प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.                    

परिसंख्याविधीचे दोन प्रकार.- परिसंख्याविधि दोन प्रकारचा आहे. एक श्रौती परिसंख्या व दुसरा लाक्षणिकी परिसंख्या.

इतरव्यावृत्तिपर पद ज्या ठिकाणीं घातलेलें असतें त्यास श्रौती परिसंख्या असें म्हणतात. उदाहरणार्थ, ‘अत्र ह्येवावयन्ति’। - ‘प्रकृत यागांत हे (च) गातात.’ म्हणजे ‘एव’या पदानें पवमानव्यतिरिक्त सर्व स्तोत्रांची निवृत्ति केली आहे.

लाक्षणिकी परिसंख्येचें ‘पञ्च पञ्चनखा भक्ष्या:’ हें उदाहरण आहे. कारण, इतरांचें निवृत्तिवाचक पद तेथें नाहीं.