प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
भाषाशास्त्राचा ऐतिहासिक अभ्यास- ऐतिहासिक पद्धतीचा मराठी भाषेला स्पर्श होऊं देणारा पहिला लेखक म्हटला म्हणजे कृष्णशास्त्री चिपळूणकर हा होय. त्यांनीं दादोबाकृत व्याकरणावर टीकात्मक लेख प्रथम शालापत्रकांतून प्रसिद्ध केले; ते पुढें रामचंद्र भिकाजी जोशी यांनी स्वतंत्र छापून काढले. जोशी यांनीहि एक मराठी व्याकरण लिहिलें आहे. त्या व्याकरणास शास्त्राच्या विकासाच्या इतिहासांत स्थान नाहीं. केवळ तार्किक द्दष्टया वाक्यांतील शब्दांची परस्परसंगति पाहणारा आणि मराठी व्याकरणाचा शास्त्रीय द्दष्टीनें अभ्यास करणारा लेखक म्हटला म्हणजे मोरोपंत दामले हा होय.
राजवाडे यांचे महत्वाचे व्याकरणग्रंथ म्हटले म्हणजे ज्ञानेश्वरीचें व्याकरण,सुवंतविचार,गोवें येथें निघणाऱ्या प्राचीप्रभा या मासिकांतील व्याकरणावरील लेख, आणि त्यांनीं अलीकडे प्रसिद्ध केलेला 'संस्कृत भाषेचा उलगडा' हे होत. 'संस्कृत भाषेचा उलगडा' या पुस्तकामध्यें वैदिक भाषेचें पृथक्करण निराळया पद्धतीनें केलें आहे; आणि आर्यन् महावंशाच्या इतिहासाविषयीं प्रचलित कल्पनांपेक्षां निराळया कल्पना त्यांनीं पुढें मांडल्या आहेत. ज्ञानेश्वरीचें व्याकरण ज्या प्रतीवरून त्यांनीं तयार केलें त्या प्रतीची प्राचीनता त्यांच्या अनुयायांपैकींच कित्येक उदाहरणार्थ, रा.भावे वं पोतदार अक्षरांच्या वळणांच्या इतिहासाच्या द्दष्टीनें शंकास्पद समजूं लागले आहेत. परंतु भाषेतिहासाच्या दृष्टीनें त्यांच्या व्याकरणाचें परीक्षण करण्याची तसदी अजून कोणी घेतली नाहीं. आणि राजवडयांच्या अनेक हजारों शब्दांच्या व्युत्पत्या पाहून कित्येक व्युत्पत्यांबद्दल जरी मधून मधून बिनमेहनतीची टीका द्दष्टीस पडते तरी त्यांच्या कार्याचें सविस्तर परीक्षण करणारा कोणी निघाला नाहीं.