प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
पाणिनीची अष्टाध्यायी, तिचा काल, तींतील प्रक्षिप्त भाग.- डॉ. पीटरसन, वेबर, मॅक्समुल्लर, गोल्डस्टकर, सत्यव्रत सामाश्रमी इत्यादिकांच्या मतांच्या रा.राजवाडे यांनी केलेल्या परीक्षणाचा पुनरूच्चार करून डॉ.बेलवलकर यांनी राजवाडे यांचे मत भीत भीत स्वीकारीत पाणिनीचा काल ख्रि.पू. सातवें शतक हा ठरविलेला आहे. राजवाडे मात्र पाणिनीस ख्रि.पू. ७५०च्या पाठीमागें नेऊं पहातात. राजवाडे यांनीं दिलेल्या आधारांपैकीं कांही डॉ.भांडारकरांनी इंडियन आँटिक्करीमध्यें पूर्वीच प्रसिद्ध केले होते [पाणिनी पहा] पाणिनींत सुमारें ४००० सूत्रें आहेत. त्यांचे आठ अध्याय केले आहेत; म्हणून त्यास अष्टाध्यायी म्हणतात. प्रत्येक अध्यायांत चार पाद आहेत. हीं सूत्रें जशींचीं तशींच पाणिनीकालापासून आजपर्यंत चालत आलीं आहेत. फक्त पांच सूत्रांविषयीं तीं सूत्रेंमहाभाष्यकारांनीं र्वात्तिकांत घातलीं असल्यामुळें मतभेद आहे. हीं सूत्रें म्हणजे धातुपाठ, गणपाठ, उणादिसूत्रें, इत्यादि परिशिष्टें होत. यांपैकीं धातुपाठ, गणपाठ हे भाग पाणिनीचेच आहेत असें बऱ्याच निश्चितपणानें म्हणतां येतें. उणादिसूत्रांची गोष्ट मात्र तशी नाहीं. हीं सूत्रें शाकटायन ऋषीचीं होत असें साधारणत: समजलें जातें. व यास निरूक्त व महाभाष्य यांचा आधार आहे. [नामान्याख्यातजानीति शाकटायनो नैरूक्तसमयश्च (निरूक्त १.१२.२) 'नामच धातुजमाह निरूक्ते व्याकरणे शकटस्य तोकस्' (महाभाष्य)]. परंतु, शाकटायनाचा असा कोणताहि ग्रंथ शुद्ध परंपरेनें आतांपर्यंत आलेला नाहीं आणि शाकटायनाचा एखादा ग्रंथ असूं शकेल कीं नाही याचाच बेलवलकरांस संशय वाटतो. उलटपक्षीं, पाणिनीच्या संप्रदायाची छाप उणादिसूत्रांवर पडलेली स्पष्टपणानें द्दग्गोचर होते.प्रो.पाठक यांनीं या विषयावर एक निबंध भांडारकर इन्स्टिटयूटपुढें (जूलै १९२२) वाचला त्यांत हाच अभिप्राय व्यक्त केला होता. ऱ्हस्व, दीर्घ, प्लुत, उपधा, लोप, संप्रसारण, अभ्यास इत्यादि पारिभाषिक संज्ञांचा उपयोग पाणिनीच्या अर्थानें उणादिसूत्रांत केला आहे. परंतु अष्टाध्यायींतील मताविरूद्ध कांहीं गोष्टी उणादिसूत्रांत सांपडतात. तेव्हां सर्वत्र उणादिसूत्रें पाणिनींची असेहीं म्हणतां येत नाहीं. या बाबतींत गोल्डस्टकरचें असें म्हणणें आहे कीं, पाणिनीनें उणादिसूत्रांची एक यादी तयार केलेली होती व मागाहून कात्यायनानें तींत भर घातली व शोध घातले. फिट्सूत्रें हीं एकमतानें शांतनवाचार्यांची म्हणून ठरलेलीं आहेत.शिक्षा व लिंगानुशासन हीं परिशिष्टें तर उघड अर्वाचीन आहेत. आतां आपण कात्यायनाकडेच वळूं.