प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.           

शाकटायन संप्रदाय- शाकटायनाचा शब्दानुसार हा ग्रंथ मुख्यत:श्वेतांबर जैन लोकांकरितां लिहिलेला आहे. याच्या वरच्या टीका व गणरत्नमहोदधि, माधवीय धातुवृत्ति इत्यादि ग्रंथांतून आलेले याचे उल्लेख यांवरून पाहतां या ग्रंथाचा श्वेतांबर जैनांपेक्षा इतर लोकांतच जास्त प्रचार होता असें दिसतें. परंतु इतकी लोकप्रियता मिळविण्याची या ग्रंथाची योग्यता नाहीं. कारण, यांत स्वतंत्र असा भाग फारच थोडा आहे. याचा कर्ता शाकटायन हा अलीकडचा आहे. पाणिनीच्या अष्टाध्यायींत व यास्काच्या निरूक्तांत ज्याचा उल्लेख आढळतो तो शाकटायन हा नव्हें. याला अभिनवशाकटायन म्हणतात; व या नांवांनें याचे उल्लेख केलेले बोपदेवाच्या कामधेनूध्यें व हेमचंद्रामध्यें आपणांस सांपडतात. शाकटायनावर प्रो.पाठक यांनीं इंडियन ॲटिक्करि पुस्तक ४३, ४४, ४५, मध्यें एक लेख लिहिला त्यांत त्यांनीं (१) शब्दानुशासन व अमोघवृत्ति हे दोन्ही ग्रंथ शाकटयानानेंच लिहिलें; (२) हा शाकटायान श्वेतांबर जैन होता; (३) शाकटायान पहिल्या अमोघवर्षाच्या कारकीर्दीत होऊन गेला व त्यानें आपली अमोघवृत्ति शके ७३६ व ७८९ यांच्या दरम्यान लिहिली; (४) काशिकाकार न्यासकार व कुमारिल यांच्या नंतर व दयापाल, प्रभाचंद्र व अभयसूरी यांच्या अगोदर शाकटायन होऊन गेला असा पुरावा सांपडत असल्यामुळें वरील काळनिर्णयास पुष्टि मिळते असें दाखविलें आहे. त्यांच्या लेखांचा गोषवारा येणें प्रमाणे:

जैंन शाकटायनाची अमोघवुत्ति यक्षवर्म्याच्या चिंतामणी नंतर लिहिली गेली असें प्रो.कीलहॉर्न यांनीं प्रतिपादन केलें आहे.परंतु यक्षवर्म्यानें आपल्या चिंतामणीच्या प्रास्ताविक प्रशस्तींत असें स्पष्ट म्हटलें आहे कीं ''शाकटायन ...यदुपक्रमं शब्दानुशासनं सांर्वे तस्यातिमहती (तीं) वृत्तिं संहृत्य इयं लघि (घी) यसि (सी) वृत्तिर्वक्ष्यते यक्षवर्मणा'' [चिंतामणीची प्रशस्ति श्लोक ३-७](ज्या शाकटायनानें शब्दानुशासन नांवाचा सर्वलोकोपयोगी आपला मूळ ग्रंथ लिहिला त्याच्या अमोघवृत्तीस संक्षिप्तरूप देऊन यक्षवर्मा आपली वुत्ति लिहितो) अमोघवृत्ति व चिंतामणि यांचा तुलनात्मक अभ्यास केला असतां असें आढळून येईल कीं यक्षवर्म्यानें मधून मधून कांहीं कमी महत्वाचे शब्द गाळून अमोघवृत्तींतील वाक्यें अनेक वेळां आपल्या ग्रंथांत जशींच्या तशीच घेतलीं आहेत [उदाहरणार्थ दोन्ही ग्रंथांतील प्रशस्तींची शेवटचीं वाक्यें व शाकटायन सूत्रें १,१,१७ आणि ५,६,२०७ यांवरील वार्तिकें पहा]. क्कचित् प्रसंगी या संक्षेपामुळें त्याच्या र्वात्तिकाचा अर्थ समजणेंहि दुर्लभ होतें. उदाहरणार्थ 'स:समानस्य धर्मादिषुच'यावर वार्तिक लिहितांना धर्मादिगण हा शब्द शाकटायनानेंनवींन तयार केला असल्यामुळें तो आपल्या वार्त्तिकांत [अमोघवृत्ति २.२.१०९] धर्मादि गणांतील सर्व शब्द देतो; परंतु यक्षवर्मा आपल्या चिंतामणींत गण बिलकुल देतच नाहीं. वर दिलेल्या उदाहरणांवरून अमोघवृत्ति हा ग्रंथ चिंतामणीच्या पूर्वी लिहिला गेला आहे एवढेंच सिद्ध होत नसून, शब्दानुशासन व त्यावरील अमोघवृत्ति हे दोन्हीहि ग्रंथ शाकटायनानेंच केले आहेत असेंहि द्दष्टोत्पत्तीस येतें.हीं सूत्रें व त्यांवरील वृत्ति या दोहोंचाहि कर्ता एकच आहे ही गोष्ट म्हैसूरच्या चिक्कदेव (इ.स.१६७२-१७०४) राजाच्या कारकिर्दीत होऊन गेलेल्या चिदानंदकवीस देखील ठाऊक होती असें दिसतें [कर्नाटक शब्दानुशासन, प्रस्तावना, पृ.२]. चिंतामणीच्या प्रशस्तींतील तिसऱ्या, चवथ्या व पांचव्या श्लोकांत शाकटायनानें शब्दानुशासन ग्रंथ लिहिला असें अगदीं स्पष्ट शब्दांत सांगितलेंच आहे. परंतु त्यानेंच अमोघवृत्तींहि लिहिली या विषयीं जर कोणास अजून शंका राहिली असेल तर त्यांनी वर्धमानानें आपल्या गणरत्नमहोदधींत-अमोघवृत्तींत असलेंली परंतु शब्दानुशासनांत नसलेलीं-कांही विधानें शाकटायनाच्याच नांवावर दिलीं आहेत [ गणरत्न महोदधि (बनारस आवृत्ति) पृ.८२-अमोघवृत्ति २.१.५७ आणि गणरत्न महोदधि पृ. ९०- अमोघवृत्ति २.१.७९] तिकडे लक्ष द्यावें म्हणजे खात्री होईल.

