प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
विधि- अप्राप्त किंवा अपूर्व गोष्टीचें बोधन करून देणाऱ्या वाक्याला 'विधि' असें म्हणतात.
उदाहरण- 'अग्निहोत्रं जुहुयात्स्वर्गकाम: 'स्वर्गकाम पुरूषानें अग्निहोत्रानें स्वर्ग मिळवावा.
कांहीं ठिकाणीं याग अन्य वाक्यानें प्राप्त असून केवळ गुणमात्र विधान असतें त्यास 'गुणविधि' असें म्हणतात.
उदाहरण:- 'दध्ना जुहुयात्' येथे 'अग्निहोत्रं जुहुयात्' या वाक्यानें होम विहित आहे. .त्यांत दधिविधान फक्त 'दध्ना जुहुयात्' या वाक्यानें केलें आहे. यास गुणविधि असें म्हणतात.
ज्या ठिकाणीं गुण आणि याग या दोहोंचें एकदम विधान असतें त्यास 'उभयविधि' असें म्हणतात.
उदाहरण:- 'सोमेन यजेत' या ठिकाणीं सोम आणि याग यांचें एकच वाक्यानें विधान आहे.
विधींचे चार प्रकार आहेत.
[१] उप्तत्तिविधी [३] अधिकारविधि
[२] विनियोगविधि [४] प्रयोगविधि
आतां या प्रत्येक विधि भेदाकडे वळूं.
[१] उप्तत्तिविधी- कर्मस्वरूपाचें ज्ञान करून देणाऱ्या विधिस 'उप्तत्तिविधी' असें म्हणतात.
उदाहरण:- 'अग्निहोत्रं जुहोति'
वस्तुत: द्रव्य आणि देवता हें कर्माचें स्वरूप आहे. ते दोनहि ज्या ठिकाणीं सांगितले अस तील त्यालाच उप्तत्तिविधी म्हणतां येणार नाहीं तथापि होमरूप कर्मस्वरूपाचा बोध या वाक्यानें होत आहे.म्हणून यास'उप्तत्तिविधी' असें म्हणतात.
[२] विनियोगविधि- अंग आणि प्रधान संबंधबोधक विधीला विनियोगविधि असें म्हणतात.
उदाहरण:- 'दध्ना जुहोति'
या वाक्यांत तृतीयाविभक्तीनें ज्याचा अंगभाव उघड झाला आहे अशा दह्याचा होमाशीं संबंध दाखविला आहे.
अं ग प्र धा न सं बं ध स्प ष्टी क र णा पू र्वीं प्र मा ण वि ष य क वि ष यां त र- या विधीस सहाय्यभूत सहा प्रमाणें आहेत.तीं खालील प्रमाणें :-
[१] श्रुति म्ह. वेदवाक्य,स्वयंमहत्वाचा शब्द.
[२] लिड्.ग म्ह. यौगिक अर्थापेक्षां अधिक अर्थ.
[३] वाक्य म्ह. शब्दाची सापेक्षात.
[४] प्रकरण म्ह.वाक्यांची सापेक्षात.
[५] स्थान म्ह. संदर्भ.
[६] समाख्या म्ह.यौगिक अर्थ.
या सहा प्रमाणांच्या सहाय्यानें अंगत्व ठरविलें जातें.या प्रमाणांचे स्पष्टीकरण सविस्तर केलें पाहिजे.क्रमानें दुर्बल अशीं हीं प्रमाणें आहेत;आणि त्यांचें दुर्बलत्व युक्तिसिद्ध आहे.
[१] श्रु ति:- श्रुति=निरपेक्ष शब्द. ज्याच्या प्रामाण्याविषयीं कशाचीहि अपेक्षा लागत नाहीं त्यास 'श्रुति' असें म्हणतात.
श्रुतीचे तीन प्रकार आहेत.
[अ] विघात्री श्रुति [इ] विनियोक्त्री श्रुति
[आ] अभिधात्री श्रुति
विधात्री म्हणजे क्रियापदाचा विधायक असा लिंगादि भाग [लिङग ही विध्यर्थाची प्राचीन संज्ञा आहे. अशी प्रत्येक कालाला लकारात्मक संज्ञा आहे].
