प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
अलेक्झँड्रियापासून अर्वाचीन काळापर्येत.- अलेक्झँड्रिया येथील वैयाकरणातून अर्वाचीन पाश्चात्य भाषाशास्त्रज्ञांपर्यंत सांखळी जोडतांना ज्या महत्वाच्या कार्याचा उल्लेख केला पाहिजे तीं कार्ये, आणि त्यांतील संगति याविषयीं येणेंप्रमाणें माहिती देतां येईल. भाषेची उत्पत्ति वगैरे तात्विक विषयावर लिखाणें लेखकाच्या ज्ञानाच्या प्रमाणानें मधून मधून होत असत.त्यांचें आपणांस महत्व नाहीं.
तथापि भाषाशास्त्राच्या विकासात कारक असे ग्रंथ झाले त्यांमध्यें कांहीं संग्रहांचा उल्लेख केला पाहिजे.१८ व्या शतकांत ख्रिस्ती प्रार्थनेची जगांतील अनेक भाषांत भाषांतरें करून तीं एकत्र करण्यांत आलीं आणि १७८७ मध्यें कॅथराईन दी सेकंड या राणीनें जगांतील अनेक भाषांचा एक कोश करवून प्रसिद्ध केला. तसल्याच तऱ्हेचें दुसरें कार्य म्हणजे अडेलूंग या नांवाच्या एक पंडिताचा मिथ्रिडाटिस नांवाचा एक ग्रंथ होय. अडेलूंगचें काम पुढें फाटर यानें चालविलें आणि संपूर्ण केलें (बर्लिन १८०६ ते १८२१ ). या ग्रंथाचें महत्व केवळ साहित्य म्हणूनच आहे. यूरोपीय भाषाशास्त्रपांडित्यांतील एक महत्वाचा वाद म्हटला म्हणजे भाषा ही मनुष्यकृति आहे कीं दैवी देणगी आहे यासंबंधाचा होय. या वादामध्यें तत्ववेत्ता हर्डर व सुस्मिल्क हे होते. सुस्मिल्क यानें आंकडेशास्त्राच्या साहाय्यानें ईश्वरांचे अस्तित्व सिद्ध करूं पाहणारा ग्रंथ १७६१ मध्यें प्रसिद्ध केला आणि १७६६ सालीं भाषा ही मनुष्यकृति नसून केवळ ईश्वरकृति आहे अशा अर्थाचा एक ग्रंथ लिहिला. पुढें जेव्हां भारतीय भाषांचें ज्ञान यूरोपांत पसरलें तेव्हां बॉप व हंबोल्ट हे ग्रंथकार निर्माण झाले. बॉपला हर्डरच्या संप्रदायाचा न म्हणतां मागें उल्लेखिलेला अडेलंगू व फ्रहेरर यांच्या संप्रदायाचें म्हटलें पाहिजे. बॉपनें प्रथमत: १८१६ सालीं आर्यन् भाषांतील क्रियापदांवर ग्रंथ लिहिला,आणि आपलें तौलनिक व्याकरण बरचें नंतर प्रसिद्ध केलें.हंबोल्टचे ग्रंथकार १८३६-१८७६ असे देतां येतील. हंबोल्टचें भाषांचें वर्गीकरण सामासिक भाषा,शब्दयोगी अथवा चिकटया भाषा व प्रत्ययान्त भाषा असें आतांपर्यंतच्या भाषाशास्त्रज्ञांनी घेतलें आहे; आणि रा.राजवाडयांनी देखील याच वर्गीकरणचा स्वीकार करून संस्कृत भाषा या प्रत्येक स्थितींत असतां कशी होती हें दाखविण्याचा प्रयत्न आपल्या 'संस्कृत भाषेचा उलगडा' या पुस्तकांत केला आहे. या प्रकारच्या वर्गीकरणाचें महत्व मनुष्येतिहास लिहीतांना कसें दुर्बल होतें हें आम्ही तिसऱ्या विभागांत (पृष्ठ२३-२४) दाखविलें आहे. हंबोल्ट व बॉप यांच्या नंतरचा विकास देणें म्हणजे अर्वाचीन भाषापांडित्य संपूर्ण देणें होय. तें येथें देण्यांत मतलब नाहीं.