उपर्युक्त वर्धमानाच्याच सांगण्यावरून शाकटायन हा श्वेतांबर जैन होता असें आपणांस कळतें [शालातुरीय शकटांगज चंद्रगोमि दिग्वस्त्र भर्तृहरि वामनभोजमुख्या:॥ हा श्लोक पहा. जैनेंद्र व्याकरणाचा कर्ता देवनंदी याच्याच बद्दल दिग्वस्त्र हा शब्द वापरला आहे असें वर्धमान म्हणतो. म्हणजे शकटांगज अथवा शाकटायन श्वेतांबर होता असाच म्हणण्याचा उद्देश दिसतो]. शाकटायनानें आपल्या अमोघवृत्तींत श्वेतांबरांच्या ग्रंथांतूनच उदाहरणें [(अ) एतकमावश्यकमध्यापय अथो एनं यथाक्रमं सूत्रं। इमभावश्यकमध्यापय अथो एनं यथाक्रमं सूत्रं । (अमोघ,१.२.२०३-२०४.); (आ) भवता खलु छेदसूत्रं वोढव्यंनिर्युक्तीरधीष्व निर्युक्तीरधीते (अमोघ,४.४.१३३.४०). (इ)उपसर्वगुप्तं व्याख्यातारा:। उप विशेष वादिनं कवय: (अमोघ,१.३.१०४); (ई) कालिकासूत्रस्यानध्यायदशेकाला: पाठिता: । (अमोघ,३.२-७४.); घेतली असल्यामुळें व त्यांत आवश्यक व निर्युक्ति या श्वेतांबरीय ग्रंथांचा अभ्यास करण्याविषयीं उपदेश केला असल्यामुळें तो श्वेतांबर जैन होता या विधानास अधिकच पुष्टि येते. असें असतांहि त्याच्या मागून कित्येक वर्षांनी झालेल्या हेमचंद्रास (इ.स.१०८८-११७०) श्वेतांबर लोक चुकिनें आपला आद्य व्याकरणकार समजतात; व दिगंबर लोक तर पाणिनीच्या पूर्वी होऊन गेलेला शाकटायन व हा शाकटायन एकच आहे असें समजतात. खरें पाहिलें असतां हेमचंद्रानें पुष्कळ वेळां आपल्या बृहद्वृत्तींत अमोघ वृत्तींतील जसेचे तसेच उतारे घेतले आहेत.[ उ.अमोघ ३.३.३४-बृहद्. ७.१.१०९; अमोघ.३.१.१६६-बृहद् ६.३.१५७-व अमोघ. ३.१.१६८-बृहद्. ६.३.१५८].   