अभिधात्री म्हणजे 'व्रीहिणा यजेत' वगैरे श्रुति. अभिधात्री म्हणजे वाचक.
विनियोक्त्री म्हणजे जिच्या श्रवणानेंच संबंध कळतो त्या श्रुतीस विनियोक्त्री असें म्हणतात.
या श्रुतींचे तीन प्रकार आहेत.
(अ)विभक्तिरूपा विनियोक्त्री
(आ)समानाभिधानरूपा विनियोक्त्री
(इ)एकपदरूपा विनियोक्त्री
(अ)विभक्तीरूप विनियोक्त्री श्रुतीनें'व्रीहिभिर्यजेत'या ठिकाणीं विनियोग झाला आहे.
रोहिण्या पिंगलयैकहायन्या सोमं क्रिणाति (तै.सं.७.१.६.२).
'तांबडी पिंगट डोळयाची आणि एक वर्षाच्या गाईनें सोम विकत घ्यावा' हें तृतीया विभक्तीनें अंगत्व आल्याचेंच उदाहरण आहे.
(आ)'पशुना यजेत' या ठिकाणीं 'पशुना' या शब्दानें पुंस्त्व आणि एकत्व बोधलें आहे. म्हणून समाभिधान श्रुतीनें त्यांनांहि कारकांगत्व आलें आहे.
(इ)त्याचप्रमाणें 'यजेत' यांतील एकवचनाचा एकपद श्रुतीनें 'यज्' धातूवर अन्वय झाला आहे.
श्रुति लिंगापेक्षा प्रबल आहे. कारण, श्रुतीनें ज्या ठिकाणीं विनियोग असतो तेथें विनियोग विभक्ति वगैरे प्रत्यक्ष असते. परंतु लिंगामध्यें त्या विनियोजकाची कल्पना करावी लागते. कल्पना करीतोंपर्यत श्रुतीन विनियोगहि होऊन जातो. म्हणून लिंगापेक्षां श्रुतिप्रमाण प्रबल आहे.
उदाहरणार्थ- 'ऐन्घ्रा गार्हपत्यमुपतिष्ठते' इन्द्रदेवताक मन्त्रानें अग्नीला स्तवावें' असें सांगतिलें आहे.
'कदाचन स्तरीरसि नेन्द्र सश्चसि दाशुषे'हे इन्द्रा, (हविर्भाग) देणाऱ्यास तूं केव्हांहि मारीत नाहींस (तर त्याच्या संरक्षणास) जातोस.'
येथें लिंगावरून इन्द्रस्तुतीकडे विनियोग करण्यापूर्वीच 'ऐन्द्द्रा गार्हपत्यमुपतिष्ठते' या श्रुतीनें अग्निस्तुतीकडे विनियोग झाला.
यावरून लिंगापेक्षा श्रुति प्रबल आहे हें सिद्ध झालें.
[२] लिं ग– शब्दसामर्थ्याला लिंग असें म्हणतात.
उदाहरण- 'बर्हिर्देवसदनं दामि''देवांनां आसनभूत दर्भ तोडतो.' हा मन्त्र लवनक्रियेचा अंगभूत आहे. कारण, हा मन्त्र लवनप्रकाशन करण्यास समर्थ आहे.
समाख्या आणि लिंग यांमध्यें यौगिक आणि रूढि या प्रकारचा भेद आहे. यौगिक शब्दाला समाख्या म्हणतात; आणि रूढिरूप शब्दसामर्थ्य लिंगामध्यें असतें.
हें लिंग वाक्यादिकांपेक्षा बलवान् आहे. कारण, वाक्यादिकांपेक्षां लिंगावरून श्रुतिकल्पना तत्काल शक्य असल्यामुळें आणि वाक्याला लिंग व लिंगावरून श्रुति अशा जास्त कल्पना कराव्या लागत असल्यामुळें वाक्यापेक्षां लिंग हें प्रबळ होय.
म्हणूनच 'स्योनं ते सदनं कृणोमि घृतस्य धारया सुवेशं कल्पयामि'' भो पुरोडाश तुझें स्थान सुखकर करितों आणि तुपाच्या धारेनें सुसेव्य करितों'तेथें प्रसन्न मनानें येऊन बस.
