प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
पाणिनीय व्याकरणावरील ग्रंथांचा पुढील इतिहास- पाणिनीच्या व्याकरणावर जे ग्रंथ झाले ते मुळांत जरी एका विवक्षित संप्रदायासाठीं म्हणून लिहिले गेले होते तरी ते इतर संप्रदायांचे ग्रंथ यांत सारखेपणा इतका आहे कीं थोडया फार फरकानें त्यांपैकीं कित्येक एका संप्रदायांतून दुसऱ्या संप्रदायांत ढकलण्यांत आले. या ग्रंथांसंबंधीं सविस्तर माहिती देण्यास येथें अवकाश नसलयानें प्रत्येक भागावरील कांहीं मुख्य ग्रंथांचाच येथें उल्लेख करतों.
धातुपाठ- याच्यावर क्षीरस्वामीची टीका आहे. या टीकेचें नांव धातुवृत्ति. या धातुवृत्तीशिवाय क्षीरस्वामीने दुसरे पांचग्रंथ लिहिले आहेत. (१) निपाताव्ययोपसर्गवृत्ति, (२) अमरकोशावर टीका, (३) अमृततरंगिणी, (४) निघण्टुवृत्ति आणि (५) गणवृत्ति. प्रसिद्ध वेदभाष्यकार सायणाचार्य यांची या धातुपाठावर आणखी एक माधवीयवृत्ति नांवाची टीका आहे. सायणाचार्यानीं या विषयावरचे पाणिनीय संप्रदायाचे दुसरे ग्रंथकार सांगितले आहेत. त्यांत भीमसेन व मैत्रेयरक्षित यांचीं नांवें प्रमुखत्वानें सांगण्यासारखी आहेत.
गणपाठ- याकडे टीकाकारांचे जावें तसें लक्ष गेलेलें दिसत नाहीं. पूर्णपणानें उपलब्ध झालेला असा यावरचा एकच ग्रंथ आहे व तो म्हणजे गणरत्नमहोदधि हा होय. हा ग्रंथ व यावरची टीका ही दोनहि वर्धमानानें इ.स. ११४० त लिहींली.
लिंगानुसार- भट्टोजी व रामचंद्र यांच्या कौमुदींमध्ये लिंगानुशासन आलेलेंच आहे. शिवाय, लिंगांवर लिहिलेल्या पाणिनीच्या संप्रदायाच्या ग्रंथांत हर्षवर्धन शबरस्वामी व वरदराज यांच्या ग्रंथाचा उल्लेख आढळून येतो. यांतला हर्षवर्धन हा बहुतांशी बाणकवीचा आश्रयदाता जो हर्षवर्धन राजा तो नसला पाहिजे. शबरस्वामी व मीमांसाकार शबरस्वामी एकच की नाहीं याबद्दल वाद आहे.संवत्१२८७ मधील खंबायत येथें एक ताडपत्रांवर वामनाचार्याचा लिंगानुशासन हा ग्रंथ सांपडला आहे [कॅंबे, नं २६६ ] सदर वामनाचार्यानें आपल्या पूर्वीचे ग्रंथकार म्हणून व्याडी, वररूचि, चंद्र, जिनेन्द्र आदिकरून ग्रंथकारांच्या ग्रंथांचा उल्लेख केलेला आहे. [व्याडिप्रणीतमथवाररूचं सचांद्रं। जैनेंद्र लक्षणगतं विविधं तथान्यत् लिंगस्थ लक्ष्महि समस्त विशेषयुक्तमुक्तं मया परिमितं इ.] यावरून हे ग्रंथ इ.स.१२०० च्या पूर्वीचे असले पाहिजेत एवढें तरी निश्चितपणानें म्हणतां येतें. डॉ.पीटर्सन यानें वामनाचार्य व कशिकेचा कर्ता हे दोघे एकच असें तें दाखविलें आहे तें खरें मानलें तर ह्मा वरील ग्रंथांचा काल इ.स. ८०० च्याहि पूर्वी ओढला पाहिजे.
उणादिपाठ- उणादिसूत्रांचें कर्तृत्व कोणाकडे जाते यासंबंधाचा विचार वर आलेलाच आहे. हीं सूत्रें बहुतेक जशींची तशींच, क्कचित् थोडया फार फरकानें, कातंत्र, हैम, जौमर, सौपद्य वगैरे अपाणिनीय संप्रदायांत घेतलेलीं आहेत. उज्जलदत्ताची टीका हा यावरील उत्कृष्ट ग्रंथ होय. ऑफ्रेक्ट साहेबांने या ग्रंथाला जी प्रस्तावना जोडली आहे तिच्यावरून याचा काळ इ.स. १२५० ठरवावा लागतो.
परिभाषा-परिभाषांचे कर्तृत्व साधारणपणें व्याडि याजकडे देण्यांत येतें.परिभाषांसंबंधानें इतका उहापोह झालेला आहे कीं,पाणिनीय ग्रंथांच्या अभ्यासकांस तो एक अत्यंत अवघड भाग झाला आहे.नागेशाच्या परिभाषेदुशेखरामध्ये या परिभाषाचें अत्यंत सुगम असें विवरण असून त्यावर पायगुंड, भैरवमिश्र, शेषशर्मन्, भीमभट्ट वगैरेंच्या टीका झाल्या आहेत.
याशिवाय व्याकरणाच्या मूलतत्वाची मीमांसा करणारे अनेक ग्रंथ या कालांत निर्माण झाले. ध्वनीचें स्वरूप, शब्द व त्याचा अर्थ यांचा परस्परसम्बन्ध, किंवा वाक्य व त्याचे घटकावयव यांचा परस्परसम्बन्ध इत्यादि या ग्रंथांतले विषय पतंजलीच्या महाभाष्यांत पूर्वीच येऊन गेले होते.त्याच पायावर पुढील ग्रंथकारांनीं आपली इमारत रचलेली आहे. अशा ग्रंथापैकीं, भर्तृहरीचा वाक्यपदीय हा ग्रंथ सर्वात जुना होय. व सर्वात अर्वाचीन असा नांव घेण्यासारखा ग्रंथ म्हणजे कोंडभट्टाचा वैयाकरणसिध्दान्तभूषण हा ग्रंथ होय; यावर नागेशानें एक टीका लिहीलेली आहे.