शब्दानुशासन सूत्र ४.३.२०७ यावरील अमोघवृत्तीच्या वार्त्तिकांतील 'अदहदमोघवर्षा(र्षो)रातीन्'या लड्.काळाच्या उपयोगसंबंधी दिलेल्या उदाहरणावरून शाकटायनाच्या अमोघवृत्तीचा काळ आपणांस ठरवितां येतो.कारण एका राष्ट्रकूट अंकितलेखांत पहिल्या अमोघवर्षाविषयी असें म्हटलें आहे कीं, 'भूपालात् (न्) कटकाभि (भान्) सपदि विघटितान् वेष्टइ (यि) त्वा ददाह 'यावरून असें दिसतें कीं,येथें ज्या ऐतिहासिक गोष्टीचा उल्लेख आला आहे, ती शाकटायनाला 'शक्यदर्शन' असल्यामुळें त्यानें आपल्या र्वात्तिकांत बुद्धया लड्.काळ योजिला आहे. परंतु उपर्युक्त अंकित लेख ज्यानें लिहविला त्याला ती तशी नसल्याकारणानें त्यास लिट् हा काळच योजावा लागेल. म्हणजे शाकटायन हा पहिल्या अमोघवर्षाच्या कारकीर्दीत होऊन गेला असला पाहिजे. आतां शके ७८९ च्या वगुम्रा येथील दानपत्रांत (इं. अँ. पु. १२, पृ. १८१) असा उल्लेख आला आहे कीं, ‘अमोघवर्ष’ हा गुजराथेंतील आपल्या नातेवाईकांशी लढत असतां ध्रृव युद्धांत जखमा लागून पडला व मरण पावला.  यावरुन अमोधवृत्तींत उदाहरण म्हणून दिलेली गोष्ट शके ७८९ च्या थोडे दिवस अगोदर घडली असावी व अमोघवृत्ति शके ७३६-७८९ यांच्या दरम्यान रचली गेली असावी असें अनुमान निघतें.

आतां शाकटायनाच्या ग्रंथांतील अंतस्थ पुराव्यावरून या अनुमानास पुष्टी मिळते किंवा कांहीं बाध येतो तें आपण पाहूं.न्यासकार आपल्या काशिकेवरील टीकेंत पाणिनीच्या सूत्राचें स्वतंत्र अर्थ देतात. [काशिका २.३.३९ व २.३.३७ वर न्यास (डेक्कन कॉलेज, इ.स.१८८१-८२ चें नं.३३ चें हस्तलिखित पृ. ५२ व आणि अमोघ. १.३.१७९ व १.३.१८० पहा )] अशी त्यांची प्रसिध्दि आहे. शाकटायन जरी काशिकेंतून आपल्या अमोधवृत्तींत कित्येक उदाहरणें घेतो [काशिका १.३.२३ व अमोघ.१.४.३७], तरी तिच्यांतील उतारे जसेचे तसेच घेत नाही; एवढेंच नव्हे, तर संधि सांपडेल तेव्हां तो काशिकेपेक्षां आपल्या ग्रंथाचें श्रेष्ठतव दाखविण्याचा प्रयत्न करितो [अमोघ १.४.५० व १.४.२३ आणि काशिका १.३.४७ व १.३.३८ पहा]. यावरून तो व न्यासकार हे दोघेहि काशिकारानंतर झाले हें तर उघडच आहे.परंतु त्यानें कित्येक शब्दांचे अर्थे[काशिकेवर न्यास (डे.कॉ.१८८१-८२चें नं. ३४ चें हस्तलिखित) पृ.६८ अ १.३.२१,पृ.७४ अ १.३.७५,पृ.६९ व १.३.४० व १.३.४१ आणि अमोघ.  १.४.१३,१.४.६७,१.४.२६ व १.४.२४ व १.४.२४ अनुक्रमानें पहा]व पुष्कळ वेळां बरीच माहितीहि न्यासकरांसून घेतली असल्याकारणानें तो न्यासकारांच्याहि मागून झाला असला पाहिजे. आपण न्यासकारांच्याच तोडीचे अहोंत हें दाखविण्याकरितां, न्यासकार स्वत:ला 'बोधिसत्वदेशियाचार्य' म्हणवून घेतात [डे.कॉ.इ.स. १८८१-८२ चें नं. ३४ चें हस्तलिखित पृ.७६ अ] तर तो 'श्रुतकेवलि देशियाचार्य' ही उपाधि धारण करितो [कोल्हापूरच्या जैन मठाचें हस्तलिखित]. 'जनिकर्तु: 'व' तत्प्रयोजक' या पाणिनीच्या शब्दांचें समर्थन काशिकेंत केलें आहे,म्हणून कुमारिलानें काशिकेवर कडक टीका केली आहे. न्यासकारांस ही गोष्ट माहित नसावी असें दिसतें. परंतु शाकटायनानें आपल्या ग्रंथांत पाणिनीच्या या समासांचें समर्थन केलें असल्यामुळें तो कुमारिलानंतर होऊन गेला असावा व त्याला वरील गोष्ट ठाऊक असावी असें दिसतें. आतां काशिकारांपैकीं जयादित्य इ.स. ६६१ त मरण पावला व जिनेंद्रबुध्दि न्यासकार आणि  कुमारिल हे अनुक्रमे इ.स. ७०७ व ७५० च्या सुमारास होऊन गेला असला पाहिजे. परंतु अंकितलेखावरून ठरविलेला शाकटायनाच्या अमोघवृत्तीचा काळ यानंतरचाच असल्यामुळें वरील पुराव्यावरून त्यास कोणत्याहि प्रकारें बाध येऊं शकत नाहीं.

