प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
संस्कृत भाषाशास्त्रें आणि आधुनिक भाषाशास्त्र- भारतीय व्याकरणशास्त्राच्या इतिहासावरून आपण अधिक व्यापक अशा भाषाशास्त्रकडे वळूं. भाषाशास्त्राचा अभ्यास जो अलीकडे होतो तो अभ्यास देखील प्राचीन भारतीय भाषाशास्त्रांचें उपबृंहित स्वरूप आहे. असें म्हणण्यास हरकत नाहीं. साहित्य जमा करणें आणि त्याचा अभ्यास करणें या क्रिया सर्व शास्त्रांत होतात. भाषाशास्त्रांतील महत्वाचीं शास्त्रें म्हटलीं म्हणजे व्याकरण, निरूक्त वगैरे होत. या बाबतींत भारतीयांच्या विद्येइतकी प्रगति प्राचीन जगांत दुसऱ्यां कोठेंहि झाली नव्हती, येवढेंच नवहे तर अर्वाचीन जर्मन पंडित्याचा उदय होण्यापूर्वी अर्वाचीन जगांतहि झाली नव्हती असें म्हणतां येईल. जुनी यूरोपीय संस्कृति ध्वंसिल्यानंतर अरबांचे तडाखे व ख्रिस्ती भिक्षुकांचे पाश यांतून यूरोपीय बुध्दिमत्ता सुटुन द्रव्यदायक भौतिक शास्त्रांच्या पलीकडे द्दष्टि फिरविण्यास लागावयास ख्रिस्ती अठरा शतकांचा काल लोटावा लागला. पाणिनीच्या सारखा वैयाकरण् पुढें झाला नाहीं आणि आज अनेक पंडितांच्या परिश्रमानें भाषाभ्यास जरी बराच पुढें गेला आहे तरी सर्व जागाच्या भाषाशास्त्राच्या इतिहासांत अष्टाध्यायीइतका अमर्त्य आणि परिणामंकारी ग्रंथ दुसरा झाला नाहीं.प्राचीनांनीं भाषेचें व्याकरण म्हणजे वाक्यपृथक्करण व शब्दपृथक्करण केलें, मुख्यस्थानांपासून वर्णोत्पत्तीचे नियम शोधून काढले, प्रत्येक संबंधोत्पादक शब्दांचा सूक्ष्म अर्थ तपासून मीमांसा व व्याकरण या शास्त्रांत अन्तर्भूत केला, येवढेंच नव्हे तर भाषा व उपभाषा यांतील संबंध व फरक हे नोंदिले आणि भाषेंतील सर्व शब्दांचा संग्रह करण्याचा हट्टानें प्रयत्न केला. अर्थात् प्राचीन भारतीयांच्या भाषापंडित्यासारखें पांडित्य जगांत कोठेंहि नव्हतें आणि अर्वाचीन भाषापंडित्य हें संस्कृत भाषेच्या अभ्यासानंतर सुरू झालें ही गोष्ट लक्षांत घेण्याजोगी आहे.
भाषाशास्त्राचा इतिहास लिहावयाचा म्हणजे प्राचीन भारतीय विद्येपासून एकदम १९ व्या शतकावर उडी मारली असतां हरकत नाहीं. ऐतिहासिक भाषाशास्त्रास प्रारंभ जो हेमचंद्र, वररूचि इत्यादिकांनीं केला त्याचा विस्तार म्हणजे आजचें ऐतिहासिक व्याकरणशास्त्र होय. याचा अर्थ असा नव्हे कीं, ग्रीक, रोमन वगैरें राष्ट्रें भाषाशास्त्रमूढ होतीं. त्यांच्यामध्यें व्याकरणें झालीं, कोश झाले, तथापि हेंहि म्हणतां येईल कीं, भाषाशास्त्राच्या अभ्यासामध्यें पद्धतीचा इतिहास आपण लिंहू लागलों असतां आपणास हेमचंद्र, यास्क, पाणिनी, वररूचि, यांच्या कालावरून एकदम १९ व्या शतकाच्या मध्यभागापर्यत आलें असतां पद्धतिविकासेतिहासाची एखादी महत्वाची पायरी आपण चुकविली असें वाटणार नाहीं.