प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
भर्तृहरीचा वाक्यपदीय ग्रंथ- भर्तृहरीचा वाक्यपदीय म्हणून एक व्याकरणग्रंथ आहे. वाक्यपदीय हा ग्रंथ छंदोबद्ध असून त्यांत व्याकरणशास्त्राचें विवेचन आहे. याचे तीन अध्याय आहेत. (१) आगमकाण्ड, (२) वाक्यकाण्ड व (३) प्रकीर्णकाण्ड. दुसऱ्या काण्डाच्या शेवटीं सातएक श्र्लोकांत ग्रंथकारानें महाभाष्यासंबंधी जी हकीकत दिली आहे त्या हकीकतीमुळें या ग्रंथाला ऐतिहासिक महत्व आलें आहे. यांत, बैजि, सौभव, व हर्यक्ष यांचा चंद्रगोमिन् याच्या पूर्वीचे व्याकरणकार म्हणून उल्लेख केलेला आहे. चिनी प्रवाशी इत्सिंग हा भर्तृहरि इ.स. ६५० त मेला असें म्हणतो.