आतां आपण शाकटायनानंतर झालेले व्याकरणकार कोणत्या काळांत होऊन गेले तें पाहूं.

(१)शाकटायनाच्या शब्दानुशासनावरील रूपसिध्दि नांवाची प्रक्रिया दयापालानें केली असा शके ९९९ सालच्या एका कानडी अंकितलेखांत उल्लेख आहे. परंतु दयापाल हा मतिसागराचा शिष्य व वादिराजाचा सहाध्यायी असल्यामुळें व वादिराज चालुक्य राजा दुसरा जयसिंह याच्या कारकीर्दीत म्हणजे शके ९४७ त होऊन गेला असल्यामुळे शाकटायन या सालाच्या पूर्वी होऊन गेला असला पाहिजे [श्रवण बेळगोल अंकितलेख ५४ व कोल्हापूरच्या जैनमठांतील पार्श्वनाथ चरिताच्या हसतलिखित प्रतींतील प्रशस्तीच्या शेवटच्या भागांतील कविता पहा.]

(२)शाकटायनाच्या शब्दानुशासनावर प्रभाचंद्रानें न्यास लिहिला असा एके ठिकाणीं उल्लेख आला आहे. परंतु प्रभाचंद्रानें आपल्या न्यायकुमुदचंद्रोदयांत गुणभद्राच्या आत्मानुशासनांतूनं,

अंधादयं महानंधो विषयांधी कृतेक्षण:
चक्षुषांधो न जानाति विषयांधो न केनचित

[आत्मानुशासन कविता ३५] ही कविता दिली असल्यामुळें व गुणभद्र हा दुसरा कृष्णराज युवराज असतांना त्याचा अध्यापक होता म्हणून प्रभाचंद्र हा नवव्या शतकाच्या पूर्वार्धां होऊन गेला असला पाहिजे असें म्हणणें प्राप्त होतें.

(३)शाकटायनाच्या सूत्रांवरील नांव घेण्याजोगी दुसरी एखादी टीका म्हटली म्हणजे अभयचंद्रसुरीचा प्रक्रियासंग्रह होय.अभयचंद्रानें नेमिचंद्राच्या गोमटसार नांवाच्या मागधी ग्रंथावर संस्कृतमध्यें टीका लिहिली आहे. अभयचंद्रसुरीचा शिष्य जो केशववर्णि किंवा केशवण्णा त्यानें अभयचंद्राच्या गोमटसारावरील संस्कृत टीकेचें कानडींत केलेलें भाषांतर शके१२८१ त संपविलें असें तो म्हणतो.म्हणजे अभयचंद्रसूरी हा शके १२८१च्या कांहीं वर्षे अगोदर होऊन गेला असला पाहिजे.

याप्रमाणें सर्व बाजूंनीं विचार कयन पाहतां शाकटायन हा पहिल्या अमोघवर्षाच्या कारकीर्दीत म्हणजे इ.स. ८१४ च्या सुमारास होऊन गेला; व त्यानें शके ७३५ व ७८९ यांच्या दरम्यान आपली अमोघवृत्ती लिहिली या विधानास बाध येऊं शकत नाहीं असें दिसून येईल. किंबहुना आपला राजा जो अमोघवर्ष त्याविषयीं आपला आदर प्रकट करण्याकरिंताच श्र्वेतांबर जैन शाकटायनानें आपल्या ग्रंथास अमोघवृत्ति हें नांव दिलें असावें.