प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.                 
 
मराठींतील भाषाशास्त्रविषयक प्रयत्न- भाषाशास्त्रविषयक मराठींत वाङमय फारच थोडें आहे. महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या प्रस्तावनाखंडांत जगाचे इतिहास भाग पाडण्यासाठीं भाषाशास्त्राची मदत कशी काय होते हें सांगून शिवाय अनेक भाषांचे वर्णनहि दिलें आहे. त्यांत सिंहली भाषेचें वर्णन (विभाग १ पृष्ठ १४३-१४९) पूर्वेकडील द्वीपकल्प व दक्षिणद्वैपायनसंस्कृति यांतील तीस एक भाषांचें स्वरूपहि वर्णन केलें आहे. तसेंच पुढें जिप्सींच्या भाषेची सविस्तर माहिती 'पश्चिमेकडील भ्रमण' या प्रकरणांत दिली आहे.

बॉपच्या काळानंतर तैलांनिक भाषाशास्त्र चांगल्या तऱ्हेनें प्रस्थापित झालें. आणि आज जगांतील प्रत्येक महत्वाच्या राष्ट्रांत महत्वाचे पंडित होऊन गेले. संस्कृत व्याकरणाच्या अभ्यासाचा विकास देखील अनेक पंडितांनीं केला आहे. वैदिक व्याकरणाचें पृथक्करण जें पाणिनींकडून अपुरें राहिलें तेंहि पुरें करण्याची खटपट अर्वाचीन भाषा पांडित्य करीत आहे. भारतीय भाषाशास्त्रपांडित्यांत हिंदुस्थानी माणसांचीं नांवें घ्यावयाचीं झालीं तर प्रथम राजवाडयांचें नांव घेऊन 'अनामिका सार्थवति बभूव' असें म्हणावें लागतें.

मराठी भाषेचा अभ्यास करण्याचा पहिला महत्वाचा प्रयत्न महानुभावांनी केला. त्यांच्यानंतर मराठींत ग्रंथ झाले नाहींत. कॅरेनें श्रीरामपुरास बसून एक मराठीचें तात्पुरतें इंग्रजींत व्याकरण रचण्याचा प्रयत्न केला. मराठींत चांगलें मोठें व्याकरण लिहिण्याचा प्रयत्न म्हटला ह्मणजे दादोबा पांडुरंगांचा होय.त्यांच्या कृतीसंबंधानें सहानुभूतीनें बोलावयाचें म्हणजे त्यांनी आपल्या शिक्षणाच्या मानानें त्यांत आपली पराकाष्टा केली असें म्हणून पुढें जावें. मराठींत आलेल्या शब्दांचें ऐतिहासिक अवलोकन करण्याचा प्रयत्न कृष्णशास्त्री गोडबोल्यांनीं केला. दादोबा पांडुरंगांनां संस्कृत सुद्धां येत नव्हतें त्यामुळें त्यांचें व्याकरण भाषेचें स्थूल पृथक्करण करून मोकळें झालें आहे; आणि कृष्णशास्त्री गोडबोले यांनीं मराठी भाषेंतील शब्दांचें पृथक्करण व त्यांचें व्युत्पत्तिशास्त्र त्या काळाच्या मानानें बरें सांगितलें आहे.