्रातिशाख्यें, त्यांनी व्याकरणशास्त्रास कोणत्या तऱ्हेची मदत केली हें कल्पनेनेंच जाणावें लागतें; कारण, त्या जातीचा एकहि ग्रंथ आज उपलब्ध नाहीं.