प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
नामधेयाचें आणखी एक कारण.- कांही लोक ‘उत्पत्तिशिष्टगुणबलीयस्त्व’ हेंहि एक नामधेयाचें कारण मानितात. उदाहरणार्थ ‘वैश्वदेवेनयजेत’ हें वाक्य घ्या. येथें पूर्वी सांगितलेल्या चार कारणांपैकीं एकहि कारण संभवत नसल्यामुळें उपरिनिर्दिष्ट कारणानें येथें नामधेय मानावें लागतें. ‘उत्पत्तिशिष्टगुणबलीयस्त्व’ म्हणजे उत्पत्तिवाक्यांत सांगितलेल्या गुणाचें प्राबल्य असणें, आणि त्यामुळें इतर कोणत्याहि गुणाचा समावेश करतां न येणें. ‘वैश्वदेवेन यजेत्’ या वाक्यांत ‘विश्वदेवदेवतारूपी गुणाचें विधान करणें शक्य नाहीं. कारण, तें अन्य वाक्यानें विहित आहे.
खरें पाहिलें असतां तत्प्रख्यशास्त्रावरून हें नामधेय ठरतें. तत्प्रख्यशास्त्रानें ज्या ठिकाणीं नामधेय असतें त्या ठिकाणीं सांगावयाचा गुण अन्य वाक्यानें प्राप्त असतो. तसें येथें विश्वेदेवदेवतेचें विधान ‘यद्विश्वेदेवा: समयजन्त तद्वैश्वदेवस्य वैश्वदेवत्वम्’ या वाक्यावरून प्राप्त आहे. म्हणून येथें तत्प्रख्यशास्त्रावरून नामधेय घेणें योग्य आहे.
परंतु ‘वैश्वदेव’ यागांत आठ प्रकृत याग आहेत. त्यांपैकीं सातांत विश्वेदेव देवता प्राप्त आहे, आठव्यांत नाहीं. ती देवता ‘वैश्वदेवन यजेत’ ह्या वाक्यानें आठहि यागांचें विधान असल्यामुळें अनुवादरूपानें सांगितली आहे. म्हणून, येथें तत्प्रख्य शास्त्रानें नांव म्हणतां येत नाहीं. उलट उत्पत्तिशिष्टगुणवलीयस्त्वानेंच नांव ठरविलें पाहिजे.
यावरून या प्रकारें यज्ञांचीं नांवें विधेय अर्थाचें ज्ञान करून देऊन अन्वर्थ कशी असतात. हें स्पष्ट सिद्ध होतें.