हा मन्त्र'सदनं कृणोमि'या लिंगावरून पुरोडाश ठेवण्याचें स्थान तयार करण्याकडे विनियुक्त करावयाचा. 'तस्मिन्सीद' या वाक्यशेषावरून पुरोडाश ठेवण्याकरितां त्याचा उपयोग करावयाचा नाहीं.
[३] वा क्य- विशेष्य विशेषणांचें जें सहोच्चारण त्यास वाक्य असें म्हणतात.
उदाहरण- 'यस्य पर्णमयी जुहूर्भवति न स पाप श्लोक शृणोति'.
'ज्याची पानाची जुहू असते त्याचें यश मलिन होत नाहीं.'
येथें 'पर्णमयी' जुहूचें विशेषण आहे आणि त्याचें सहोच्चारण आहे. त्यावरून पर्णतेला जुहूचें अंगत्व प्राप्त झालें आहे. म्हणजे जुहू पानाचीच पाहिजे असें यावरून ठरलें. वाक्य प्रकरणापेक्षां केव्हांहि बलवान् आहे. कारण प्रकरणाला आकांक्षेची जरूरी असते; परंतु वाक्याला कशाचीहि अपेक्षा नसते.
उदाहरण.- 'इन्द्राग्नी इंद हविरजुषेतां महो ज्याजोऽ क्राताम्'
'इन्द्राग्नी' या लिंगावरून हा मन्त्र दर्शांग आहे.आणि त्याच वाक्यांत 'इंद हविराजुषेताम्' हें वाक्य असल्यामुळें दर्शोत त्याचा विनियोग झाला. प्रकरणावरून दर्शपूर्णमासांग झाला नाहीं. यावरून प्रकरणापेक्षां वाक्य बलवान् आहे हें सिद्ध झालें.
[४] प्र क र ण.- परस्परांनां ज्या ठिकाणीं अपेक्षा असते त्या ठिकाणीं प्रकरणावरून त्यांचा अंगांगीभाव ठरविण्यांत येतो.
उदाहरण.- 'समिधो यजति' हें वाक्य ऐकल्याबरोबर असें वाटतें कीं, 'समिद्दागानें काय करावयाचें, आणि दर्शपूर्णमाससंबंधीं वाक्य ऐकलें म्हणजे असें वाटतें'हा दर्शपूर्णमासयाग कसा करावा. 'या प्रकारें जी उभयांची आकांक्षा तीवरून त्यांचा अंगांगीभाव होतो. आणि समिद्याग दर्शपूर्णमासाचा अंग आहे असें ठरतें. हें 'प्रकरण' केवळ क्रियेचेंच अंगत्व दाखविणारें असतें. द्रव्य किंवा गुण यांचें अंगत्व द्योतित करणारें नसतें.
प्रकरणाचे दोन प्रकार आहेत.
[१] महाप्रकरण
[२] अवान्तर प्रकरण
मुख्यभावनेसंबंधीं जें'प्रकरण'तें'महाप्रकरण'होय.
उदाहरण- 'प्रजाज'हे दर्शपूर्णमासाचे अंग बनतात.हें महाप्रकरणावरून होय .आणि 'अभिक्रमण' हें प्रयाजाचें अंग होतें तें अवान्तर प्रकरणावरून होय.
हें फक्त प्रकृतींतच संभवते.
प्रकृति म्हणजे ज्या ठिकाणीं समग्र अंगाचें विधान असतें ती होय . ज्या ठिकाणीं समग्र अंगाचें विधान नसतें मूंळ गोष्टी दुसरीकडून घेऊन फक्त विशेष गोष्टीचें विधान असतें त्यास विकृति असें म्हणतात.
दर्शपूर्णमास हें याचें सुंदर उदाहरण आहे.कारण त्यांत उभयकांक्षारूप प्रकरण चांगलें संभवतें.
