प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
विधीचे तीन प्रकार - विधीचे प्रकार तीन आहेत. (१)अपूर्वविधि, (२) नियमविधि व (३) परिसंख्या विधि .यांचीं लक्षणें खालील श्लोकांत संगृहीत केलीं आहेत.
विधिरत्यन्तमप्राप्ते नियम:पाक्षिके सति ।
तत्र चान्यत्र चप्राप्तौ परिसंख्येति गीयते ॥
अपूर्व विधि- ज्याची ज्याकरितां अत्यन्त अप्राप्ति असते त्याचा त्याकरितां विधि सांगावयाचा यास 'अपूर्वविधि' असें म्हणतात उदाहरणार्थ, 'यजेत स्वर्गकाम:' या वाक्यानें स्वर्ग मिळविण्याकरितां यज्ञ करण्यास सांगणें ही अपूर्व गोष्ट सांगितली आहे .म्हणून हा 'अपूर्वविधि' होय.
नियमविधी- एकदां अप्राप्त असलेल्या कर्मांचें जें विधान त्यास 'नियमविधि' असें म्हणतात. उदाहरणार्थ, 'ब्रीहीनवहन्ति' या वाक्यांत टरफल काढण्याकरितां अवहननाचें विधान नसून अवघातानेंच टरफल काढावें असा नियम सांगण्याकरितां केवळ हें विधान आहे. कारण, अवहनन या वाक्यानें जरी सांगितलें नाहीं तरीहि चरूपुरोडाश करण्याकरितां व्रीहीचें वितुषीकरण केल्याशिवाय केव्हांहि भांगणार नाहीं .परंतु तें वितुषीकरण तुम्ही अवघातानें कराल किंवा दुसऱ्या कोणत्याहि प्रकारें कराल तर तसें न करतां अवघातानेंच वितुषीकरण झालें पाहिजे. एवढ्याकरितां हें वाक्य आहे. यालाच ‘नियमविधि’ असें म्हणतात.
परिसंख्याविधि.- दोघांची एकदम प्राप्ति झाली असतां एकाची निवृत्ति करणारा जो विधि त्यास ‘परिसंख्याविधि’ म्हणतात. उदाहरणार्थ ‘पञ्च [शशक: शल्यक: खंगी कूर्मो गोधाथ पञ्चम:।] पञ्चनखा:भक्ष्या:’ या वाक्यानें पञ्चनख आणि पञ्चनखेतर या सर्वाचें भक्षण प्राप्त झालें असतां फक्त पञ्चनखेतर प्राण्यांची निवृत्ति केली आहे.
येथें केवळ भक्षणाचें विधान करण्याची कांही जरूरी नाहीं. कारण, तें प्राण्यास स्वाभाविक आहे.
हा नियमविधीहि म्हणतां येत नाहीं. कारण, नियमविधि हा एकदां प्राप्ति आणि एकदां अप्राप्ति असतांनाच प्रवृत्त होत असतो. परंतु येथें तसें कांही नाहीं. पञ्चनख आणि अपञ्चनख या दोहोंचीहि येथें प्राप्तीच आहे. म्हणून हा नियमविधि नसून परिसंख्याविधि होय.