प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
लाक्षणिकी परिसंख्येंतील तीन दोष- उपर्युक्त कारणांमुळें या परिसंख्येवर नेहेमीं तीन दोषांचा आरोप करण्यांत येतो. हे दोष म्हणजे (१) श्रुतहानि, (२) अश्रुतकल्पना व (३)प्राप्तबाध हे होत. हे दोष उघड आहेत. कारण, मांसाशन हें रागत: प्राप्त असल्यामुळें ‘पञ्च पञ्चनखा भक्ष्या:’ ह्या म्हणण्यांत कांहीं तात्पर्य नाहीं. याला ‘श्रुतिहानि’ हा अन्वर्थ शब्द लावला आहे. परंतु यावरूनच तद्वयतिरिक्त अभक्ष्य असें ठरल्यामुळें याला अश्रुतकल्पना असें म्हणतात. सर्व पशूंची प्राप्ति झाली असतां पांच पशूंची भक्ष्यता सांगितली म्हणून प्राप्तबाध झाला. हे तीन दोष येतात ते टाळंता येतील तोपर्यंत टाळण्याचा प्रयत्न करावयाचा.