प्रकरण हें स्थानापेक्षां प्रबळ आहे. उदाहरण-'अक्षैर्दीव्यति राजन्यम्'इत्यादि. 'फांसे खेळणें' वगैरे धर्म राजसूय यज्ञांतील अंगभूत अभिषेचनीय संज्ञक यागाच्या समीप पठित आहेत. तथापि स्थानद्दष्टीनें अभिषेचनीय यागाकडे त्यांचा विनियोग न करितां प्रकरणावरून राजसूयाकडेच विनियोग करावयाचा.यावरून स्थानापेक्षां प्रकरण बलवान् आहे असें सिद्ध झालें.
[५] स्था न- उच्चारणाच्या ठिकाणाला'स्थान'असें म्हणतात .'क्रम' हेंहि एक नांव आहे. त्यांत दोन प्रकार आहेत.
[१] पाठसादेश्य
[२] अनुष्ठान सादेश्य.
पाठ सादेश्यांतहि दोन प्रकार आहेत.
[१] यथासंख्यपाठ
[२] सन्निधिपाठ
उदाहरणें.--[१] ऐन्द्राग्नमेकादशकपालं निर्वपेत् [२] वैश्वानरं द्वादशकपालं निर्वपेत् इत्यादि क्रमानें सांगितलेल्या ज्या इष्टी त्यांच्या प्रत्येकीच्या याज्या आणि अनुवाक्या
[पुरस्ताल्लक्ष्मा पुरोनुवाक्या भवति उपरिष्टा ल्लक्ष्मा याज्या ।
(तै.सं.२. ६.२)
अर्थ:- मंत्राच्या पूर्वभागांत देवता लिंग असल्यास त्या मंत्रास 'अनुवाक्या' म्हणतात आणि उत्तर भागांत असल्यास 'याज्या' म्हणतात. इन्द्राग्नी रोचनादि या क्रमानें यथासंख्यानें सांगितल्या आहेत. त्या यथासंख्यानें घ्यावयाच्या.
जीं विकृत्यंगे प्राकृत अंगांचा अनुवाद करून विहित असतात. तीं सन्निधिपाठानें म्हणजे विकृतिसन्निध पठित असतात, म्हणून विकृतीचीं अंगें बनतात. याप्रमाणें पाठसादेश्यांपैकीं 'यथांख्यपाठ' आणि 'सन्निधिपाठ' यांचीं उदाहरणें झालीं.
आतां अनुष्ठान सादेश्याचें उदाहरण देऊं.
'अनुष्ठानसादेश्य' म्हणजे अनुष्ठानाचें विधान करण्याचें जें स्थल तेंच स्थल असलेला विधि. उदाहरण:- 'औपवसस्थ' [यज्ञाचा पूर्व दिवस] दिवशीं 'अग्निषोमीय' पशूचें अनुष्ठान आहे. त्याच दिवशीं जीं कृत्यें सांगितलीं त्यांत पंशूचे धर्म सांगितले आहेत. हे धर्म अग्नीषोमीय पशूचेच घेतले पाहिजेत. हें 'अनुष्ठानसादेश्या' नें लब्ध होतें.
समाख्येपेक्षां स्थान प्रबळ आहे. कारण, जेथें स्थानानें विनियोग असतो त्या ठिकाणी ज्यांचा अंगांगीभाव असतो त्या दोनहि पदार्थांचा देशसामान्य लक्षणसंबंध प्रत्यक्ष असतो. समाख्यविनियोगस्थलीं तसें नसतें. कारण, पदार्थ भिन्न स्थलीं कथित असतात.
[६] स मा ख्या.- समाख्या म्हणजे यौगिक शब्द. त्यांत दोन प्रकार आहेत.
[१] वैदिकी समाख्या
[२] लौकिकी समाख्या
'होतृचमस:' या शब्दावरून होत्यानें चमसपात्रानें सोमपान करावें लागतें.ही वैदिक समाख्या होय.
अध्वर्युकाण्डामध्यें जीं कर्मे सांगितलीं आहेत त्यांस 'आध्वर्यव' अशी संज्ञा-समाख्या-आहे म्हणून तीं कर्मे अध्वर्यूनें करावयाची असतात.
या प्रकारें अंगांगिभाव दाखविणारी सहा प्रमाणें आहेत.त्यांनी अंगत्व दाखविलें जातें आणि समिदादि अंगयागांनीं उपकृत असा अंगीदर्शपूर्णमासयाग केला जातो.
अं ग.- आतां अंगाविषयी जास्त विवेचन करूं.
