प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.     

यास्काच्या निरूक्ताचें स्वरूप- हा ग्रंथ निघण्टु नांवाच्या पांच अध्यायांच्या शब्दकेशावरची टीका होय. निघण्टूच्या पहिल्या तीन अध्यांयात एकाच अर्थाचे अनेक शब्द, असे अनेक शब्दसमूह दिलेले आहेत. निघण्टूचा चवथा अध्याय वेदांतील अवघड शब्दांचा संग्रह करण्यांत खर्ची पडला असून शेवटच्या अध्यांयात देवतांच्या नांवांची यादी आहे. यास्कानें निघण्टूच्या पहिल्या तीन अध्यायांतील अधिक महत्वाचे व शेवटच्या दोन अध्यायांतील प्रत्येक शब्द घेऊन त्यावर आपलें विवरण दिलें आहे.यास्काने आधारासाठी वेदग्रंथातील मूळ ऋचाच घेतल्या आहेत.वेदांच्या अभ्यासाचा सामान्य उपयोग व विश्वरचनेंसंबंधीं वैदिक देवतांची कामगिरी यांचींहि विवेचनें त्यांत योग्य ठिकाणी आलेलीं आहेत.