प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
भट्टोजी दीक्षिताची सिध्दान्तकौमुदी- भट्टोजी अजमासें इ.स.१६०० च्या सुमारास होऊन गेला. सिध्दान्तकौमुदी हा ग्रंथ आज अस्तित्वांत असलेल्या सर्व व्याकरण ग्रंथांत श्रेष्ठ असून व्याकरणशास्त्रांत् प्रवेश होण्यास त्या ग्रंथाइतकें चांगले दुसरें पुस्तक आज उपलब्ध नाहीं. हा ग्रंथ सर्वप्रसिद्ध असल्यानें त्याची रूपरेखा सांगण्याचें कारण नाहीं या ग्रंथावर भट्टोजीदीक्षित याची स्वत:चीच एक प्रौढमनोरमा नांवाची टीका आहे. खेरीज, भट्टोजीदीक्षितानें पाणिनीच्या सूत्रांवर काशिकेच्यासारखी शब्दकौस्तुभ नांवाची एक टीका लिहीली आहे. भट्टोजीदीक्षिताचें घराणेंच वैयाकरणांचें दिसतें. त्याचा पुतण्या कोंडभट्ट यानें, वाक्यरचना व व्याकरणाची मूलतत्वेंयावर एक स्वतंत्र ग्रंथ लिहिला आहे. भट्टोजी दीक्षितांचा पुत्र भानूजी यानें अनेक शिष्य पढविले,व त्याचा पुत्र हरि दीक्षित यांने तोच क्रम पुढें चालविला. हरि दीक्षिताच्या शिष्यांपैकी नागोजी भट्ट किंवा नागेश हा बराच प्रसिध्दीस आला होता. नागोजीभट्ट हा दांडगा लेखक होता. धर्मशास्त्रावर चौदा ग्रंथ, योगशास्त्रावर एक, अलंकारावर तीन व व्याकरणावर बारा इतके ग्रंथ यानें लिहिले असून शिवाय कित्येक टीका त्याच्या नांवावर प्रसिद्ध आहेत.