प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.                 

यूरोपांतील भाषाशास्त्रविषयक मतभेद- यूरोपीय शास्त्रज्ञांमधील शास्त्रविषयक तंटे व पक्ष यांची आपणांस थोडीशी माहिती असावी. कां कीं त्याशिवाय त्यांच्या ज्ञानाचें व त्यांचें शास्त्रीय विवेचन आणि पक्षमूलक दुराग्रह यांचें सम्यग् ज्ञान होणार नाहीं. त्यांच्या तंटयांतील कांहीं ठळक मतभेदांचा केवळ उच्चार करून आपणांस पुढें गेलें पाहिजे.

स्व रू प वि ष य क- पहिल्याप्रथम शास्त्राच्या स्वरूपाविषयी असलेले मतभेद घेऊं. भाषाशास्त्र हें कसें आहे, याचा अन्तर्भाव कोठें करावयाचा याविषयीं दोन मतें आहेत.श्लायशेर व मॅक्समूलर ही मंडळी असें म्हणत कीं, भाषेच्या विकृतीमध्यें किंवा चालू अवस्थेंत नैसर्गिक नियम आढळून येतात त्या अर्थी भाषाशास्त्राचा समावेश भौतिक शास्त्रांत व्हावा.उलट पक्ष असें म्हणे कीं,भाषाशास्त्राचा समावेश ऐतिहासिक शास्त्रांत व्हांवा. आज भाषाशास्त्र हें मनुष्येतिहासास उपयोगी शास्त्र म्हणून समजण्यांत येतें; आणि ज्या प्राचीन कालाबद्दल अन्य प्रकारची माहिती उपलब्ध नाहीं त्या कालाचा इतिहास लिहिण्याकडे भाषाशास्त्राचा उपयोग करण्यांत येतो. भाषेच्या भौगोलिक स्थानाचें इतिहासमहत्व तिसऱ्या विभागांत (पृ १७) दिलेंच आहे. भाषांवरून मानववंश कसे काढतां येतात, व भाषांचें वर्गीकरण कसें करावें याविषयी माहिती  त्यानंतर तिसऱ्या विभागांतच दिली आहे. मनुष्याच्या परिभ्रमणाचा इतिहास भाषाशास्त्राच्या साहाय्यानें कसा काय लागतो याविषयींहि माहिती दिली आहे. यावरून भाषाशास्त्र व मानवेतिहास यांचा संबंध कसा निकट आहे तें दिसून येईल.

भाषाशास्त्रपंडितांचे मतभेद भाषाशास्त्रास नांव काय द्यावें याविषयीं देखील आहेत.

ना म मू ल क- भाषाशास्त्राचे निदर्शक शब्द यूरोपीय वाङमयात फिलॉलॉजी, ग्लॉटिक्स लिंग्विस्टिक्स वगैरे आहेत. यांपैकीं फिलोलोगी उर्फ फिलॉलॉजी याच्या उपयोगासंबंधानें फ्रेंच व इंग्रज ग्रंथकार आणि विरूद्ध पक्षीं जर्मन ग्रंथकार यांमध्ये फरक आहे. जर्मन ग्रंथकार हा शब्द संस्कृतिशास्त्र अशा अर्थानें वापरतात. फिलोलोगी हा ग्रीकांचा शब्द आहे. आणि या शब्दाचा ग्रीक अर्थ अगदींच भिन्न आहे. मध्ययुगांत जे ग्रंथकार आपणांस फिलोलोगिस्ट म्हणवीत ते बरेंच व्यापक क्षेत्र आपल्या शब्दकक्षेंत घेत. या प्रकारच्या परिस्थितीमुळें शास्त्रनामकरणांत आणि विषयक्षेत्रव्याख्यानांत वैयक्तिक आवडीनिवडीस बरेंच क्षेत्र राहतें; आणि यामुळें भाषाविषयक शास्त्रावरील वाङमयाचा बराचसा भाग एतद्विषयक तंटयांनीं व्यापिला आहे. यूरोपीय संज्ञा आणि त्यांचे इतिहास यांशीं शास्त्रांचें वर्गीकरण जुळविण्याची जबाबदारी आपल्यावर मुळींच नसल्यामुळें आपणांस त्या तंटयांत पडावयाचें कारण नाहीं,आणि त्या तंटयामुळें व त्यांत झालेल्या तडजोडीमुळें जी कोती व मुर्ख बंधनें उत्पन्न होतात तीं लावून घेण्याचें कारण नाहीं.