प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.             
 
बोपदेवाचें कुलवृत्त व त्याचे ग्रंथ- बोपदेव हा केशव नांवाच्या वैद्याचा मुलगा असून याचा गुरू धनेश हा होता. याची जन्मभूमि अर्वाचीन दौलताबादेजवळ असून बोपदेवाच्या काळीं तेथें देवगिरीचे यादव राजे राज्य करीत होते. यादववंशांतल्या महादेव नांवाच्या राजाचा मुख्य प्रधान जो हेमाद्रि त्याचा हा आश्रित होता असें म्हणतात. याचा गुरू व बाप हे दोघेहि वरदा नदीच्या तीरावरील सार्थ नांवाच्या गांवीं रहात असत. बोपदेव हा दांडगा लेखक होता. मुग्धबोध, कविकल्पद्रुम, व त्याची टीका कामधेनु यांखेरीज मुक्ताफळ, हरिलीलाविवरण, शतश्लोकी नांवाच्या वैद्यविद्येचा एक ग्रंथ व धर्मशास्त्रावर एक ग्रंथ इतके ग्रंथ बोपदेवानें लिहिले आहेत.