प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
भारतीयांचा व्याकरणशास्त्रावरील अभ्यास- आपल्या हिंदुस्थानांत व्याकरणशास्त्राचा अभ्यास जितक्या कळकळीने व पूर्णपणानें झालेला आहे तितक्या कळकळीने व पूर्णपणानें दुसऱ्या देशांत झालेला नाहीं असें म्हटल्यास अतिशयोक्तीचा दोष माथीं येईल असें बिलकुल वाटत नाहीं. प्राचीन व अर्वाचीन वैयाकरणांची नावें व त्यांनी लिहीलेली पुस्तकें, यांच्या यादीवरून एकदां जरी नजर फिरविली तरी देखील वरील विधानाची सत्यता पटण्यासारखी आहे. आजपर्यंत झालेले व सध्यां प्रचलित असलेले व्याकरणसंप्रदाय कमींत कमी बारा आहेत;व ज्यांचे आज प्रत्यक्ष ग्रंथ उपलब्ध आहेत, किंवा ज्यांच्याबद्दल दुसऱ्यांच्या उल्लेखांवरून आपणांस माहिती मिळूं शकते, असे कमींत कमी ३०० ग्रंथकार या विषयावर आहेत असें डॉ.बेलवलकर आपल्या संस्कृत व्याकरणपद्धतीच्या इतिहासांत म्हणतात. मूळ ग्रंथ, टीका व उपटीका मिळून या विषयावरचे ग्रंथ यांची संख्याच एवढी मोठी आहे असें नव्हे,तर त्या ग्रंथांत असलेल्या मजकुराची व भाषास्वरूप शोधांची किंमतहि तितकीच मोठी आहे.