प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.           

शाकटायन ग्रंथाचें स्वरूप- पाणिनी, कात्यायन, पतंजलि व चंद्रगोमिन् यांनीं केलेले परिश्रम जमेस धरून शाकटायनानें आपल्या व्याकरणाची रचना केलेली आहे. शिवाय, पूज्यपादाच्या ग्रंथांतूनहि त्यानें बऱ्याच गोष्टी घेतल्या आहेत. पाणिनीचीं व शाकटायनाचीं बरींच सूत्रें एकच असून त्यांच्यांत जेथें फरक आढळतो तेथें तेथें पाणिनीचा हेतु थोडक्या व मोजक्या शब्दांत सांगण्याचा शाकटायनाचा हेतु आहे नवीन माहिती सर्व चंद्रगोमिन् याच्या व्याकरणांतील आहे; व वैयाकरणांच्या नेहमींच्या शिरस्त्याप्रमाणें त्यांच्या नांवाचा उल्लेख कोठेंहि नाहीं. ज्या ठिकाणीं चांद्रव्याकरणापेक्षां शाकटायनानें अधिक सुधारणा केलीसें दिसतें. त्या ठिकाणीं त्या गोष्टी जैनेंद्र व्याकरणानें आगाऊच केलेल्या होत्या, असें आढळून येतें. उदाहरणार्थ, पाणिनी-हस्ताज्जातौ, (५-२-१३३) चंद्र-हस्तदन्ताज्जातौ (४-२-१३०) व जैनेंद्र- हस्तदन्तकराज्जातौ (३-४-१४३)  हें सूत्र घ्या. शाकटायनानें हें सूत्र  जैनेंद्राप्रमाणें दिलें आहे. १-२-३७ यांत शाकटायनानें इन्द्राचा उल्लेख केलेला आहे. हा बहुधा जैनेंद्रसंप्रदायाचा प्रस्थापक पूज्यपाद असावा. शाकटायनाचा कटाक्ष सुत्राक्षरांचा संक्षेप करण्याकडे दिसतो याचें एक उदाहरण म्हणजे पाणिनी ५-२-१२८ हें सूत्र होय, हें सूत्र'द्वंद्वोपतातगर्ह्यात्प्राणिस्थादिनी:॥ 'असें आहे. चंद्रव्याकरणांत हेंच सूत्र 'चार्थ' (=द्वंद्व) रोग (उपताप) गर्हितात्प्राणिस्थादस्वांगादिनि:।' या स्वरूपांत आहे. शाकटायनानें हें सूत्र असेंच, परंतु रोगगर्हित याच्या ऐवजीं रूड्.निंद्य असा शब्द घालून सबंध दोन अक्षरें कमी करून घेतलें आहे.  ज्या ठिकाणीं चांद्र व्याकरणाची परिभाषा बाजूस ठेवून शाकटायनानें चांद्र परिभाषाच स्वीकारिली आहे. उदाहरणार्थ, निषात, सर्वनाम, आत्मनेपद आणि परस्मैपद यां ऐवजीं, चादि, सर्वादि, तड. आणि अतड्. ही परीभाषा त्यानें उपयोजिली आहे.