प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.             
     
कातंत्र शाखेचा आरंभींचा इतिहास- मूल ग्रंथाच्या योग्यतेमुळें व त्याचा कर्ता हा दक्षिणेंतील एका बलाढय राजाचा आधिक होता त्यामुळें या ग्रंथाचा प्रसार फारच थोडक्या अवधींत जिकडे तिकडे होऊन तो काश्मीर व सिंहलद्वीप या दूरदूरच्या देशांत जाऊन पोंचला. या शाखेचा उदय होण्यापूर्वीचे जे ग्रंथ झाले ते केवळ पंडितांसाठीं व भिक्षू लोकांसाठीं होते. त्यांत व्यापार किंवा शेतकी करणारे वरच्यापेक्षां साधारणत: कमी बौध्दिक दर्जाचे जे लोक त्यांची सोय नव्हती. परंतु उलटपक्षीं या साधारण लोकांची आपली भाषा शिकविण्याची व तींतील ग्रंथ वाचण्याची इच्छा अजीबात नष्ट झाली नव्हती. यामुळें शर्ववर्मा याच्या मूळ सूत्रपाठाचें जणूं काय संशोधन होऊन पुढील दोन तीन शतकांत त्याला निराळें स्वरूप आलें. त्यांत तध्दिक व स्त्री प्रत्ययपाद हें मिसळले गेले व शाकटायनाच्या, कात्यायनाच्या किंवा वररूचीच्या कृत्प्रत्यय प्रकरणाची त्यांत भर पडली.