प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
भाषाशास्त्राचा यूरोपांत अभ्यास- यूरोपांत व्याकरणशास्त्राचा उदय ग्रीकांच्या काळांत थोडा बहुत झाला. तथापि तो केवळ वादविवादाचें व अलंकाराचें अंग म्हणून उत्पन्न झाला. त्याच्या उत्पत्तीस सेफिस्ट पंडित कारण झाले. प्रोटागोरास हा ग्रीकांचा मोठा वैयाकरण; पण त्याची उडी लिंगभेदाचें अवगमन आणि क्रियापदांचे 'अर्थ' (विध्यर्थादि) यांच्या पलीकडे गेली नाहीं. ग्रीक तत्वज्ञ प्लोटो, आरिस्टाटल वगैरेपर्यंत जर आपण नजर फेंकली तर व्याकरणशास्त्राची वाढ फारच थोडी झालेली दिसते.
व्याकरणाची वाढ त्यानंतर थोडीबहुत अलेक्झांड्रिया येथें झाली. अलेक्झांड्रिया येथील तत्वज्ञ होमरच्या भाषेचें आणि ॲटिका येथील ग्रंथकारांचे ग्रंथ वाचून भाषेचें पृथक्करण करूं लागले. व भाषेचे नियम शोधू लागले. त्यांच्यामध्यें पंथ उत्पन्न झाले. एक पंथ म्हटला म्हणजे ॲनालॉजिस्टांचा; आणि दुसरा ॲनोमॅलिस्टांचा. एक पंथ म्हणजे, व्याकरणाच्या नियमास अपवाद नकोत, दुसरा पंथ म्हणे, भाषा तर अपवादानेंच भरलेली आहे.