प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
या संप्रदायाचा उत्तरेतिहास- मराठे लोकांचा उदय होण्यापूर्वीच्या दोन शतकांत बोपदेवाला बरीच मान्यता मिळालेली होती. शब्दकौस्तुभ व मनोरमा या ग्रंथांत भट्टोजी दीक्षितानें काढलेल्या उद्गारांवरुन हें स्पष्ट होतें. मनोरमा ग्रंथांत भट्टोजी लिहितो :- 'बोपदेव महाग्राहग्रस्तो वामन दिग्गज: कीर्तेरेव प्रसंगेन माधवेन विमोचित:॥'' ‘मुग्धबोध' कर्त्याच्य मतांचें खंडण भट्टोजीनें बरेंच केलें आहे यावरूनहि भट्टोजी दीक्षिताच्या वेळीं हा संप्रदाय बराच जोरांत होतासें दिसतें.
मुग्धबोधावर अनेक टीका झाल्या आहेत.यांपैकीं सर्वांत प्रसिद्ध टीका म्हणजे राम तर्कवागीश याची होय. हा नैय्यायिक असून पाणिनी आदिकरून इतर ग्रंथांचेंहि यानें अवलोकन केलें होतें. दुर्गादासानेंहि याचा उल्लेख केलेला आहे. (१६३९). दुर्गादासानें कविकल्पद्रुमावर एक टीका लिहिलेली आहे. दुर्गादासानें, रामानंद, काशीश्वर वगैरेचा उल्लेख केलेला आहे; व उलट त्याचाहि उल्लेख विद्यावागांश, मोलानाथ व रामभद्र न्यायालकांर यांनीं केलेला आहे.
काशीश्वर रामतर्कवागीश व नंदकिशोरभट्ट यांनीं या संप्रदायाचे कांहीं ग्रंथ केले आहेत. त्यांचा उद्देश मुग्धबोधांत ज्या गोष्टी सोडून दिल्या होत्या त्यांचे विस्तारेकरुन वर्णन करण्याचा दिसतो. यापैकी नंदकिशोरभट्टाने आपला काळ इ.स. १३९८ हा दिला आहे.
या शाखेच्या उपग्रंथापैंकी, कविकल्पद्रमाखेरीज, बोपदेवाचा स्वत:चा असा एकहि ग्रंथ नाहीं. कविकल्पद्रुम हा ग्रंथ म्हणजे एक धातुकोश आहे. यावर कामधेनु नांवाची एक टीका आहे. याचे महत्व एवढेंच की, यांत दुसऱ्या ग्रंथातली वचनें पुष्कळ सांपडतात. रामचंद्र विद्याभूषण यानें परिभाषावृत्ति नांवाचा ग्रंथ शके १६१० त लिहला. दुसरेहि कित्येक ग्रंथ बोपदेवाच्या नांवावर प्रसिद्ध आहेत, पणते बहुधा चुकीनें त्याच्या नांवावर पडले असावेत.