प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
पाणिनीपूर्वीचे व्याकरणसंप्रदाय- 'अष्टध्यायी'या ग्रंथाचें अतिशय नीटनेटकें व संक्षिप्त स्वरूप पाहतां, तशा तऱ्हेचे ग्रंथ लिहिण्यास पाणिनीनेंच सुरूवात केली हें म्हणणें अप्रयोजक होईल. कां कीं कोणत्याहि पूर्णत्वाच्या किंवा गुंतागुंतीच्या पद्धतीचा विकास एकदम होत नाहीं.यास्क व पाणिनी यांच्यामधील काळांत असले ग्रंथ कांही तरी झाले असले पाहिजेत याबद्दल पाणिनीच्या सूत्रांतच पुरावा आहे[हाच विभाग पृ.४६ पहा] अपिशलि व काशकृत्स्न हे पाणिनीच्या पूर्वीचे व्याकरणकार होते [पाणिनी ६.१.९२] काशकृत्स्नाचा ग्रंथ तीन अध्यांयात असून तो सूत्रात्मक आहे अशी माहिती काशिकावृत्तींत आहे [काशिका;पा.७३.९५वरची] शिवाय, पा.७.३.९५ येथें काशिकावृत्तींनें आपिशीलीचा म्हणून एक नियम दिलेला आहे. कैयटानें तर या दोघांच्या ग्रंथांतले म्हणून दोन उतारे दिले आहेत [कैयट;५.१.२१वर]. बोपदेवानें आपल्या मुग्धबोध नांवाच्या ग्रंथांत 'इंद्रश्चन्द्र:काशकृत्स्नपिशली शाकटायन:॥ पाणिन्यमरजैनेंद्रा जयंत्यष्टादिशाब्दिका:' अशी एक वैयाकरणांची याद दिली आहे.