अंग दोन प्रकारचे आहे.
[१] सिद्धरूप [२] क्रियारूप
सिद्धरूप अंग --
(१)उदाहरण- जातिविशिष्ट पशु आणि (२)संख्या विशेष हीं सिद्धरूपाचीं उदाहरणें होत. हे प्रत्यक्ष यागोपकारक असल्यानें द्दष्टार्थच होत. अद्दष्टार्थ नव्हते.
[२] क्रियारूप अंग दोन प्रकारचें आहे.
[अ] गुणकर्म अथवा संनिपत्योपकारक
[आ] प्रधानकर्म अथवा आसदुपकारक
[अ] कर्मोगद्रव्याला उद्देशून सांगितलेलें जें कर्म तें गुणकर्म किंवा संनिपत्योपकारक होय.
उदाहरण- 'व्रीहीन् प्रोक्षति'' व्रीहीन् अवहन्ति' इत्यादि वाक्यांनीं सांगितलेले अवघात, प्रोक्षण वगैरे.
गुणकर्माचे तीन प्रकार आहेत.
[१] द्दष्टार्थ
[२] अद्दष्टार्थ
[३] द्दष्टाद्दष्टार्थ
उदाहरण-[१] तण्डुलावहनन हें भाताचे तांदुळ करण्याकरितां सांगितलें आहे. त्याशिवाय त्याचा 'पुरोडाश' किंवा 'चरू' होणें शक्य नाहीं. म्हणून, हें अवहनन द्दष्टार्थ होय.
[२] प्रोक्षण हें अद्दष्टार्थ आहे.कारण त्याचा प्रत्यक्ष कांहींच उपयोग नाहीं.
[३] आणि पशु-पुरोडाश हे द्दष्टाद्दष्टार्थ होत.
कारण,पशुयागांतील किंवा पुरोडाशयागांतील देवतोद्देशाने द्रव्यत्याग अद्दष्टार्थ आहे; आणि देवतास्मरण हें प्रत्यक्ष यागोपयोगी म्हणून द्दष्टार्थ होय. यालाच 'आश्रयिकर्म' असें म्हणतात.
[आ] केवळ द्रव्यादिकांनां उद्देशून नसलेल्या विहित कर्माला 'आरादुपकारक' किंवा 'प्रधान कर्म' असें म्हणतात.
उदाहरण- 'समिधा यजेत' वगैरे प्रयाजयागद्रव्य किंवा यागस्वरूप या कोणलाहि आवश्यक म्हणून सांगितले नाहींत. कारण, त्यामुळें यागांत कमीजास्तपणा कांहींच दिसत नाहीं. त्यावरून तें कर्म अपूर्वाकरितां आहे असें सिद्ध होतें. या प्रकारें विनियोगविधीचें विवेचन संपलें आहे.
प्रयोगविधि.- कर्मे विलम्बरहित व्हावींत म्हणून जो विधि असतो त्यास 'प्रयोगविधि' असें म्हणतात.
अंगवाक्यांशीं एकवाक्यात पावलेला तो प्रधानविधिच म्हणावयास कांहीं हरकत नाहीं.
कर्मसातत्य चालू राहण्यास म्हणजे कर्मामध्यें अविलम्ब उत्पन्न होण्यास कर्माचा क्रम व्यवस्थित ठरावा लागतो. कोणते क्रम पूर्वी करावयाचें आणि कोणतें कर्म नन्तर करावयाचें हा क्रम निश्चित करण्याविषयीं सहा प्रमाणें आहेत.
ती खालीलप्रमाणें:-
[१] श्रुति म्ह.वेदवाक्यानुरूप क्रम.
[२] अर्थ म्ह.प्रयोजनानुरूप क्रम.
[३] पठन म्ह.पदार्थबोधक वाक्यानुरूप क्रम.
[४] स्थान म्ह.उपस्थित्यनुरूप क्रम.
[५] मुख्य म्ह.प्रधानकर्मानुरूप क्रम.
[६] प्रवृति म्ह.गौणांगांनुरूप क्रम.
[१] श्रुति - क्रमपर जें वेदवाक्य असतें त्यास श्रुति असें म्हणतात.