प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.     

ऐन्द्रसंप्रदाय- आपिशली व काशकृत्स्न यांच्याहून ऐन्द्र नांवाच्या व्याकरणग्रंथसमूहाची गोष्ट थोडी निराळी आहे.'प्राच्य'या सामान्य उल्लेखाशिवाय यांचा उल्लेख पाणिनीनें कोठेंहि केलेला नाहीं.कथासरित्सागराच्या चौथ्या तरंगामध्यें,पाणिनीच्या पूर्वींचा व पाणिनीमुळें लुप्त झालेला संप्रदाय म्हणजे ऐंद्र व्याकरणकारांचा होय,व व्याडी,वररूचि किंवा कात्यासन व इन्द्रदत्त हे व्याकरणकार या परंपरेंतील होत असें म्हटलें आहे.डॉ.बर्नेल यानें 'तामिळ भाषेचे अतिपुरातन व्याकरण म्हणजे'तोल्कप्पियं'नामक सर्वसंग्रहांतील कांही भाग होत:व यांतील व्याकरणपद्धति ऐन्द्र संप्रदायाचा भाग असून पांडय-राजाच्या दरबारांत हें व्याकरण वाचलें जाई व तेथें तें पसंत पडे'असें लिहीलें आहे. कात्यायनाचें कातंत्र व प्रतिशाख्यें यांचा याशीं निकट संबंध असून हींहि ऐन्द्र संप्रदायाचींच व्याकरणें होत.  याच्याबरोबर पाणिनीच्या पूर्वींचे म्हणून समजले जाणारे दोन व्याकरणसंप्रदाय अस्तित्वांत आहेत. सध्यांच्या आपल्या माहितीवरुन ज्याअर्थी यांचा उल्लेख काशिका, महाभाष्य किंवा पाणिनीची व्याकरणसूत्रे, यांत आढळत नाही त्याअर्थी ऐंन्द्र संप्रदाय पाणिनीनंतरचा असें म्हटलें पाहिजे.